ओलांडून जाताना.. भाग-१६



आभाच्या घरात सगळ्यांना आजकाल घडणाऱ्या गोष्टींच जरा आश्चर्यच वाटत होतं.. दर दोन दिवसाआड विधिशा त्यांच्या घरी येत होती.. यात वावगं काहीच नव्हतं.. त्यांनाही तिच येणं आवडायचं.. पण त्यांना आश्चर्य याचं वाटायचं कि ती जेव्हाही यायची तेव्हा आभाच्या रुममध्ये जायची आणि दोघीही दार बंद करून तासनतास काहीतरी बोलत बसायच्या.. त्याचं काय सुरु आहे? हि गहन चर्चा कशाबद्दल आहे? याचा कुठलाही क्लू कुणालाच लागत नव्हता.. विचारलं तर त्या दोघींपैकी कुणी काही सांगायचंहि नाही.. आताही विधीशा आणि आभा दार बंद करून काहीतरी बोलत होत्या.. कांदाभाजीची प्लेट आत नेण्याच्या बहाण्याने आईने आतलं काही कळतंय का हे शोधून काढायचा प्रयत्न केला पण ती त्यात सपशेल अपयशी झाली होती.. अखेर आईने तो नाद सोडला आणि ती आपल्या कामाला लागली..
पण रूममधलं वातावरण खरोखर किती गंभीर आहे याची आईला अजिबात कल्पना नव्हती.. रुममध्ये आभा अस्वस्थपणे फेऱ्या मारत होती.. तिला विधीशाला बरंच काही सुनवायचं होतं.. पण नेमकी सुरुवात कुठून करावी हा प्रश्न तिला पडला होता.. आज आकाशने तिला डेटसाठी विचारलं होतं आणि विधीशाच्या स्टुपिड प्लान नुसार तिला त्याला नाही म्हणून यावं लागलं होतं.. त्याचा आभाला खूप राग आला होता.. पण जणू असं काही घडलंच नाहीये अशा थाटात विधिशा आरामात बसून कांदाभजी खात होती.. तिसऱ्या भाजीला ताटातला सगळा सॉस लावून विधीशाने खाल्ला आणि अगदीच नॉर्मली आभाला म्हणाली..
“जरा सॉस आणतेस का आभा..” आभाच्या तळपायची आग मस्तकात गेली..
“तुला लाजही वाटत नाही ना विधी?”
“सॉस खायला कसली लाज?”
“विधी.. उगाच स्मार्ट बनू नकोस हं.. तुला माहितीये मी कशाबद्दल बोलतेय ते..”
विधीशाने नाईलाजाने प्लेट बाजूला ठेवली आणि टिश्यूने हात पुसले..
“आभा.. मी दर दोन दिवसांनी इथे येते.. आणि सारं काही कसं नॉर्मल सुरु आहे हे तुला सांगते.. आकाशची सायकोलॉजी समजावते.. आणि परत जाते.. मला तेच तेच करून कंटाळा येतोय आता.. तुला तेच तेच ऐकून कसा कंटाळा येत नाही..”
“कारण हे माझ्याबाबतीत घडतय ओके.. आज चांगला आलेला चान्स मी तुझ्या म्हणण्यानुसार घालवलाय.. आता जर तो चान्स परत आलाच नाही तर?”
“बेबी.. त्याने तुला डेटसाठी विचारलं तर तू त्याला नकार द्यायचास हे मी तुला सांगितलं होतं राईट? याचा अर्थ असं होणार हे मला आधीच कळलं होतं.. पण मग मी जर आता सांगतेय कि असं परत होणार आहे तर माझ्यावर विस्वास का ठेवत नाहीएस तू?”
आभाला हे आत्ता रिअलाइज झालं.. खरंच होतं हे.. विधीशाने हे तिला हा सारा प्लान सुरु झाला त्याच्या सुरुवातीच्या स्टेजलाच सांगितलं होतं.. तसं खरच घडलं होतं.. म्हणजे आपण खरच राईट ट्रॅकवर आहोत हे आभाला जाणवलं.. पण प्रेमाचा किंवा पैशाचा प्रॉब्लेम आयुष्यात आला ना कि माणसाचं मनच त्याचं सगळ्यात मोठं वैरी बनून जातं.. जगातल्या सगळ्या वाईट गोष्टी ते स्वत:सोबत घडताना इमॅजिन करू शकतं.. आभाचंहि आता तसच होत होतं.. पण तरीही तिने विधीशावर विश्वास ठेवायचा निर्णय पक्का केला..
“तू म्हणतेयस ते बरोबर आहे विधी.. पण असं झालं तर यावेळी मी त्याचं डेटचं प्रपोजल स्वीकारायचं कि नाही?”

अदिती ठरल्याप्रमाणे वेळेवर कॉलेजला पोहोचली.. आज रविवार होता त्यामुळे कॉलेजमधे शुकशुकाट होता.. प्रतीकने खास परमिशन काढून त्यांच्या रिहर्सल्ससाठी ऑडी ओपन करून घेतला होता..
अदिती ऑडीत पोहोचली तेव्हा सगळे आले होते.. पण रिहर्सल सूर झाली नव्हती.. अदिती आत आल्या आल्या प्रतिक तिच्या जवळ आला.. तो प्रचंड वैतागलेला वाटत होता..
“रीदिमाने तुला ती आज येणार नाहीये असं काही सांगितलं होतं का?”
आभाला या अचानक झालेल्या अटॅकचा अर्थच कळला नाही.. रीदिमा हि त्यांची लीड नाटी होती.. लैलाचा रोल करणारी..
“काय? रीदिमा आलेली नाहीये का?”
“मी काय डोक्यावर पडलोय का तुला असा प्रश्न विचारायला..”
आभाला यावर खरं तर ‘हो’ म्हणायचं होतं.. पण तिने प्रतीकचा मूड पाहता मस्करी करायचं टाळलं..
“प्रतिक आमचं असं काहीच बोलणं झालेलं नव्हतं.. तू फोन केलास का तिला..”
“स्वीच ऑफ आहे.. काय केअरलेस आहे मुलगी.. हे असे लोक काय उद्या प्रोफेशनली काम करणार.. नॉनसेन्स..” आभाने त्याला शांत केलं..
“तिचा असेल काहीतरी प्रॉब्लेम.. लेट येणार असेल..”
“तिच्या घरी ट्राय केला फोन.. घरी कुणीच नाहीये..”
“ठीक आहे येईल ती.. आपण तोपर्यंत बाकीचं करून घेवूया..”
“मला काहीही करायचं नाहीये.. हे काय स्टार लागून गेले का.. इथे प्रत्येक जण आपला संडे सोडून आलाय तो काय चू____ आहे का?” आभा पहिल्यांदा त्याच्या तोंडून असं काही ऐकत होती.. म्हणजे प्रतिक खरच चिडला होता.. त्याने सगळ्यांकडे पाहिलं..
“संडे एन्जॉय करायचा होता ना.. जा.. मजा करा.. आज रिहर्सल नाही..”
तो एवढं बोलून वळला आणि दारातून सरळ बाहेर पडला..

      कालपासून आकाशच्या डोक्यात एकच विचार घोळत होता.. आभा त्याला नाही का म्हणाली असेल.. तिने बिझी असल्याचं कारण दिलं होतं पण ते खरं होतं का? का ती त्याला टाळत होती.. आधी त्याला राग आला.. वाटलं कि आता परत तिला विचारायचं नाही पण दुसरं मन म्हणू लागलं काय माहित खरंच ती बिझी असेल.. दरवेळी तातडीने, कुठलाही विचार न करता त्याने घेतलेले त्याचे निर्णय नेहमीच चुकले होते.. त्यामुळे आता त्याला पुन्हा तिच चूक करायची नव्हती.. पण तरीही आभा नेमका काय विचार करतेय हे जाणून घेण्याचा काहीतरी मार्ग शोधणं त्याच्यासाठी गरजेचं होतं..
      प्रतीकने अचानक रिहर्सल डिसमिस केली आणि त्याच वेळी आकाशची ट्यूब पेटली.. हीच योग्य वेळ होती.. आता आभा बिझी नाहीये हे त्याला माहिती होतं.. ती रिहर्सलसाठी वेळ काढूनच आली असणार.. त्यामुळे आता जर तिने आपण बिझी आहोत असं कारण सांगितलं तर त्याला कळू शकणार होतं कि ती त्याला टाळतेय.. आणि जर ती यायला तयार झाली असती तर.... तर काही प्रश्नच नव्हता..
      प्रतिक ऑडीच्या बाहेर गेला आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने झालेल्या गोष्टीवर रिअॅक्ट करू लागला.. बहुतेक सगळ्याच मुलांना आनंद झाला होता.. काही लांब राहणाऱ्या मुली तेवढ्या वैतागल्या होत्या.. त्या कुठल्यातरी सिनेमाला जायचा प्लान बनवू लागल्या.. आभा फोन काढून रीदिमाला फोन ट्राय करू लागली.. ऑडीत कधीकधी नेटवर्क मिळायचं नाही त्यामुळे आभाला फोन करायला बाहेर जावं लागलं.. आकाश मुलांच्या घोळक्यात बसून हे सगळं ऑब्झर्व्ह करत होता.. मुलींच्या घोळक्याने काहीतरी प्लान बनवला.. आता त्या आभाला शोधू लागल्या.. त्यांना आभालाही सोबत न्यायचं होतं.. तसं झालं असतं तर आकाशच प्लान फसला असता.. त्याला त्यांच्या आधी हालचाल करणं भाग होतं.. पण त्याच्या मित्रांना संशय न येता त्याला ते करायचं होतं.. त्यानेही खिशातून फोन काढला आणि नेटवर्क मिळत नसल्याच्या बहाण्याने तो बाहेर पडला..
      तो बाहेर पडायला आणि अदिती आत निघायला एकच गाठ पडली.. ती रीदिमाच्या फोनच्याच तंद्रीत होती..
“अरे लागताच नाहीये रीदिमाचा फोन..”
“हं!!” आकाशला दोन मिनिटं काहीच कळलं नाही..मग त्याला रिअलाइज झालं.. “ओ.. ठीक आहे.. लागेल..” त्याचा टोन अगदीच डिसइंटरेस्टेड होता..
“तू.. दुसरं काही बोलायला आला होतास का?”
“आभा.. ते..” पहिल्यांदा नकार मिळालेला प्रश्न दुसऱ्यांदा विचारणं किती जड असतं ते त्याला आज कळत होतं..
“काय?”
“आभा तू.. तू कॉफी प्यायला येतेस आत्ता..” आभाला त्याचा रोख कळत होता तरी मुद्दामच तिने विचारलं..
“सगळे जातायत का?” आकाशच हृदय धडधडू लागलं.. हिला आपल्यासोबत जायचंच नाहीये अशी त्याला खात्री वाटू लागली..
“नाही.. फक्त तू आणि मी.. आज दुपारी लंचला वेळ नव्हता न तुला.. म्हणून म्हंटल आता..”
आभा काहीतरी बोलायला जाणार तोच कुणीतरी मागून तिला हाक मारली.. तिने वळून पाहिलं... तो प्रतिक होता..
“तुम्ही इथेच थांबलायत अजून गेला नाहीत..”
“नाही.. निघतच होतो..” आभा म्हणाली..
“बरं झालं तू मला भेटलीस.. शिवाजीला सही रे सहीचा प्रयोग आहे.. आत्ता वाचलं पेपरात.. म्हंटल आज तसाही वेळ आहे.. बघून घेवू..”
आभाने वळून आकाशकडे पाहिलं.. त्याचं तोंड पडलं होतं.. तो आत जायला निघाला.. जाता जाता प्रतिकच वाक्य त्याच्या कानावर पडलं..
“भरत सरांशीही ओळख करून देतो तुझी.. मला ओळखतात ते..”
      आकाशला आता आभा येईल याचा काहीच चान्स दिसत नव्हता.. सही रे सही तिचं आवडतं नाटक होतं आणि भरत जाधव आवडता अभिनेता.. हा चान्स ती जावू देणार नव्हती.. आकाश आत आला आणि त्याच्या बॅगजवळ जावून ती आवरू लागला.. तो बॅग भरत असताना पोरांनी त्याला पार्कात येण्यासंबंधी विचारलं.. त्याने बाहेर जायची इच्छा नसल्याचं सांगून त्यांना टाळलं.. तो बॅग आवरून वळला तर समोर आभा उभी होती.. तिला पाहून त्याला आश्चर्यच वाटलं..
“खरच इच्छा नाहीये का बाहेर जायची.. मी उगाचच नाटकाचा प्लान कॅन्सल केला असं दिसतय..”
आकाशसाठी हे सरप्राईज होतं.. काय बोलू आणि काय नको हेच त्याला कळे ना.. तो नुसता हसत सुटला..
     
      बऱ्याच दिवसांनंतर आकाशची संध्याकाळ इतकी छान जात होती.. आभाही खूप एन्जॉय करत होती.. दुसऱ्या डेट प्रपोजलला होकार द्यायची परमिशन विधीशाने दिली होती.. पण ते प्रपोजल इतक्या लवकर मिळेल असं आभाला मुळीच वाटलं नव्हतं..
      ते जुहू चौपाटीला गेले होते.. तिथे कॉलेजमधलं कुणीही भेटणार नाही याची आकाशला खात्री होती.. आभाही तयार झाली कारण तिला समुद्र खूप आवडायचा.. बाईकवरून जुहू पर्यंतच्या प्रवासात आकाश जणू हवेत उडत होता.. अदिती मागे बसलेली असताना असचं वाटायचं नाही.. त्याच्या मनात विचार आला आणि त्याला विचित्रच वाटलं.. त्याचं मन अजूनही त्याला असं का भरकटवत होतं याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं.. त्याने तो विचार मनातून काढून टाकला..
      ते चौपाटीवर पोहोचले तेव्हा आभाला पहिल्यांदा इतकं ऑकवर्ड वाटत होतं.. हि भावना नक्की काय होती हे तिलाच कळत नव्हतं.. तिला लाजावसं वाटत होतं त्याचवेळी हसावसं वाटत होतं.. कुणी पाहू नये असंही वाटत होतं आणि सगळ्यांनी पहावं अशीही इच्छा होती.. या भावनेला नक्की काय म्हणत असावेत?... प्रेम? ती हा विचार करून स्वत:शीच हसली..
      सुरुवातीला वाटणारा ऑकवर्डनेस हळूहळू दूर होत गेला.. ते चौपाटीवर एन्जॉय करू लागले.. पाळण्यात बसले, गोळा खाल्ला, रिंगा टाकून आकाशने एक २ रुपयाचा पार्लेजीचा पुडा आणि एक पेप्सी जिंकलं, त्यांनी शेवपुरी पाणीपुरीवर यथेच्छ ताव मारला.. आकाश जे काही म्हणत होता ते करायला आभा तयार होती.. आणि आभाला ज्याने आनंद मिळेल असं काहीही करायला आकाश तयार होता..
      सूर्य मावळतीला आला तेव्हा चौपाटीवरची सगळी मजा त्यांनी लुटली होती.. त्यामुळे मावळतीचा सूर्य बघत ते चौपाटीच्या वाळून नुसतेच बसून राहिले..
“आभा.. आज खूप मजा आली.. बऱ्याच दिवसांनी..” आकाश आभाकडे पाहत म्हणाला..
“हो.. खरंय..” आभा म्हणाली आणि परत सूर्याकडे बघू लागली.. आकाश मात्र तिच्याकडेच बघत होता.. काही वेळ तो तसाच तिला बघत राहिला.. आभाने ते जाणवून पुन्हा त्याच्याकडे पाहिलं.. आणि त्याने नजर फिरवली..
“काय गंमत आहे ना आभा.. गेल्या काही दिवसात सगळ्या गोष्टी किती बदलून गेल्यायत आपल्यातल्या..” आभा त्याच्याकडे पाहून फक्त हसली.. “तू खरच खूप बदलली आहेस आभा.. एक वर्ष काय बदललं तू खरंच काही वर्षांनी मोठी झाल्यासारखी वाटतेयस..”
“अरे बापरे.. म्हणजे वयस्कर दिसायला लागले आहे का मी..” आभा सिरीअसली म्हणाली आणि हसू लागली.. आकाशही हसू लागला..
“हेच.. किती मॅच्युअर्ड.. किती सहज.. तू ज्या प्रकारे हे सगळं हँडल केलस ना आभा.. इट्स जस्ट ग्रेट..” आभा यावर फक्त हसली.. आणि वाळूकडे बघत त्यात रेघोट्या ओढू लागली.. “जे झालं त्या बद्दल खरंच सॉरी आभा.. आय वॉज..”
“आकाश.. याबद्दल बोललोय आपण.. इट्स ओके..”
“नाही यार.. प्रेमात खरच खूप वेडेपणा केलाय मी.. अदितीवर खरच खूप प्रेम करतो.. करायचो मी.. मनापासून.. पण तिने कधी पत्ताच लागून दिला नाही कि तिचं..” आकाश बोलता बोलता गप्प झाला.. आभा त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती.. त्याच्या डोळ्यातलं दु:ख तिलाही जाणवत होतं.. अदितीवरच्या प्रेमाबाबद बोलताना ‘करायचो’च्या आधी तो बोललेला ‘करतो’ आभाने बरोबर हेरला होता..
“सोड आकाश.. सगळं होईल ठीक..”
“पण मलाच ते ठीक करायचं नाहीये.. आता ते ठीक होणारही नाही.. मी मूव्हऑन झालोय.. सोड ना अदिती..” आकाशला आपण काय बोलून गेलो हे कळायला दोन क्षण लागले.. त्याने आभाकडे पाहिलं.. ती त्याच्याकडे पाहून शांतपणे हसत होती..
“खरंच आकाश? तू खरंच मूव्ह ऑन झालायस??” आभाने आकाशला विचारलं..
आकाशात सूर्य मावळला होता.. काळोख पसरू लागला होता..
      आकाश आणि आभा परत जायला निघाले त्या आधी आकाशने अनेकदा आभाची माफी मागितली होती.. आभाने तिला त्याचं काहीच वाटलेलं नाही असं सांगून त्याला सारं विसरायलाहि सांगितलं होतं.. पण आकाश अजूनही गिल्टी होता.. पण आभाला खरोखरंच याचं फार काही वाटलं नव्हतं.. विधीशाने तिला आधीच असं कधीतरी घडू शकेल याची कल्पनाही दिली होती.. खरं तर तिला आकाशबद्दल वाईट वाटत होतं.. त्याच्या डोळ्यातलं दु:ख जेन्युअन होतं.. त्याला आत्ता आधाराची गरज होती.. अदितीला विसरून जाण्यासाठी आभाच्या दिलखुलास मैत्रीची गरज होती.. आभाला प्रश्न पडला होता कि तिने काय करावं.. आपल्या आयुष्यातलं पहिलं प्रेम मिळवण्यासाठी हे नाटक सुरु ठेवावं.. का सगळं काही विसरून मित्राच्या मदतीला मित्र म्हणून जावं..
     
      अदिती तिच्या डान्सक्लास बाहेर उभी होती.. आता ती इथे शिकत नसली तरी सोहमला भेटायला ती इथे आली होती.. रिहर्सल्स न झाल्यामुळे आज तिच्याकडे भरपूर वेळ होता.. त्यामुळे ती दुपार पासून इथेच होती.. आत्ताच एक डान्स सेशन संपवून ती रिलॅक्स व्हायला बाहेर आली.. ती येवून मिनिटभरही झाला नव्हता आणि तिला समोरच्या रस्त्यावर कुणीतरी ओळखीचं दिसलं.. जुहू मध्ये संध्याकाळच्या वेळी ट्राफिकजाम नेहमीच होतं.. त्याचं जाम मधे एक बाईक उभी होती.. ज्यावर आकाश आणि आभा बसलेले होते..
      आभाने अदितीला ती आकाशची गर्लफ्रेंड नाहीये असं सांगितलं होतं.. ते खरं असेल तर रिहर्सल दुपारीच डिसमिस झाल्यावर हे आत्ता इथे काय करत होते.. खरं तर अदितीने हा विचार करण्याच काहीच कारण नव्हतं.. पण तिच्याही नकळत तिच्या मनात असलेलं आकाश बद्दलच प्रेम तिला तो करायला भाग पडत होतं..

क्रमशः



     

Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४

ओलांडून जाताना... भाग - 3