ओलांडून जाताना.. भाग-९



आभा घरी आली तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते.. ती गेल्या काही दिवसात इतकी खूष कधीच नव्हती.. आईची आज भिशी होती.. ती त्यासाठीच तयार होवून निघाली होती..
“आई हि निळी साडी सॉलिड दिसतेय ग तुला..”
“अरे.. खुशीत दिसतेयस आज.. काय झालय?”
“काही नाही गं.. सहज..”
“तुम्हा आजकालच्या मुलाचं काही कळत नाही.. आज घरातून जाईपर्यंत चेहऱ्यावर बारा वाजलेले होते तुझ्या.. आणि आता बघावं तर..”
“आई.. मूड खराब नको गं करूस.. कसंहि राहिलं तरी तुम्हाला प्रोब्लेमच असतो..”
“जावू दे ना.. मला काय करायचय......” आणि मग पुढे टिपिकल आयांची वाक्य स्वत:शीच बडबडत आई घराबाहेर पडली.. पण आज तिचं हे बडबडण आभाचा मूड खराब करू शकणार नव्हतं.. तिने घाईघाईत विधीशाला फोन लावला.. तिच्याशी वाद घालून आल्यापासून त्या दोघी बोलल्याच नव्हत्या.. विधीशाची कॉलर ट्यून म्हणून टेलर स्विफ्टचं गाणं वाजत होतं.. आभा तिच्याशी बोलण्यासाठी अतिशय एक्सायटेड होती.. पण विधीशाने फोन कट केला..
आभाला आश्चर्य वाटलं.. विधीशाने आजपर्यंत कधीच आभाचा फोन कट केला नव्हता.. पण आतापर्यंत त्याचं असं भांडणही कुठे झालं होतं.. विधीशा रागावली, नाराज झाली तर नसेल ना.. आभाला टेन्शनच आलं.. तिने पुन्हा फोन डायल केला.. पुन्हा कट.. आता आभाचं टेन्शन जरा जास्तच वाढलं.. विधीशा सहसा रागवायची नाही.. पण रागावल्यावर तिला नॉर्मल व्हायला खूप वेळ जायचा.. आता विधीशाने रागावणं आभाला अजिबात परवडणार नव्हतं.. तिने पुन्हा फोन डायल केला.. पुन्हा कट.. आता आभाला वाटणारा सगळा आनंद मावळला होता.. ती विधीशाला whatsapp करायला घेणार तोच दार वाजलं.. आई नक्कीच काहीतरी विसरली असणार.. आभाने जावून दार उघडलं आणि समोरचं दृश्य पाहून ती चकित झाली..
दारात विधिशा उभी होती.. हातात के.एफ.सी.च्या पार्सलची पिशवी.. चेहऱ्यावर तेच प्रसन्न स्माईल.. आभाला हे खरच प्लेझेंट सरप्राईज होतं..
“तू इथे..”
“आज कॉलेजवरून आल्यावर तुला माझ्याशी खूप काही बोलायचं असणार याची खात्रीच होती मला.. म्हणून कॉलेजवरून डायरेक्ट इकडेच आले.. हॉट विंग्स हॉट आहेत तोपर्यंत सांग आज काय झालं..”

वर्सोवाच्या बिचवर आज जरा जास्तच लोक होते.. फुटबॉल खेळणारा पोरांचा घोळका.. दगडाआड रोमान्स करणारी जोडपी.. फेरीवाले.. कुत्र्यांना फिरवणारे त्यांचे मालक.. तर काही उगाच समुद्राकडे बगत बसलेले लोक.. त्यातच आकाश बसला होता..
एकदा आभाला इथल्याच बसस्टॉपवरून त्याने पिक केलं होतं.. तिची बहिण रहायची म्हणे इकडे.. पण आकाशला तेव्हाच हा स्पॉट आवडला होता.. उदास असला किंवा कन्फ्युज असला कि तो इथेच यायचा.. अदितीचा Boyfriend आहे हे कळल्यावर तो इथेच येवून बसला होता.. आभाला आपली Girlfriend बनून येण्यासाठी कसं विचारावं यासाठी इथेच येवून त्याने प्लानिंग केलं होतं.. आभा ते कधीही करणार नाही असं वाटत असताना ती अचानक त्याच्या ग्रुपला भेटायला आली होती तेव्हा त्याला आश्चर्याच वाटलं होतं.. (भाग ७-८) आभाबद्दल तेव्हा त्याला काय वाटलं होतं हे कुठल्याही शब्दात मांडणं कठीणच.. पण आपल्याला इतका सपोर्ट देणाऱ्या मुलीसोबत आयुष्य घालवणं हि नक्कीच त्याला चांगली कल्पना वाटू लागली होती.. ज्या आभाला काही दिवसांपूर्वी त्याने नकार दिला होता त्याच आभाला आज त्याने स्वत:हून विचारलं होतं.. काल पर्यंत जी आभा त्याचा एक शब्दही खाली पडू देत नव्हती ती त्याला चक्क नकार देवून गेली होती.. वर हे वचन देवून गेली होती कि ती त्याला अदितीच प्रेम मिळवून देईल..

हॉट विंग्सचा आजून एक पीस विधीशाने संपवला.. तोपर्यंत आभानेहि तिचा दिनक्रम सांगून संपवला होता..
“That’s Like My Girl.. Finally तू माझ्या प्लान नुसार चालायचा निर्णय घेतलास.. तू आकाशच्या आयुष्यात अदितीला परत आणणार हे त्याला सांगून मोकळी झालीस.. छान..”
“मी मारलाय दगड.. पण आता तो फिरून मलाच लागला नाही म्हणजे मिळावली.. आपण खरच बरोबर जातोय ना विधी.. नाही म्हणजे फार फिरून घास खातोय असं होत नाहीये ना.. कारण मी त्याला हे सगळं बोलायच्या जस्ट आधी त्याने मला ऑल्मोस्ट प्रपोज केलं होतं..”
“हे ऑल्मोस्टच आपल्याला काढून टाकायचय आभा.. म्हणून हे सगळं करायला सांगतेय मी.. सपोज, आज तू त्याचं हे ऑल्मोस्ट प्रपोजल एक्सेप्ट केलं असतस आणि उद्या अदिती त्याच्याकडे परत आली असती तर..”
“पण अदिती आणि सोहम..”
“प्लीज आभा.. लास्ट इयर माझं पाच वर्षाचं रिलेशनशिप संपलं.. त्यांना धड पाच दिवस झाले नाहीएत.. and you know aabha how things are these days?”
आभाला तिचं म्हणणं पटत होतं..
“आभा सायकलॉजीकली त्याच आज तुला प्रपोज करण हि त्या क्षणाची प्रतिक्रिया होती.. काइंड ऑफ फेवर.. फेवर म्हणजे प्रेम नाही ना आभा..”
“ओके.. हे पटलं.. पण मी त्याच्या आयुष्यात अदितीला पुन्हा घेवून येईन हे सांगण्यामागच काय कारण.. आय डोंट थिंक सो कि आपण तसं काही खरच करणार आहोत..”
“तू प्रॉमिस केलयस आभा.. प्रॉमिस तर पाळायला लागणार ना..”
आभाला विधीशाच्या बोलण्याचं आश्चर्य वाटत होतं.. तिच्या प्लान प्रमाणे चालायचं आभाने ठरवलं होतं पण इथे बुडत्याचा पाय खोलात जाण्याची चिन्ह दिसत होती..
“आर यु सिरिअस.. म्हणजे मी खरच अदितीला आणि आकाशला पेअर म्हणून एकत्र आणायचं..??”
आभाचा आवाज जितका हायपर झाला होता तितक्याच कुल आवाजात विधीशाने उत्तर दिलं..
“१०० टक्के प्रयत्न करायचेस..”
“अगं पण का? मी का करायचं हे?”
“पडला ना हा प्रश्न.. झालीस ना कन्फ्युज.. बस आकाशलाही असंच कन्फ्युज करायचय आपण.. त्यालाही हाच प्रश्न पडला पाहिजे कि आभा असं का करतेय..”
“पण त्याचा काय उपयोग होणार?”
विधीशाला आभाचं असं हायपर होणं मजेदार वाटत होतं.. एखाद्या कोड्याचं उत्तर आपल्याला माहित असताना इतरांना ते सोडवण्यासाठी डोक्यावर किती ताण द्यावा लागतोय हे पाहताना जितकी गंमत वाटते तितकीच विधीशाला आभाला बघून वाटत होती.. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच गूढ हसू तरंगायला लागलं होतं..
“बेबी.. सायकलॉजीकली जी गोष्ट माणसाला कन्फ्युज करते तिच्याकडेच तो सगळ्यात जास्त अॅट्रॅक्ट होतो.. कोडी, सोडवता आली नाहीत तरी आपल्याला आवडतात.. जादू, कळत नाही पण बघायला खूप आवडते.. टुकार सस्पेन्स थ्रिलर फिल्म्स, वाईट असल्या तरी सस्पेन्स समजेपर्यंत पाहतोच आपण.. बर्म्युडा ट्रायंगल, गिझाचे पिरामिड्स, आउटर स्पेस, दुध पिणारे गणपती, अशा किती किती गोष्टी आहेत ज्यात माणूस विनाकारणहि इंटरेस्ट घेऊ लागतो.. का? कारण त्या कन्फ्युज करतात.. and if i am not wrong.. and i am sure i am not.. आत्ताही आकाश जिथे असेल तिथे तुझाच विचार करत असेल..

आकाशने भेळ घेतली होती.. पण त्याला खायचं मन करत नव्हतं.. त्याला निघावस वाटत होतं.. पण जायचं मन करत नव्हतं.. थांबायचा विचार केला तर थांबायचंहि मन होत नव्हतं.. त्याला काय करावं तेच कळत नव्हतं.. आभाने त्याला टोटल कन्फ्युज केलं होतं.. आपल्यातच काहीतरी गडबड आहे असं त्याला वाटू लागलं होतं.. आधी अदितीबद्दल त्याचं गेसिंग चुकलं होतं.. ती प्रेमात आहे असं वाटत असताना तीच दुसरीकडेच अफेर होतं.. आणि नंतर आभाच्या बाबतीत हा किस्सा घडला होता.. पण आभा सांगते त्या प्रमाणे खरच ती अदितीला त्याच्या आयुष्यात परत आणेल का हा प्रश्न त्याला पडला होता.. पण त्याही पेक्षा मोठा प्रश्न हा होता कि आभा असं का करेल.. आज पहिल्यांदा त्याला आभाबद्दल जाणून घ्यावसं वाटत होतं.. तिला बसवून तिच्यासोबत खूप बोलावसं वाटत होतं.. आज ती इथे असती तर किती प्रश्नाची उत्तर मिळाली असती.. आभाबद्दल इतका विचार तो पहिल्यांदाच करत होतं.. कारण हि आभा आधी भेटलेली नव्हती.. हि आभा वेगळी होती..

“Eww..बनाना मिल्कशेकमधे मिरची पावडर..????”
“हे वेगळं आहे.. पण मला आवडतं.. सायकलॉजीकली नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टी माणसाला जास्त आवडतात..”
आभा आणि विधिशा किचनमध्ये उभ्या होत्या.. विधिशा तिच्यासाठी मिरची पावडर टाकून बनाना मिल्कशेक बनवत होती.. तिने मिक्सरमध्ये एक चमचा बुडवून त्याची चव घेवून बगितली..
“वा.. मस्त आहे.. पिणार?” तिने आभाला विचारलं.. आभाने मानेनेच नाही सांगितलं..
“विधी.. तू म्हणतेयस कि आपण.. म्हणजे मी.. आकाश आणि अदितीला एकत्र आणायचं.. पण तिच्या आयुष्यात तर सोहम आहे ना?”
विधीशाने मिल्कशेकचा ग्लास भरताभारता आभाकडे पाहिलं.. खट्याळ हसत तिने विचारलं..
“रिअली?”

अदितीचा आयफोन वाजत होता.. सोहमच नाव स्क्रीनवर ब्लिंक होत होतं.. हा त्याचा सातवा कॉल होता.. जो अदितीने कट केला.. ‘Why cant he just leave me alone!’ तिच्या मनात विचार येवून गेला.. पण सोहमच अस्वस्थ होणं स्वाभाविक होतं.. अदिती त्याची Girlfriend होती.. आज संध्याकाळी कॉलेजच्या जवळ झालेल्या भेटी नंतर ती अस्वस्थ होती.. आणि त्याचा एकही कॉल तिने रिसीव्ह केला नव्हता..
पण अदितीला त्याच्याशी बोलायची इच्छाच नव्हती.. आकाशला विसरता यावं म्हणून तिने सोहमला होकार दिला होता.. पण ती मात्रा अजिबात लागू पडत नव्हती.. आकाशच्या Girlfriendला आज भेटल्या नंतर तर तिच्यासाठी ती गोष्ट अधिकच कठीण होवून बसली होती.. तिच्यात असं काय असावं कि आकाश तिच्या प्रेमात पडला असेल? हा विचार तिच्या मनात चमकून गेला आणि तिला अधिकच गिल्टी वाटू लागलं..
स्वत:च्या आईला घाबरून ती आकाशपासून दूर गेली होती.. नाहीतर आकाशला आजही ती परत मिळवू शकली असती असं तिला सतत वाटत होतं.. तिच्या मनातल्या या विचारांची तिला भीती वाटत होती.. जे झालं ते बरच झालं असं तिला वाटलं.. आकाश एंगेज आहे या विचाराने तरी ती त्याच्यापासून दूर राहू शकेल.. अदरवाईज आज नाहीतर उद्या आकाशच्या त्या नजरेत वाहून जायला तयार झाली असती याबद्दल तिला अजिबात शंका नव्हती.. तिला खात्री होती कि आकाशने पुन्हा जर तिला विचारलं असत तर तिने नक्कीच होकार दिला असता..

“आणि समजा अदितीने होकार दिला तर?” तिथे आभा अजूनही विधीशाकडून प्लान समजावून घेत होती.. विधिशा मात्र मिल्कशेक संपवण्यात बिझी होती.. “मी तिला आणि आकाशला एकत्र आणायचा प्रयत्न करायचे आणि तोंडावर पडायचे..”
“असं काही होणार नाही गं.. मी आहे ना..” विधीशा ग्लास सिंक मधे टाकायला म्हणून उठली.. तशी पाठोपाठ आभाही निघाली..
“पण असं झालं तर कसं रोखणार आहोत आपण ते.. हे बघ.. मला तू पुढे काय होणार आहे हे नीट समजावल्याशिवाय मी काही हा प्लान फॉलो करणार नाही हां..”
“आभा.. जर काही असं झालं नाही ना.. तर तुझ्यामध्ये आणि अदितीमध्ये आकाश तुझी निवड करेल याची गॅरेंटी मी देते.. तेवढ्यासाठीच आपण हे करतोय आभा.. ती नाही म्हणून तू असं होवू नये यासाठीच चाललंय ना हे..”
“पण हे आपण करणार कसं? आकाश मला का निवडणार?”
“त्याचं फाउंडेशन तू आजच केलयस.. आकाशचा त्या दृष्टीने विचार सुरु झालाय.. आता बाकी माझ्यावर सोड.. सगळं काही समजण्याच्या नादात स्वत:ला जास्त कन्फ्युज करून घेण्यापेक्षा उद्यापासून काय करायचय तेवढं समजून घे..”

आकाश बिचवरून घरी जायला म्हणून उठला.. त्याला उत्तर सापडलं नव्हतं.. पण कमीतकमी पुढे जाण्याचा मार्ग सापडल्यासारखा वाटत होता.. आभा त्याच्यावर रागावली आहे म्हणून असं वागतेय असं त्याला वाटत होतं.. उद्यापासून तो आधी तिच्या मनातला राग दूर करणार होता.. आणि मग तिच्या अशा वागण्याचं कारण तिला विचारणार होता.. आज बीचवरून निघताना नेहमीप्रमाणे त्याची अस्वस्थता कमी झाली नव्हती.. उद्या आभाला भेटे पर्यंत ती कमी होणारही नव्हती..

अदितीच्या फोनवर सोहमचा मेसेज ब्लिंक झाला.. ‘what happened? anything wrong? will be there with in hour..” अदितीला मेसेज वाचून गिल्टी वाटू लागलं.. आपल्या अशा वागण्याने आपण त्याचं खेळणं केलंय हे तिला जाणवलं.. उद्यापासून आकाशला विसरायचं.. आपल्याला त्याच्याबद्दल जे जे वाटतय ते मनातून काढून टाकायचं.. अदिती तयार व्हायला उठली..
कपाटातून ड्रेस काढत असताना तिची डायरी तिच्या हाताला लागली.. त्यात तिच्या आणि आकाशच्या अनेक आठवणी लिहिलेल्या होत्या.. नकळत डायरीची पानं चाळताना ती पुन्हा भूतकाळात हरवली.. ते दिवस तसेच राहिले असते तर किती बरं झालं असतं.. आकाशला विसरायचं म्हणत होती ती आणि आता त्याच्याच आठवणी घेवून बसली होती याचं तिलाच आश्चर्य वाटलं.. पण तिने उद्यापासून आकाशला विसरायचं ठरवलंय याची आठवण तिने स्वत:ला करून दिली.. आजची संध्याकाळ आकाशच्या आठवणींमधे ती घालवू शकत होती याचच तिला समाधान होतं..

आभा.. आकाश.. अदिती.. तिघेही आपापल्या निर्धारावर ठाम होते.. उद्यापासून स्वत:चं आयुष्य बदलण्याची सुरुवात तिघेही करणार होते.. पण त्याचं आयुष्य कुठल्या वळणावर जाणार आहे याची त्यांनाच शाश्वती नव्हती..

क्रमशः 


Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४

ओलांडून जाताना... भाग - 3