ओलांडून जाताना... भाग-२२



 दूर जाती जागलेल्या भावनांचे ते कवडसे, मन आता माझे रिते का हे असे रे होत आहे..
वेळ गेली टाळुनी तो काळही खोटा निघाला, का भरवसा मीच माझा हरवूनी बसलेच आहे..

त्यांच्या एकांकीकेतल्या या ओळी आभाच्या मनात लूप लागावा तशा वाजत होत्या.. अदितीने फार्महाऊसवर सार्यांसमोर तमाशा करून हे सांगितलं होतं कि आभा आणि आकाश कपल असल्याचं नाटक करतायत.. हे सत्य आभानेच अदितीला सांगितलं होतं.. आणि आपण जे बोललोय ते कधीतरी बाहेर येणार याची आभाला आधीपासून कल्पना होती.. पण हे सारं असं होईल याचा तिने कधीही विचार केला नव्हता.. सगळ्यांसमोर.. इतक्या अनपेक्षितपणे.. आणि ते घडल्यावर तिला इतकं विचित्र वाटू लागेल याचा तर तिने विचारच केला नव्हता..
तिची कॉलेजला जायची इच्छा होत नव्हती.. पिकनिकमुळे थकली असेल म्हणून आईनेही तिला घरी थांबू दिलं.. ती फक्त घरात बसून त्या साऱ्या घटनांचा विचार करत होती.. मध्येच तिला एकांकीकेतल्या काही ओळी आठवत होत्या.. ती खूप डिस्टर्ब होती.. आपल्याला बरं वाटावं म्हणून तिने विधीशालाही फोन केला होता.. तिला सगळं सांगितल्यावर तिने खास काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती..
“बेबी.. आय टोल्ड यु ना कि हे असं होणार.. डोंट वरी..”
“विधी बट आय अॅम नॉट फिलिंग वेल.. मला या साऱ्या प्रकारानंतर कसं तरी वाटतय.. तू ये ना इकडे.. तुझ्याशी बोलन तर खरंच बरं वाटेल मला..”
“सॉरी बेबी.. पण आता खरंच नाही येवू शकत मी.. बिझी आहे गं जरा.. मी एकीकडे इंटरव्हूसाठी अप्लाय केलेला ना.. परवा तिथे बोलावलंय मला.. सो मी त्याचीच तयारी करतेय जरा..
विधीशाने दिलेलं हे कारण आभाला खूप विचित्र वाटलं.. आज पर्यंत विधीशाने कधीच असं केलं नव्हतं.. मग आजच ती असं का वागली असेल याचा विचार आभा करू लागली.. तिने मग फोनवरचं संभाषण फार वाढवलं नाही.. तिला विधीशाशी बोलण्यात रसच वाटेनासा झाला.. तिने फोन कट केला तेव्हा तिला पुन्हा तसंच वाटू लागलं होतं जसं काही दिवसांपूर्वी ब्रेकअप नंतर वाटत होतं.. उदास, सगळंच चुकतय असं..

या साऱ्या खेळात फक्त आभाच अशी नव्हती जिला हे वाटत होतं.. सोहमचीही अवस्था तिचं होती.. काल पिकनिकवरून मुंबईला परतताच अदितीने त्याच्यासोबत ब्रेकअप केलं होतं.. ज्या मुलीसाठी गेली अनेक वर्ष तो थांबला होता.. त्याने अनेकदा विचारल्यावर तिने त्याला होकार दिला होता.. आणि तरीही ते नातं महिनाभरही टिकलं नव्हतं.. काय चुकलं होतं त्याचं.. काय कमी होती त्याच्यात.. त्याला सगळ्याच गोष्टींचा राग येत होता.. अदितीला त्याने या अचानक निर्णयाचं कारणहि विचारलं होतं..
“सोहम.. कारण असं काहीच नाहीये.. असं समज कि यु आर टू गुड फॉर मी.. आय डोंट डिझर्व यु..”
“असं का बोलतेयस आदि? स्वीटी यु आर द वन जिच्यामुळे मी खूष आहे.. हॅपी आहे.. यु आर माय लाईफ..”
“नो.. नाही..” अदितीचे डोळे भरून आले.. “सोहम माझ्यामुळे तू कधीच खूष राहणार नाहीस.. आय अॅम..” अदिती पुढे काहीच बोलू शकली नाही.. तिने गाडीच दर उघडलं आणि घाईघाईत ती गाडीबाहेर पडली.. सोहम बराचवेळ तिच्या बिल्डींगखाली तसाच थांबला होता..
रात्री घरी येवून तो खूप प्याला.. त्याने अदितीला मेसेज केले.. फोन करायचा प्रयत्न केला पण तिच्याकडून काहीच उत्तर आलं नाही.. वैतागून त्याला झोप लागली..
सकाळी उठल्यावर त्याला दोन मिनिटं काहीच रिअलाइज झालं नाही.. काल रात्री जे झालं ते खरं होतं का आपला भास.. मग हळूहळू तो भानावर आला.. दुसऱ्याच क्षणाला त्याने मोबाईल उचलून चेक केला.. अदितीचा काहीच रिप्लाय नव्हता.. त्याने तिला कॉल केला.. बेल वाजली आणि फोन कट केला गेला.. मग पुन्हा मेसेज.. मेसेजवर मेसेज.. सोहमची अस्वस्थता कमी होत नव्हती.. वाढतच चालली होती.. आता त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाच होतं या मागचं कारण जाणून घेणं.. आपलं नेमकं कुठे आणि काय चुकलं.. हे सारं कालच्या पिकनिकच्या दिवसातच घडलं होतं.. सारच.. अदिती कधीही आली नव्हती इतकी त्याच्या जवळ आली होती आणि त्याच संध्याकाळी तिने ब्रेकअपहि केलं होतं.. सोहम पिकनिकच्या दिवसात घडलेल्या घटना आठवू लागला..
त्यांनी आभा आणि आकाशला बाईकवर पाहिलं आणि अदितीने त्याच्या खांदयावर डोकं ठेवलं होतं.. बसमध्ये तिने अशी सीट निवडली होती जिथून आकाश आणि आभा त्यांना पाहू शकत होते.. त्याला आता आकाश आणि अदितीमध्ये सुरु असलेली स्पर्ध्या स्पष्ट होवू लागली.. त्याने अजून जुन्या काही आठवणी खंगळून काढल्या.. सोहमला होकार देण्याआधी अदितीच्या तोंडी सतत असलेलं आकाशचं नाव.. वाढदिवसाच्या जस्ट आधी अदितीने सोहमला दिलेला होकार.. बर्थडे पार्टीत आकाश आणि तिच्यात एका कोपऱ्यात उभं राहून सुरु असलेल्या गप्पा.. हॉटेलमधे आभा आकाश सोबत आल्यावर तिच्या चेहऱ्याचा उडालेला रंग..
सोहमला सारं काही क्लीअर झालं.. आपण इतके मूर्ख कसे होतो.. इतकी साधी गोष्ट आपल्याला कशी दिसली नाही.. त्याला अदितीचा राग येत होता.. त्याहून जास्त स्वत:ची चीड येत होती.. पण एका व्यक्तीमुळे तो त्याहून जास्त डिस्टर्ब झाला होता..
“आकाश.. इट वॉज ऑलवेज आकाश..”

आकाश कट्ट्यावर बसला होता.. त्याचे मित्रही सोबत होते.. कालच्या घटनेबद्दल तसं कुणी समोरून त्याला विचारत नव्हतं.. पण मागे सारे आपल्याच बद्दल बोलतायत असं त्याला न रहावून वाटत होतं.. पण त्याला त्या गोष्टीची पर्वा नव्हती... तो एकाच गोष्टीमुळे डिस्टर्ब होता.. आभा आज कॉलेजला आली नव्हती..
आभाने अदितीला ते सारं सांगितलं ते बरोबर होतं का चूक हा आता प्रश्नच नव्हता.. आकाशने या साऱ्या प्रकरणात स्वत:च इतक्या चुका केल्या होत्या कि दुसऱ्या कुणाला जज करण्याचा अधिकार तसाही त्याला उरला नव्हताच.. आता फक्त त्याला एकच करायचं होतं आभाशी भरभरून बोलायचं होतं.. त्याच्या मनात उठलेलं वादळ तेव्हाच शांत झालं असतं जेव्हा काही प्रश्नांची उत्तर त्याला मिळाली असती.. त्याने आभाला whatsapp करायला फोन उचलला.. पण मग तो थांबला.. योग्य भावना एकवेळ बोलून व्यक्त करता येतील पण लिहिल्यावर समोरच्याने त्या चुकीच्या वाचल्या तर ते कुणी निस्तरावं.. असाच काहीसा विचार आकाशच्या मनात आला.. त्याने whatsapp करायचा विचार सोडून दिला.. पण मग फोन करावा का.. ते तर अशा वेळी अजून जास्त कठीण.. आपण जे बोलतोय ते समोरच्याला पटतय कि नाही हे समोरासमोर असताना त्याचा चेहरा बघून ठरवता येतं, फोनला ती सोय नाही.. त्यामुळे तोही ऑप्शन आकाशने बाद केला..
आता कॉलेजमध्ये थांबून काही फायदा नव्हता.. तो खरं तर आभालाच भेटायला आला होता.. आज सकाळी त्याला उठायला उशीर झाल्यामुळे त्याला हे कळू शकत नव्हतं कि ती घरी आहे कि कॉलेजमधे त्यामुळेच तो घाईघाईत तयार होवून कॉलेजला आला होता.. पण त्याच्या या सगळ्या धावपळीचा काहीही फायदा झालेला नाही हे त्याला जाणवलं.. तो जायला उठला तोच त्याला त्याच्या नावाची हाक ऐकू आली.. त्याने वळून पाहिलं.. ती अदिती होती.. ती घाईघाईत त्याच्याकडेच येत होती.. खरं तर त्याला तिचं काहीही ऐकून घ्यायचं नव्हतं पण अदितीला पाहून तो तिथून हलला नाही.. ती त्याच्या समोर येवून उभी राहिली.. दोन क्षण कुणीच काही बोललं नाही.. एक ऑकवर्ड शांतता.. मग अखेर अदिती बोलली..
“आकाश सॉरी..” आकाशने फक्त तिच्याकडे पाहिलं आणि नजर फिरवली.. “मी चुकले काल.. अॅक्च्युअली इट वॉज नॉट आभाज मिस्टेक.. तिने मला खूप विश्वासाने सांगितलं होतं.. तेही आमचा तसा विषय निघाला होता म्हणून.. आय अॅम रिअली सॉरी पण काल..”
“अदिती.. राहू दे.. मला एक्सप्लेनेशन नको देवूस.. जे काहि सांगायचय ते आभाला सांग.. तू तिचा भरोसा तोडलायस..”
“मी तुम्हा दोघांना हर्ट केलय.. तिचीही माफी मागणार आहे मी.. पण ती आज आलीच..”
“मग तिची माफी माग.. तिने माफ केलं कि मग बोलू..”
आकाश वळला आणि चालू लागला.. त्याला अदितीला असं मागे सोडून जाताना खोप ऑड वाटत होतं.. आपण असं कधी करू हा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता.. पण त्याच्यासोबत हे असं सारं घडेल याचाही त्याने कुठे विचार केला होता..

आकाश निघून गेला तरी अदिती बराच वेळ तिथेच उभी होती.. आज सकाळी तीही कॉलेजला याचं विचाराने आली होती कि या साऱ्या प्रकरणावर अखेरचा पडदा टाकता येईल.. काल रात्री घरी गेल्यावर स्वत:ला रुममध्ये कोंडून तीने या सगळ्याचा बराच विचार केला होता.. ती खूप रडलीही होती.. एकीकडे सोहम फोन करत होता ते ती सतत कट करत होती.. दुसरीकडे आकाशला फोन करून त्याच्याशी सारं काही बोलावं असं तिला वाटत होतं.. पण काही गोष्टी समोरासमोर सोडवल्या तरच त्यांचा गुंता नीट सुटतो..
अदिती कट्यावर बसली.. तिने फोन पहिला.. सकाळी आलेल्या कॉल्सनंतर सोहमने परत कॉल केला नव्हता.. तिला त्याच्याबद्दलहि वाईट वाटत होतं.. तिला त्याच्याशी सारं काही बोलून क्लीअर करायचं होतं.. पण ती हिम्मत करू शकत नव्हती.. तिने सगळाच गोंधळ घालून ठेवलं होता.. तिने आकाशपासून दूर राहता येईल म्हणून सोहमला होकार दिला होता आणि त्याला उगाच या सार्यात गुरफटून घेतलं होतं.. पण ती एक एक करून आता सारं काही ठीक करणार होती.. पण तिला त्यासाठी आकाश आणि आभाला एकत्र भेटणं गरजेचं होतं.. आणि त्यासाठी एकच व्यक्ती तिला मदत करू शकणार होता..

आभा तिच्या मोबाईलवर पिकनिकचे फोटो बघत होती.. तीचे आणि आकाशचे फोटो.. एका मागून एक ती फोटो स्लाईड करत होती.. आणि एका फोटोवर ती अचानक थांबली.. त्या फोटोत तिच्या शेजारी प्रतिक होता.. आकाश आणि आभा कॅमराकडे बघत होते तर तो आभाकडे.. आभाने त्याचा फोटो झूम केला.. आभाकडे पाहून काय विचार करत होता तो.. त्याच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं.. पण त्याचा चेहरा प्रसन्न होता... आभा त्या फोटोकडे पाहत राहिली.. तिला प्रतीकची आठवण येवू लागली.. काल त्याने तिला ज्या प्रकारे फार्महाऊसरुन ट्रेनने घरी आणून सोडलं होतं.. तिला समजून घेतलं होतं.. काल जर तो नसता तर तिने काय केलं असतं.. कॉलेजच्या ग्रुप बरोबर त्या बस मधून परत येणं तिला तरी शक्य नव्हतं.. त्याला तिच्या मनात काय सुरु आहे कसं कळलं असेल..
ती प्रतिकबद्दल विचार करत असतानाच तिचा फोन वाजला.. ती दचकलीच.. पहिलं तर प्रतीकचाच फोन होता.. तिला आश्चर्य वाटलं.. ती स्वत:शीच हसली.. 100 वर्ष जगणार हा.. तिने फोन उचलला..
“हॅलो प्रती..” पण तिचं बोलण पूर्ण व्हायच्या आतच प्रतीकने बोलायला सुरुवात केली..
“आभा.. एक गोष्ट आठवली मला.. म्हंटल तुला फोन करून कळवावी..”
“काय?” आभा त्याच्या अशा सुरुवातीने फुल कन्फ्युज होती..
“मी तेरावीत असताना एक एकांकीका बसवली होती.. कॉलेजमधून नाही.. बाहेरून.. माझा एक मित्र आहे सायंसलाच त्याने लिहिलेली.. एकदम अॅबस्ट्रॅक्ट.. एक माणूस.. त्याला झालेला एक गंभीर आजार.. आणि त्या दोघांच एकमेकांशी डेव्हलप होणारं नातं..” आभाला तो काय बोलतोय ते कळत नव्हतं तरीही आपण काहीच ररस दाखवत नाहीओत असं वाटायला नको म्हणून ती म्हणाली..
“दोघं? म्हणजे याच्यावर प्रेम करणारी मुलगी...”
“नाही.. दोघं म्हणजे तो आणि आजार.. त्याचं रिलेशन.. आम्हाला वाटलेलं आम्ही नंबरात येणार.. सुपरहिट.. पण आमची एकांकिका तोंडावर पडली.. सगळ्या कॉलेजमध्ये हसू झालं आमचं.. मला खूप वाईट वाटलं होतं.. फ्रस्ट्रेशन आलं होतं मला.. पाच दिवस कॉलेजला गेलो नाही.. सहाव्या दिवशी गेलो तरी लोकांनी हसणं सोडलं नव्हतं.. मी तर कधीच नाटका बिटकाच्या भानगडीत पडायचं नाही असं ठरवून टाकलं होतं..”
“अच्छा..” पुन्हा आभाचं इंटरेस्ट दाखवण्याचा प्रयत्न..
“पण गम्मत अशी झाली कि दोन दिवसात लोक त्या एकांकिकेबद्दल विसरले आणि कधीही नाटक करणार नाही म्हणणाऱ्या मी पुठ्च्याच महिन्यात कॉलेजच्या स्कीट कॉम्पिटिशन भाग घेवून बक्षीस कमावल..”
“अरे वा..” आभा यावर काहीतरी बोलायचं म्हणून बोलली.. तिथे प्रतीकने एक पॉज घेतला हसला आणि म्हणाला..
“मी तुला हे सारं का सांगितलं ते कळलच नाही ना तुला..”
“अ... नाही..”
“आभा मला एवढंच सांगायचंय कि आपण चुकतो.. लोक आपल्यावर हसतात.. चर्चा करतात.. पण आपण पुढे जावू लागलो कि हे सारं मागे पडतं.. आजची भीषण वाटणारी टेन्शन्स, हातून घडलेल्या चुका उद्याचे किस्से असतात फक्त.. तेव्हा मी त्या अपयशाने इतका बिथरलो होतो.. पण आज हसू येत त्याचं.. त्यामुळे तुहि जे झालय त्याला फार महत्व देवू नकोस..”
आभाला त्याच्या सगळ्या कथेचा अर्थ आत्ता समजत होता..
“मी त्यावेळी सहा दिवसांनी कॉलेजला गेलो होतो.. लोक तरीही हसलेच होते मला.. तू कधीही यायचं ठरवलस तरी होणारी चर्चा होणारच आहे.. त्यामुळे मला खरच असं वाटतं कि तू उद्यापासून कॉलेजला ये.. कारण जितक्या लवकर u कॉलेजला येशील तितक्या लवकर हे सगळं नॉर्मल होईल..” प्रतिक आभाची रिअॅक्शन ऐकायला थांबला.. पण ती काहीच बोलत नव्हती.. “कळतय का मी काय म्हणतोय ते..?” तो म्हणाला..
“हो कळतय..”
“मग.. उद्यापासून येणार न कॉलेजला?”
“उद्या आईसोबत बाहेर जातेय.. परवापासून”
“परवा.. अच्छा.. म्हणजे डायरेक्ट शशीभाईंच्या भावाच्या हळदीलाचं जायचं तर..”
आभाला आठवलं.. तिच्या एकांकिकेचे लेखक शशिकांतने त्यांच्या सगळ्या ग्रुपला त्यांच्या भावाच्या हळदीला बोलावलं होतं..
“नाही.. तिथे नको.. कॉलेजलाच येईन..”
“ए.. प्लीजच.. आपण सगळे जातोय तिथे.. तुम्ही सगळे माझ्या एकांकिकेत काम करणारे आहात.. तुमच्या पर्सनल प्रॉब्लेममुळे मला एकांकिकेत कुठल्याही प्रकारचा अनकम्फर्टनेस नको आहे.. त्यामुळे तुम्ही समोरासमोर यायचंच आहे..”
“पण आही कॉलेजमधे..” आभा एक शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणाली..
“हे सागळ कॉलेजबाहेर विस्कटलय.. कॉलेजच्या बाहेरच निस्तरलं जाईल..”

आभाला कन्विन्स करण्यासाठी प्रतिकला थोडी अजून बडबड करावी लागली.. पण अखेर आभाने यायचं मान्य केलं.. प्रतीकने हसून फोन ठेवला आणि शेजारी पाहिलं.. त्याच्या शेजारी अदिती उभी होती..
“ती परवा यायला तयार झालीये..”
“थँक्स प्रतिक.. आता आकाश..”
प्रतीकने फोन उचलला आणि तो आकाशचा नंबर शोधू लागला..
“९७६९५६७४*” अदितीने आकाशचा नंबर त्याला सांगितला.. प्रतीकने अदितीकडे पाहिलं.. ती हसला आणि तिने सांगितलेला नंबर डायल करू लागला..


विधीशा दिवसभर अस्वस्थ होती... ती घरातच होती.. एकटीच.. परवा तिचा इंटरव्हू असला तरी त्याची काहीही तयारी तिला करायची नव्हती..  आत्ता उठून आभाकडे जावं असं तिला दिवसभरात कैक वेळा वाटलं होतं.. पण ती जाणार नव्हती.. हा हि तिच्या त्याच प्लानचा भाग होता.. जो तिने आभापासून लपवून ठेवला होता.. आभाला आकाश हवा होता पण विधीशाच्या मनात काहीतरी वेगळच होतं..

क्रमशः



Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४

ओलांडून जाताना... भाग - 3