ओलांडून जाताना.. भाग-१५
दिवस भरभर जात होते.. आभा, अदिती, आकाश या तिघांच्याही
आयुष्यात आता एक प्रकारचा ठेहराव आला होता.. अस्वस्थता होती.. पण कदाचित एकांकिकेच्या
प्रेशरमुळे त्या साऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता..
प्रतिकसोबत शशिकांतची जी चर्चा झाली होती (भाग १५) त्यात
शशिकांतने आभाची बरीच स्तुती केली होती.. त्यामुळे प्रतीकही आजकाल आभावर
वेगवेगळ्या जवाबदार्या टाकत होता.. एकांकिकेच्या दरम्यान असलेले काही लाइव्ह
व्हॉइस ओवर्स जो आधी प्रतिक स्वत: द्यायचा ते तो आभाकडून तयार करून घेत होता..
अदिती आणि आकाशने त्यांच्या डान्समधला प्रॉब्लेम सोडवण्याचा
पुरेपूर प्रयत्न केला होता आणि त्यात ते यशस्वीही झाले होते.. काही सिंक्रोनाइज्ड मुव्हमेंटस
त्यांनी ठरवून घेतल्या होत्या जेणेकरून त्यांच टायमिंग परफेक्ट होवू शकेल आणि आता
ते डान्समधे रिप्लेसमेंट होवून आलेल्या काही पोरांच्या प्रॅक्टिस घेण्यात बिझी
झाले होते..
पण त्यामुळे आकाश अदितीला एकमेकांसोबत जास्त वेळ घालवावा
लागत होता आणि तिथे आभा आणि प्रतिक एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत होते..
आभा हे सारं एन्जॉय करत होती.. म्हणजे ओव्हर ऑल हि अख्खी
प्रोसेस तर तिला आवडतच होती.. पण या साऱ्यामधे आकाशच्या झालेल्या अवस्थेची तिला
जास्तच गम्मत वाटत होती.. त्याची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी गत झाली होती..
अदिती सोबत वेळ घालवताना त्याचं एक मन सतत तिच्याकडे ओढलं जायचं तर तिथे आभाला प्रतिकसोबत बघून त्याला जास्तच त्रास व्हायचा..
आभाने एका संध्याकाळी विधीशासोबत बोलताना तिला हे सार तिला
खूप रंगवून रंगवून सांगितलं.. विधिशा तिला बऱ्याच दिवसांनी भेटत होती.. नाहीतर त्याचं
तसं फोनवरच बोलणं व्हायचं..
“चला म्हणजे आपल्या प्लानला देवही सपोर्ट करतोय तर..”
आपल्या हातातलं चीप्सच पाकीट खाली ठेवत विधिशा म्हणाली..
“म्हणजे.. आता नक्की कशाबद्दल बोलतेयस तू?”
“प्रतिक.. बेबी! प्रतिक बद्दल बोलतेय मी.. वॉट अ टायमिंग..
वा.. आपल्याला हव्या त्या ठिकाणी बरोबर एन्ट्री झाली त्याची..”
“आकाश जेलस होतोय त्याबद्दलच बोलतेयस न तू..”
“वा आभा.. तू पण हुशार झालीएस.. जेलसी हि कुठल्याही
नात्याची बेसिक नेसेसिटी असते.. जेलसी आणि इनसिक्युरिटी.. प्रतिक आकाशसाठी बरोबर
त्या दोन गोष्टी उभ्या करतोय..”
“पण डोंट यु थिंक इट्स बिट ऑड.. म्हणजे हे सगळं करून आकाशला
माझ्याबद्दल जे वाटेल ते खरंच प्रेम असेल?”
“100 पर्सेंट.. जगातलं कुठलहि प्रेम याचं नियमांवर काम
करतं.. हे बघ.. आकाश अदितीच्या प्रेमात का पडला असेल असं वाटतं तुला.. कारण त्याला
ती अप्राप्य होती.. राईट ना? अप्राप्य..” तिने बोलता बोलता आभाला विचारलं.. आभाने
होकारार्थी मान हलवली तशी विधिशा खूष झाली.. “येस!!.. तर आकाश वॉज शुअर कि अदिती
सारखी पॉलिशड मुलगी त्याला कधीच मिळणार नाही आणि याच इनसिक्युरिटीमुळे ते आकर्षण
वाढत गेलं.. आणि आकाश अदितीला प्राप्त करण्यासाठी काहीही करायला तयार झाला..”
“इज इट?” आभाला अजूनही हि आयडिया पचत नव्हती..
“येस बेबी.. फिल्डरच्या हातात सहज आलेल्या कॅचेसपेक्षा
हातातून सुटलेल्या एका महत्वाच्या बॉलचं दुख: त्याला जास्त असतं.. तसंच प्रेमाचं
असतं म्हणूनच प्रत्येक पुरुष आणि मोस्ट ऑफ द केसेसमधे बायकाही आपला पासवर्ड अशा
एका व्यक्तीच्या नावाने ठेवतात ज्याच्यावर त्याचं खूप प्रेम होतं पण लग्न होवू
शकलं नाही.. जे मिळायला कठीण असतं त्याची किंमत जास्त असते आभा..”
“पण म्हणजे मी आता आकाशला अप्राप्य वाटू लागले असेन..?? एका
प्रतिकमुळे?” आभाला हे अजूनही पटत नव्हतं..
“एक प्रतिक काय किंवा अजून दहा मुलं काय.. हि थिअरी अशीच
वर्क करते.. त्यामुळे जे चाललंय ते आपल्याला बरोबर मार्गावर घेवून जाणार..”
आभा विचारात हरवली होती.. तिने विधीशाकडे पाहिलं आणि तिला
विचारलं..
“पण आपण ज्या मार्गावर जायचं म्हणतोय तो मुळात बरोबर आहे
ना?”
आभाला तिच्या प्रश्नाचं उत्तर येत्या काही दिवसांमध्येच
मिळणार होतं..
त्या दिवशी प्रतिक आणि आभा वेळ उलटून गेली तरी रिहर्सलला
पोहोचले नव्हते.. आभा आणि आकाश सकाळी एकत्रच कॉलेजमधे आले होते.. मग ती गेले कुठे
हा प्रश्न आकाशला सतावत होता.. गेले काही दिवस प्रतिक आणि आभाची जवळीक पाहून तसाही
तो खूप अस्वस्थ झाला होता.. काहीतरी कारण काढून प्रतिक तिला आपल्या जवळ बोलावून
घ्यायचा.. कधी स्क्रिप्टमधे काहीतरी करेक्शन आहे म्हणून तर कधी व्हॉईस ओवरची तालीम
म्हणून.. प्रतिक आभाला अजिबात एकटं सोडायचा नाही.. आकाशला तो हे सारं मुद्दाम
करतोय असं सतत वाटायचं.. एक मुळात बसलेल्या.. अनेक ठिकाणी बक्षिसं पटकावलेल्या
एकांकिकेचा सवाईसाठी एक प्रयोग करायचाय त्यासाठी इतकी मगजमारी करायची गरज काय होती
तेच आकाशला कळत नव्हतं.. काही डान्सर बदलले होते.. पण तरीही इतकं..
आभाचाही त्याला कधी कधी राग यायचा.. ती मुद्दामून त्याला
आणि अदितीला एकत्र काम द्यायची.. जेणेकरून ते सतत एकत्र राहतील.. आकाशला ते कधी
कधी आवडायचंहि.. कारण कधी कधी कामाच्या फ्लोमधे अदिती पुन्हा पहिल्यासारखी
व्हायची.. हसून बोलणारी.. मनमोकळी.. तिच्या डोळ्यात कुठलीही तेढ नसायची.. ते
बोचणार रिकामीपण नसायचं.. पण मग ती अचानक झोपेतून जागी झाल्यासारखी बदलायची..
पुन्हा आपल्या कोशात दडायची.. डोळ्यात एक अनोळखीपण भरून राहायचं.. आकाशला याचा
सगळ्यात जास्त राग यायचा.. त्यामुळेच त्याला अदितीसोबत काम करणं नकोसं वाटायचं..
त्याने एकदा अदितीला विचारलही होतं..
“तुला अजूनही प्रॉब्लेम होतो का माझ्यामुळे?”
“मला? का?” तिने अगदी तुटकपणे उत्तर दिलं..
“तू मधेच व्यवस्थीत बोलतेस.. मधेच एकदम अलुफ होवून जातेस..”
“जेवढं गरजेपुरतं आहे तेवढं बोलते.. उगाच काय बडबड करत
बसणार?”
तिचं हे उत्तरही आकाशला राग आणणारं होतं.. त्याने जरा
स्पष्टच विचारायचं ठरवलं..
“तू पूर्वीसारखी वागत नाहीस माझ्याशी.. अदिती आपण बोलून
आपले क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेयत.. पर्सनलहि नाही करू शकत का सॉल्व्ह..”
अदितीने त्याच्याकडे दोन क्षण शांतपणे पाहिलं.. मग नजर
फिरवत म्हणाली..
“आकाश आपल्यात पर्सनल असं काय आहे.. आपण डान्समुळे भेटलो..
डान्समुळे आपली ओळख झाली.. डान्समुळेच आपण आज इथे एकमेकांसमोर उभे आहोत.. इट वॉज ऑलवेज
क्रिएटिव्ह.. नथिंग पर्सनल..”
ती एक त्रयस्थ हसू हसली आणि वळून शांतपणे निघून गेली..
आकाशला हि गोष्ट खूप लागली.. त्याने दुसऱ्या दिवशीच आभाकडे विषय काढला..
“आभा.. तू मला अदितीबरोबर काम देत जावू नको यार.. तिला आवडत
नाही ते..”
“तिच्याशी मला काय घेणं देणं..” ती अतिशय कोरड्या आवाजात
म्हणाली.. मग त्याच्याकडे पाहत खट्याळ हसली.. “तुला आवडतंय न ते.. मग झालं तर..”
आकाशला आभाचा हा एप्रोच आवडत नव्हता..
“प्लीज आभा.. सोड ना आता ते..”
“असं कसं? प्रॉमिस केलय मी..”
“आभा..”
“आकाश.. थिंग्ज टेक टाईम.. सब हो जाएगा ऑल राईट.. अदितीला
आपण थोडा वेळ द्यायला हवा..”
आकाश यावर काही बोलणार तोच प्रतीकने आभाला हाक मारली आणि
आभाही वेळ न दवडता त्याच्या दिशेने चालू लागली..
तिलाही आकाशसोबत असं बोलणं अजिबात आवडायचं नाही.. ती आजकाल
प्रेमाबद्दल जास्तच आणि डीपली विचार करत असली तरी आकाश तिला खूप आवडतो आणि तिचं
त्याच्यावर खूप प्रेम आहे हे निर्विवाद सत्यच होतं.. आणि अदिती सोबत आकाशला इमॅजिन
करताना तिला अजूनही त्रास व्हायचा.. पण हे सगळं तिला विधीशाच्या बोलण्यानुसार
बोलावं लागत होतं.. आणि यात आकाशची जी हालत होत होती त्या बद्दल तिला वाईटही वाटत
होतं.. पण तिला तो तिच्याजवळ येतोय या गोष्टीने बरंहि वाटत होतं..
पण आकाशला यातलं काहीच बरं वाटत नव्हतं.. असं काही झालं कि
तो खूप अस्वस्थ व्हायचा.. पण मग संध्याकाळी आभा बाईकवर त्याच्या मागे बसली कि घरी
जाईपर्यंत तो पुन्हा नॉर्मल व्हायचा.. तिचं त्याच्या कानाशी येवून बोलणं.. बाईकवर
त्याच्या खांदयावर हात ठेवून बसणं.. हे सारं त्याला खूप आश्वासक वाटायचं..
पण त्या दिवशी घरी जायची वेळ झाली तरी आभा आणि प्रतिक आले
नाहीत याबद्दल आकाश चिंतीत होता.. कुणीतरी मघाशी त्याला सांगितलं होतं कि त्याने
त्या दोघांना एकत्र बघितलं होतं.. त्यामुळे आकाश जास्तच अस्वस्थ झाला होता.. हे
दोघं एकत्रच तर कुठे गेले नसतील.. त्याच्या मनात दुनियाभरचे विचार येत होते..
इतक्यात दारातून आभा एकटीच आत आली.. प्रतिक तिच्याबरोबर
नव्हता.. आकाश घाईघाईत पुढे झाला..
“प्रतिक कुठेय? तुझ्या बरोबरच होता ना?” आभाला या प्रश्नाची
गम्मत वाटली.. तू कुठे होतीस असं न विचारता त्याने प्रतीकची चौकशी केली होती..
म्हणजे ते दोघं एकत्र होते याचा आकाश बराच विचार करत होता.. पण आभा त्यावर काही
बोलायला जाणार तोच दारातून कुणीतरी आत आलं ज्याला पाहून सारेच चकित झाले.. तो सोहम
होता... अदितीचा बॉयफ्रेंड.. आकाश सोडून सगळेच त्याला पाहून खूष झालेले दिसत
होते.. काहींना तो माहित नव्हता त्यांच्याशी आभाने त्याची ओळख करून दिली..
“हा तुला कुठे भेटला.. आणि इथे का आणलस.. प्रतीकने पाहिलं
तर.. बाहेरच अलाउड नाहीये ना कुणी..” अदितीची हि रिअॅक्शन आभाला चकीत करणारी
होती..
“प्रतिक येणार नाहीये आज.. त्याने सांगितलंय आज वाईंडअप
करा.. उद्या जास्त वेळ करू..”
“का.. काय झालं प्रतिकला?” आकाशने विचारलं..
“त्याचे आई बाबा आले होते.. प्रिन्सिपलना भेटायला.. त्याचं
लास्ट इयर आहे.. त्यांना त्याच्या अभ्यासाचं टेन्शन वाटत होतं.. नाटकं एकांकिका
यात वेळ घालवतो म्हणे..”
“मग?” एकाने फुल टेन्शनमधे येवून विचारलं..
“टेन्शन घेण्यासारख नाहीये काही.. प्रिन्सिपलने त्यांना समजवल..
त्याच्या गुणांचा पुढे कुठे कुठे कसा कसा फायदा होवू शकतो ते सांगितलं.. त्याचे आई
बाबा जरा नॉर्मल झाल्यासारखे वाटले तरी..”
“बिच्चारा प्रतिक..” एक मुलगी अगदी इमोशनल होवून म्हणाली..
“बिचारा वगैरे काही नाही.. बाहेर पडताना मला येवून म्हणाला..
घरी जातो... घरच्यांना जरा सेंटी देतो.. उद्या पर्यंत सगळं फिट अॅण्ड फाईन करतो..”
यावर सगळी पोरं हसली..
“चालु आहे तो पक्का..” एकजण म्हणाला.. आभाने त्याला दुजोरा
दिला..
“खरंय पण मला माहित नव्हतं तो अगदी सायन्सला आहे.. मला
वाटायचं असेल आर्टसला.. बापरे.. सायन्सचा अभ्यास सांभाळून हे सारही.. ग्रेट ना..” आभाच्या चेहऱ्यावर प्रतीकसाठी खरोखरच कौतुक दिसत होतं..
“पण तू काय करत होतीस तिथे? नाही म्हणजे त्याच्या पालकांची
मिटिंग होती ना..” आकाशने विचारलं.. त्याच्या प्रश्नातली जेलसी लपत नव्हती..
“प्रतीकच घेऊन गेला मला.. म्हणाला चल मदत होईल.. आई बाबांशी
ओळख करून दिली.. त्याचे पेरेंट्स आहेत स्वीट.. पण नंतर त्याची आई मला त्याच्या
सगळ्या कंप्लेटस सांगत होती..”
“का? तुला का?” आकाशचा अजून एक इनसिक्युरिटी ने भरलेला
प्रश्न.. आभाने यावर फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि ती बाकीच्यांकडे बघून बोलू
लागली..
“इनशॉर्ट काय.. तर प्रतिक आज येणार नाहीये.. पण उद्या संडे
असला तरी आपण यायचंय.. उद्या जास्तवेळ रिहर्सल चालणार आहे सो.. बी ऑन टाईम..
कुणीही उद्याची रिहर्सल चुकवायची नाहीये..”
“मी पण यायचय का मग उद्या..” इतका वेळ गप्प असलेला सोहम
मस्करीत म्हणाला.. त्यावर सगळे हसले..
रिहर्सल आटपली होती.. पण कुणाचाच पाय निघत नव्हता.. सगळे
टाईमपास करण्यात बिझी झाले.. आकाशला खरं तर आभाला घेवून निघायचं होतं.. पण आभा
तिथेच थांबली.. मग आकाशलाही नाईलाजाने थांबावं लागलं.. अदितीलाही तसं थांबायचं
नव्हतंच पण सोहमला कुणी सोडेच ना.. सोहमने अदितीच्या बर्थडे पार्टीला काढलेला
पिकनिकचा विषय पुन्हा निघाला.. परत काही तारखा ठरल्या..
मग कुणीतरी डान्सचा विषय काढला.. सोहम, अदिती ज्या डान्स
क्लासमधे शिकायची तिथे ट्रेनर होता.. त्यामुळे सगळे त्याला डान्स करायची जबरदस्ती
करू लागले.. त्यानेही फारसे आढेवेढे घेतले नाहीत.. तो डान्सला उभा राहिला आणि
त्याने अदितीला आपल्यासोबत नाचायला उभं केलं.. कुणीतरी म्युझिक लावलं आणि त्यांचा
डान्स सुरु झाला..
इतर सगळे टाळ्या वाजवत त्यांना साथ देत होते.. मग एक एक करत
जोड्या उठू लागल्या.. त्यांच्या डान्समध्ये सामील होवू लागल्या.. अचानक आकाशलाही
हुक्की आली.. तो आभासमोर आला आणि तिला डान्ससाठी उभं करू लागला..
“आकाश मला येत नाही डान्स..”
“कारणं देवू नकोस उगाच..”
“अरे खरंच..”
“चल गं.. मी शिकवतो.. चल..”
आकाशने तिला जवळपास ओढतच सगळ्यांच्या मधे नेलं.. आणि ते
दोघं डान्स करू लागले.. खरं तर आभाला अजिबात वाटलं नव्हतं कि तिला असं नाचता
येईल.. पण आकाशने तिला हळूहळू करत शिकवायला सुरुवात केली आणि काही वेळात तिची भीड
चेपली आणि ती इतरांच्या बरोबरीने डान्स करू लागली.. आभाला ते इतरांसारख परफेक्ट
जमत नव्हतं.. पण ती करत होती.. आकाश तिच्याकडून करून घेत होता.. तो एक प्रकारचा
क्लोज डान्सच होता.. त्यामुळे आभाला खास बरं वाटत होतं..
ती आकाशच्या खूप जवळ होती.. हातात हात होते.. तिने स्वत:ला
सोडून दिलं होतं.. तोचं तिला मार्ग दाखवत होता.. तोच तिला मार्गावर नेत होता..
त्या क्षणाला तिच्या मनात कोणत्याही शंका नव्हत्या.. कोणताही प्लान नव्हता.. हे असचं
सुरु रहावं.. कधीच संपू नये इतकच तिला वाटत होतं.. तिने डोळे मिटून घेतले.. वास्तव
तिला पहायचं नव्हतं.. हे स्वप्न फारच सुंदर होतं..
संध्याकाळी बाईकवरून येतानाही ती त्याच धुंदीत होती..
आकाशचीहि आजची संध्याकाळ मस्त गेली होती.. त्याने मनाशी निश्चय केला आज आभाशी
बोलायचं.. जे बरेच दिवस त्याच्या मनात होतं.. अजून उशीर केला तर खूप उशीर होईल असं
आकाशला आता वाटू लागलं होतं.. ते सोसायटीत पोहोचले.. आकाशने बाईक थांबवली.. आभा
बाईकवरून उतरली.. तिने आकाशला thanks म्हंटल.. आणि ती वळून घराकडे निघणार तोच
आकाशने तिला हाक मारली..
“आभा..” तिने वळून आकाशकडे पाहिलं.. “ आभा.. उद्या संडे आहे..
कॉलेज लेट आहे.. तू.. तू लंचसाठी येशील माझ्याबरोबर..”
आभाला हे एक्स्पेक्टेड नव्हतं..
“तू आणि मी.. जरा टाईम स्पेंड करू.. गप्पा मारू.. मग जावू
कॉलेजला..”
तो आभाला डेटसाठी विचारत होता.. आभाला काय करू आणि काय नको
असं झालं होतं.. कित्येक वेळा तिने याचं दिवसच स्वप्न पाहिलं होतं.. आकाश हे कधी
बोलेल याची वाट पाहिली होती तिने.. आजचा दिवस खरच छान गेला होता.. आधी डान्स.. मग
छानशी बाईक राईड आणि आता तिच्या पहिल्या डेटचं प्रपोजल.. आभा खूप खूष होती..पण ती
त्यावर फक्त इतकच म्हणू शकली..
“सॉरी आकाश.. उद्या नाही रे जमणार.. बिझी आहे मी.. बाय..”
क्षणासाठीही न थांबता आभा वळून तिच्या बिल्डींगकडे निघाली..
आकाश तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे बघत तिथेच उभा होता..
क्रमशः
Comments
Post a Comment