ओलांडून जाताना.. भाग-२७



‘हिप्नॉटिझम’.. विधीशाचा हा एक आवडता विषय होता.. सायकोलॉजीशी संबधित हा एक भाग तिला नेहमीच आकर्षित करत आला होता.. थेटरच्या बाहेर उभं राहून ती हिप्नॉटिझम संबंधातलं पुस्तकं चाळत होती.. कारण आज पर्यंत तिने अनेकांना मस्करीमस्करीत हिप्नॉटिझम केलेलं असलं तरी एखाद्या व्यक्तीच्या नकळत त्या व्यक्तीला हिप्नॉटिझम करायची हि तिची पहिलीच वेळ होती.. हो आज संध्याकाळी तिच्या प्लानचा हा महत्वाचा भाग होता..
तिने पुस्तक बंद केलं आणि आजूबाजूला पाहिलं.. पु.लं.च्या पुतळ्याजवळचा चौथरा आता चांगलाच भरला होता.. तिच्या एका बाजूला एक कॉलेज विद्यार्थ्यांचा अख्खा ग्रुप बसला होता.. तर दुसऱ्या बाजूला शेजारीच एक कपल बसलं होतं.. पलीकडे एक एकटाच मुलगा बसला होता.. त्याच्या पलीकडे कोपर्यात बसून एक जण छोट्याशा लाल laptop वर काहीतरी लिहित होता..तिने समोर पाहिलं.. तिथे एक बारीकसा दिसणारा मुलगा उभा होता.. तो मुलगा मघापासून तिच्याकडे बघत होता हे तिने मार्क केलं होतं.. ती उठून त्याच्या दिशेने गेली..
“हाय..” तो मुलगा तिच्या अशा अटॅकमुळे जरासा गडबडलाच..
“अ.. मी?”
“हो.. हाय मी विद्युल्लता गावडे...” तिने हात पुढे करत बिनधास्त तोंडाला येईल ते नाव ठोकलं..
“मी.. मी जयदीप... जयदीप कांबळे..”
“ओ जयदीप.. कॅन यु जस्ट डू मी अ फेवर..”
पुढच्या पाचच मिनिटात विधीशाला समजलं होतं कि तिला यशस्वी रित्या अनोळखी माणसालाही हिप्नोटाईझ करता येतय.. तरीही आज संध्याकाळी ज्या व्यक्तीवर तिला हा प्लान आमलात आणायचा होता तिच्यावर तो काम करू देत हीच प्रार्थना ती मनातल्या मनात करत होती..

आभा थेटरच्या मागच्या भागात पोहोचली तेव्हा त्यांचा सगळा ग्रुप तिथेच होता.. सगळ्या मुली आभाला येवून भेटल्या.. त्या जाम  एक्सायटेड होत्या.. हि एकांकिकेची सर्वोच्च स्पर्धा मानली जायची.. आणि इथपर्यंत त्या सार्याच पहिल्यांदा आल्या होत्या.. आभा त्या साऱ्याजणींना खूप उत्साहात भेटली.. त्यात ती मुलगीही होती जी पूर्वी आभा ऐवजी लीड रोल करायची.. रीदिमा.. ती आजारी पडल्यामुळे आभाला ऐत्यावेळी ती जवाबदारी उचलावी लागली होती.. ती आता आजारपणामुळे बरीच विक वाटत होती.. तिने आभाला घट्ट मिठी मारली..
“मस्त कर.. माझ्यापेक्षाही भारी..”
“इतकं काही जमेल असं वाटत नाही.. पण प्रयत्न करेन..”
“धत्त तिच्या.. नमनालाच नेगेटीव्हिटी..” आभाच्या मागून एक ओळखीचा आवाज म्हणाला.. तिने वळून पाहिलं.. प्रतिक तिथे उभा होता..
“आभा.. जिंकायचय आपल्याला.. जमेल असं वाटत नाही काय? जमणारच.. असं म्हणायला पाहिजे..”
“प्रतिक..” आभाने त्याला जावून एक फ्रेंडली मिठी मारली.. आणि त्याला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाली.. “तिला बरं वाटावं म्हणून बोलले रे.. नाहीतर आपलं तर माहितीये ना तुला..”
“शाणी...” प्रतिक हसत म्हणाला.. “चला आपल्या परफॉर्मन्सला वेळ आहे.. सहावी आहे आपली एकांकिका.. तोपर्यंत जस्ट एक चक्री करून घेवूया..”
“लास्ट मिनिट रिव्हिजन?”
“लास्ट मिनिट नाही.. पहिल्या एकांकिकेत उरकून घ्यायचं.. मग बाकीच्या बघायला आपण मोकळे..”
“ओ.के. बॉस..” इतक्यात आकाश तिथे आला.. तो खरं तर आभाला बघून घाईत तिथे आला होता.. पण प्रतिक तिच्याशी बोलतोय बघून त्याचा फोर्स जरा कमी झाला..
“हाय आभा..” आभाने त्याच्याकडे पाहिलं आणि तिला मार्क झालं कि त्या दोघांच्या कपड्यांचे रंग मॅच होतायत.. स्काय ब्लू.. दोघंही त्याचं रंगाचे कपडे घालून आले होते.. आकाशलाही ते रिअलाइज झालं.. त्याने आभाकडे पाहिलं.. आभा गालातल्या गालात हसली.. इतक्यात प्रतिकच मोठ्याने म्हणाला..
“अरे वा.. मॅचिंग.. सही आहे..” इतक्यात प्रतीकचा फोन वाजला.. अदितीचा फोन होता.. त्याने फोन उचलला.. “हा अदिती.. बोल..” अदितीचं नाव ऐकून आकाश आणि आभाची नजर नकळतच एकमेकांकडे गेली.. ते इतकं अनएक्स्पेक्टेडली झालं कि आभाला दोन मिनिटं काय करावं तेच कळलं नाही.. ती फक्त आकाशकडे बघून कसं नुस हसली..
“हो.. हो.. आत्ता पाठवतो कुणाला तरी..” प्रतीकने फोन कट केला.. आणि आकाशकडे पाहून म्हणाला.. “आकाश.. जा जरा.. अदितीची गाडी गेटवर आहे.. जरा जावून तिला बॅग आणायला मदत कर..”
“तिची बॅग मी का उचलू?”
“ए.. पर्सनल बॅग नाहीये तिची.. नवीन मुलींचे कॉस्च्युम्स आहेत त्यात.. परत गाडी पार्किंगमध्ये गेली तर तिथे जावून आणावी लागेल तुला.. इथेच आहे.. जा लवकर..” तरीही आकाश जाण्याची इच्छा दाखवत नव्हता..
“बघ ना अजून कुणीतरी..”
“आभाचेही कपडे आहेत त्यात.. आणतोयस का सांगू तिला जा तशीच परत..”
आकाशने आभाकडे पाहिलं.. ती फक्त हसली.. आकाश नाईलाजाने गेटच्या दिशेने निघाला..
“मात्रा बरोबर लागू पडली..” प्रतिक हसून म्हणाला.. “ग्रुपमध्ये अजून १-२ जण तरी सापडतील ज्यांच्यावर तुझ्या नावाची अशीच मात्रा लागू होईल..”
“चल.. तुझं आपलं काहीतरीच.. कुणावरही माझ्या नावाचा काहीही परिणाम होणार नाहीये..”
“गैरसमज आहे तुझा.. माझ्यावर होईल परिणाम.. ट्राय करून बघ हवं तर..” प्रतिक खूप सिरीअसली म्हणाला आणि हसून बसच्या दिशेने निघाला..
तो काय बोलला.. त्याचा अर्थ काय होता... त्याला काय म्हणायचं होतं.. आभाला दोन क्षण काहीच कळलं नाही.. ती फक्त जाणाऱ्या प्रतीकच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत राहिली..

अदिती गेटच्या आतल्या बाजूला एकटीच उभी होती.. तिच्या शेजारी ती बॅग ठेवलेली होती.. कोण येतय त्याची वाट पाहत ती त्या दिशेला बघत होती.. त्याचवेळी समोरून तिला आकाश येताना दिसला.. प्रतीकने याला मुद्दाम पाठवलं होतं का? हा प्रश्न तिच्या मनात चमकून गेला..
आकाशनेही अदितीला पाहिलं.. सुंदर असा व्हाईट कलरचा टॉप आणि डार्क ब्लू जीन्स.. केसांना एक तशीच छान व्हाईट कलरची क्लिप.. आजूबाजूच्या बऱ्याच मुलांच्या नजर तिच्यावर खिळलेल्या आकाशला जाणवत होत्या.. ‘तू अशी नसतीस तर किती बरं झालं असतं अदिती.. माझ्या मनात आजही तुझी एक खास जागा आहे.. पण तू तिथे बसवण्या लायक नाहीस.. प्रेमाचा अर्थच तुला कललेला नाही..’ आकाशने मनात विचार केला.. त्याने आदितीपासून नजर फिरवली..
आकाश तिच्या समोर येवून उभा राहिला.. तसं अदिती कसनुस हसून त्याला म्हणाली..
“हाय आकाश..”
“हीच का ती बॅग?” आकाश तिच्याकडे न पाहताच म्हणाला..
“हो” तिचा होकार ऐकताच आकाशने बॅग उचलली आणि तो अदितीला पाठीच ठेवून आला होता त्या दिशेला निघाला..
“आकाश” अदितीने हाक मारली.. तसा आकाश थांबला.. “आज शेवटचा दिवस म्हणून आपण एकमेकांशी जरा नीट बोलूया का? नाही.. परफॉर्म करायचय एकत्र.. उगाच पर्सनल गोष्टींचा परिणाम एकांकिकेवर..”
“मी माझं पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य वेगवेगळ ठेवू शकतो.. तुला जमणार नसेल तर नॉट माय प्रॉब्लेम..” आकाश तिच्याकडे न बघताच म्हणाला आणि चालू लागला.. अदितीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.. तिने तसंही ठरवलं होतं.. आज नंतर आकाश आणि आभाच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही.. तिने डोळे पुसले.. आपल्या खांद्यावरची ज्यूट बॅग सावरली आणि तीहि घाईघाईत आकाश गेला होता त्या दिशेला निघाली..
हा सारा प्रकार थेटरच्या पोर्च मधून कुणीतरी पाहत होतं.. तिथे आता स्पर्धा पहायला आलेल्या लोकांची गर्दी वाढू लागली होती.. त्यामुळे त्याला कुणीच पाहिलं नाही.. खांद्यावर मोठी सॅक अंगात पूलओव्हर.. तो अदिती जाई पर्यंत तिच्याकडे पाहत होता.. हा तोच होता जो मघाशी आभा आणि विधीशाला पाहत होता.. हा सोहम होता..

अदिती घाइघाइत बसच्या दिशेने निघाली होती.. मागच्या बाजूला एकांकिकेच्या लोकांची बरीच वर्दळ होती.. अदिती लगबगीने जात होती आणि तिला चालता चालता हिसका बसला.. तिने वळून पाहिलं तिच्या खांद्यावरची ज्यूट बॅग कुणीतरी ओढली होती.. तिने वाळून पाहिलं आणि ती दचकलीच.. तिची बॅग फाटली होती.. कुणाच्या तरी सेट मधलं एक लोखंडी झाड तिथे उभं केलेलं होतं.. त्याच्याच एका फांदीला अडकून अदितीची ज्यूट बॅग फाटली होती.. तिने त्या फांदीतून बॅग सोडवली तशी ती अजूनच फाटली आणि बॅगेतल सगळं समान खाली पडलं..
अदितीने कपाळावर हात मारून घेतला.. एकतर आधीच ती फ्रस्ट्रेट होती.. त्यात हे.. ती वैतागून तिचं सामान गोळा करू लागली.. तिथेच उभी असलेली एक मुलगीही तिच्या मदतीला आली.. जमिनीवर पडलेली अदितीची पुस्तक.. वह्या.. पैशाचं पाकीट.. खाण्याचा डबा.. हेडफोन.. मेकअपचं समान आणि इतर बऱ्याच गोष्टी.. अदिती आणि ती मुलगी पटापट त्या आवरू लागल्या.. लकीली अदितीच्या बॅगमध्ये एक प्लास्टिकची कॅरीबॅग होती.. त्यात त्या दोघींनी मिळून ते सगळं भरु लागल्या.. त्याचं दरम्यान अदितीचा फोन वाजला.. प्रतीकचा फोन होता.. तो तिला बसमध्ये चक्रीसाठी बोलवत होता.. अदितीने त्याला येतेच असं सांगून फोन कट केला.. तोवर त्या मुलीने सगळं आवरलं होतं.. अदितीने त्या मुलीचे आभार मानले आणि अदिती घाइघाइत बसकडे पळाली.. आपलं सगळं सामान त्या कॅरीबॅगमध्ये मावलं यामुळे अदिती खुश होती..
पण तिचं सगळं सामान त्यात मावलं नव्हतं.. त्यात तिची गेल्या वर्षीची डायरी नव्हती.. ती तर आत्ता त्या मुलीच्या हातात होती.. तिने डायरी उघडली आणि आकाशने दिलेलं गुलाब आणि ग्रीटिंगकार्ड तिला दिसलं..

क्रमशः


Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४

ओलांडून जाताना... भाग - 3