ओलांडून जाताना.. भाग-25
ओलांडून जाताना... भाग-२५
ओ डीअर डायरी..
एक मुलगा आहे आमच्या कॉलेजमध्ये.. क्युट आहे.. पण आर्टसला आहे.. काही बोलत नाही तो.. फक्त लांबून पाहत असतो.. त्याच्या डोळ्यांमध्ये बात आहे काहीतरी.. आय नो इट्स नॉट प्रक्टिकली पॉसिबल.. पण थोडंस चेक आउट करायला काय हरकत आहे.. असं नाहीये कि मी प्रेमात पडणार आहे त्याच्या.. आणि पडले तर.. LOL!!
तुझीच अदिती..
ओ डीअर डायरी..
फायनली आज तो ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाला.. आकाश.. नाव हि इज गोइंग टू डान्स विथ अस.. खूप ऑडिशन्स दिल्या बिचार्याने.. प्रत्येक वेळी माझ्याकडेच त्याची नजर असायची.. जसं काही माझ्यासाठीच परफॉर्म करतोय.. आज तो सिलेक्ट झाला त्याचा मलाच खूप आनंद झाला.. आय नो मॉम विल किल मी जर तिने हे वाचलं.. पण मी काही त्याच्या प्रेमात नाहीये.. जस्ट अ क्रश यु कॅन से.. पण काहीही असो.. तो आमच्या ग्रुपमध्ये परफॉर्म करणार आहे याने मलाच खूप एक्सायटेड वाटतय.. Eeps!! :p
तुझीच अदिती..
ओ डीअर डायरी..
आज आकाश आणि मला एका डान्ससाठी सिलेक्ट केलंय.. क्लोज डान्स.. साल्सा जाईव्ह टाइप्स.. आकाश सोबत रिहर्सल करताना माय हार्ट वॉज बिटिंग सो फास्ट.. जवळपास माझ्या गळ्यात हार्ट आहे असं वाटत होतं.. LOL! पण असंच काहीतरी.. इट वॉज बेस्ट डान्स एव्हर.. हि वॉज सो जंटल.. सो नाईस.. त्याचा एकही टच मला ऑड वाटला नाही.. ओ गॉड.. आय जस्ट ऑब्झर्वड मी गेल्या दहा दिवसात फक्त आणि फक्त आकाश बद्दलच लिहिलंय. इज दॅट रिअली मीन आय अॅम इन लव्ह.. Eeps!!
तुझी अदिती..
डीअर डायरी..
आता मला काहीच डाऊट वाटत नाहीये.. मी शुअर आहे कि आय अॅम मॅडली इन लव्ह विथ आकाश.. त्याच्याबरोबर फिरणं.. त्याच्या डोळ्यात बघत राहणं.. त्याच्या सोबत एकाच कपात कॉफी शेअर करणं.. आणि हे सारं त्याला डायरेक्टली काही न कळू देता करणं.. टफ जॉब.. पण मजा येतेय.. या नात्याचं फ्युचर काय, मला माहित नाही.. आईला डाऊट आलाय माझ्याबद्दल बट नाव आय डोंट केअर.. अजून काही काळ मला या स्वप्नात जगायचय.. पुढचं पुढे बघू..
तुझी अदि..
अदितीच्या डोळ्यात पाणी तराळल होतं.. ती आपल्या रूममध्ये बसून तिची गेल्या वर्षीची डायरी वाचत होती.. तिच्या आणि आकाशच्या सगळ्या गोड आठवणी त्यात कैद होत्या.. त्यांची पहिली भेट, त्यांचा पहिला डान्स.. सगळंच.. आकाशने रोझ डे च्या दिवशी तिला दिलेलं गुलाब.. फ्रेन्डशिप डेचा फ्रेन्डशिप बॅन्ड.. आकाशने काहीतरी कारण काढून तिला दिलेलं ग्रीटिंग.. सगळं त्या डायरीतच होतं.. अदितीच्या आयुष्यात इतके चढ उतार तिने कधीच पाहिले नव्हते जितके आकाश आणि तिच्या नात्यात तिने पहिले होते.. तिने डायरी मिटली.. वर्षा अखेरीची कुठलीच गोष्ट तिला वाचायची नव्हती.. तो आत्ता पर्यंतच्या तिच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट काळ होता.. तिचे सगळेच निर्णय चुकले होते.. हातातलं सारं निसटून गेल्यासारखं झालं होतं तिला..
तिने डायरी आपल्या बॅग मध्ये ठेवली.. खरं तर ती घरीच ठेवायची.. पण आकाशच्या बाबतीत तिच्या मॉमला संशय आल्यावर एकदा तिने अदिती नसताना तिची रूम चेक केली होती.. मॉम डायरीजवळ पोहोचायच्या वेळेतच अदिती आली आणि होणारा गोंधळ टाळला होता.. पण तेव्हापासून अदिती डायरीज आपल्या बॅगमधेच ठेवायची.. तिने गेल्या वर्षीची डायरी ठेवून या वर्षीची डायरी बॅगेतून काढली.. खरं तर त्यात तिने फारसं काही लिहिलेलं नव्हतं.. चांगलं काही लिहावं असं घडलंच नव्हतं.. पण काल शशिकांत सरांच्या घरी जे काही झालं ते सारं अदितीला लिहायची इच्छा होती.. आयुष्यातला तो एक फार मोठा धडा होता.. तिने डायरी उघडली.. पेन हातात धरलं.. डायरीवर पेन टेकवलं आणि काल घडलेलं सारं तिच्या डोळ्यासमोरून भरभर सरकून जावू लागलं..
अदितीला कळायला लागल्यापासून तिच्या लव्हमॅरेज केलेल्या सख्ख्या मावशी बद्दल तिने नेहमीच मॉमकडून वाईट ऐकलं होतं.. एकत्र आपल्यापेक्षा कमी ऐपत असलेल्या माणसासोबत लग्न करणं म्हणजे व्यवहारशून्यपणा आहे हे अदितीच्या मॉमचं पक्क मत होतं.. तिच्या बहिणीने तिचं चूक केली होती.. तिचा कवी नवरा काहीही कमवू शकत नाही.. ती छोट्याशा घरात दु:खी जीवन जगतेय.. पैशांआभावी अॅटजेस्ट करत आयुष्य ढकलतेय.. नवऱ्याला दोष देतेय.. आपल्या त्या निर्णयाला कोसतेय.. पैशापुढे प्रेम संपून जातं.. आजची गोड वाटणारी स्वप्न उद्या फक्त भास म्हणून उरतात..
मॉमचं हे सारं म्हणणं अदितीला पटायचं.. तिच्या मॉमने एकदा तिला नेवून मावशीचं दहा बाय दहाचं घरही दाखवलं होतं.. या साऱ्याचा परिणाम अदितीने आकाशच्या बाबतीत आपलं मत बनवण्यात झाला होता.. ती प्रेम करत होती पण पुढे जायला घाबरत होती.. उद्या हे सारं गोड वाटणारं स्वप्न खरंच एक भास होवून राहिलं तर? ज्या माणसाबद्दल आपल्याला आज इतकं प्रेम वाटतय उद्या त्यालाच आपण नावं ठेवू लागलो तर? अदितीला या साऱ्याची भीती वाटायची.. त्यापेक्षा आकाश आपल्या आयुष्यात एक गोड आठवण म्हणून राहिला असता तर ते तिला जास्त आवडलं असतं.. आपल्या मावशीच्या लव्हस्टोरीचा झालेला अंत पाहून तिने आपल्या लव्हस्टोरीतला सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला होता..
पण अदितीने तिच्या मावशीच्या घरी जी परिस्थिती पाहिली ती वेगळीच होती.. मावशी सुखी होती.. नवऱ्यासोबत आनंदी होती.. शशिकांतसर हे तिचे मिस्टर आहेत हे कळल्यावर तर अदितीला खूपच आश्चर्य वाटलं होतं.. त्यांच्यातलं नातं खरंच खूप गोड होतं.. अदिती या साऱ्यामुळे पार गोंधळून गेली..त्यात शशिकांत सरांच्या तोंडून त्यांची आणि तिच्या मावशीची पूर्ण कथा ऐकून तर तिचा गोंधळ अधिकच वाढला..
शशिकांत आणि अदितीच्या मावशीची, जानकीची भेट झाली ती कॉलेजमध्ये.. एकांकिका स्पर्धेदरम्यान ते जवळ आले आणि प्रेमात पडले.. जानकी खूप श्रीमंत घरातली नव्हती.. पण शशिकांत पेक्षा तिची घरची परिस्थिती बरीच वरचढ होती.. त्यात शशिकांत असा कला क्षेत्राला वाहून घेतलेला.. जानकीच्या घरून होकार मिळणं कठीणच होतं..
जानकीने धीर करून एकदा या सार्याचा सुतोवाच घरी केला आणि प्रकरण अधिकच चिघळल.. जानकीच्या घरच्यांनी तिच्यासाठी मुलं बघायला सुरुवात केली.. जानकी आणि तिची लहान बहिण दोघीही दिसायला सुंदर होत्या.. त्यामुळे श्रीमंत घरांमध्ये स्थळं शोधली जावू लागली.. जानकीला हे सारं असह्य झालं होतं.. त्यातच घरच्यांनी एक स्थळ पक्क केलं पण जानकी तर शशिकांत शिवाय कुणासोबत स्वत:चा विचार करूच शकत नव्हती.. अखेर तिने आयुष्यातला एक मोठा निर्णय घेतला.. शशिकांत सोबत पळून जायचा.. जानकीने प्रेम निवडलं आणि घर सोडून गेली.. घराची इज्जत वाचवायची म्हणून त्या ठरलेल्या मुलाशी जानकीच्या धाकट्या बहिणीचं म्हणजे अदितीच्या मॉमचं लग्न झालं..
त्या दहा बाय दहाच्या खोलीत त्या घरची सून म्हणून जानकीने टाकलेलं पाहिलं पाउल ती कधीच विसरू शकणार नव्हती.. त्या घरात ती आधीही आली होती.. पण आज त्या घराचं छोटेपण तिला प्रकर्षाने जाणवू लागलं होतं.. तिच्या माहेरच्या हॉलपेक्षाही हे घर छोटं होतं आणि आता तिला इथेच संसार करायचा होता.. अॅटजेस्ट करणं खरच कठीण होतं.. स्टोव्ह कसा पेटवायचा हे शिकण्यातच तिचा एक महिना निघून गेला होता.. त्यावर जेवण करणं तर अजून कठीण.. ज्याच्यावर प्रेम केलं त्या आपल्या नवऱ्यासोबत त्या छोट्याशा घरात एकांत मिळवायचा म्हणजे मोठी गोष्ट होती.. पण सुरुवातीला कठीण वाटणारं हे सगळं जानकीला कधी आवडू लागलं हे तिला कळलंच नाही..
तिची सासू तिला सांभाळून घेणारी होती.. दीरही चांगला होता.. पण सगळ्यात महत्वाचा होता तिचा नवरा.. शशिकांत.. ज्याचं तिच्यावर प्रचंड प्रेम होतं.. तो तिला प्रत्येक बाबतीत सावरून घ्यायचा.. पैशांची नेहमीच चणचण असायची पण तरीही आठवड्यातून एक दिवस ते फिरायला जाण्यासाठी वेळ काढायचे.. पैसे असतील तील सिनेमाला जा.. नाहीतर जवळच्याच बागेत जावून बस.. एकमेकांसोबत वेळ घालवणं त्यांच्यासाठी महत्वाचं होतं..
त्यांच्यात भांडणंहि व्हायची.. पण ती तेवढ्यापुरती.. फार वेळ एकमेकांशी न बोलून त्यांना चालायचंच नाही.. एकमेकांपासून दूर राहणं त्यांना जमायचंच नाही.. ते दोघंही आपापल्या कामांमध्ये असले तरी एकमेकांची आठवण दर तासातून एकदा निघायची.. त्याचं लिखाण, नाटकं, एकांकिका.. तिचं एन.जी.ओ. आयुष्य छान सुरु होतं..
जानकीचे याच एन.जी.ओ.च्या कामा दरम्यान तिच्या बहिणीशी पुन्हा संबंध आला.. कुठल्या तरी क्लबच्या दिखावेबाज सोशल फंक्शनला ती त्या एन.जी.ओ.त आली होती.. तिच्याकडे उंची गाडी होते.. अंगावर भारीतले कपडे.. तिने त्या सोहळ्या नंतर जानकीकडे येवून तिचे आभार मानले.. ती त्या वेळी पळून गेली नसती तर आज तिच्या नशिबात हे सारं वैभव आलं नसतं.. तिने जानकीला आपला मोठेपणा दाखवण्यासाठी घरी जेवायला बोलावलं..
जानकी आपल्या नवऱ्यासोबत गेली होती.. तिने विचार केला होता त्या मानाने बहिणीच्या घरातलं ऐश्वर्य फारच जास्त होतं.. मोठ्ठ घर.. भारी गाड्या.. बहिणीने जानकीला आगत्याने सगळं दाखवलं.. आपलं वैभव जानकीला दाखवण्यासाठीच तर तिने हा सारा खटाटोप केला होता.. पण तिला मात्र त्या साऱ्या श्रीमंती मागे एक वेगळंच चित्र स्पष्ट दिसत होतं..
तिची बहीण पैशासोबत संसार करत होती.. त्यात तिचा नवरा तर कुठेच नव्हता.. प्रेम आणि प्राईज टॅग यात तिची गफलत होत होती.. नवर्याचं आणि तिचं नातं ती दिलेल्या वस्तूंच्या किमती सांगून जानकीला पटवून देत होती...
तिचा नवरा घरी नव्हता त्यामुळे बहिणीने नवऱ्याला फोन लावला..
“हॅलो.. व्हेअर आर यु डीअर?” बहिणीने आवाज मधाळ करत विचारलं..
“बिझी आहे..” म्हगातल्या यु.एस.मेड फोनचा आवाज गोष्टी फक्त तीच्यापुरत्या ठेवत नव्हता..
“अरे.. जानकी येणार होती सांगितलं होतं ना तुला..”
“मग.. मी काय करू.. तू आहेस ना घरी..” तो तिच्यावर डाफरला.. बहीण थोडीशी ऑकवर्ड झाली.. तिने आपला आवाज खाली आणत त्याला सांगितलं..
“उगाच ओरडू नकोस माझ्यावर.. ओके.. तूच सांगितलं होतंस कि तू येणार आहेस म्हणून फोन केला..” जानकी स्वत:च या प्रकरणाने डिस्टर्ब झाली.. तिने शशिकांतकडे पाहिलं.. पलीकडून जवळपास ओरडून बहिणीच्या नवऱ्याने उत्तर दिलं..
“तुझं तोंड बंद करण्यासाठी बोललो मी.. आता मला माझं काम करू देशील.. तुझ्याच घशात घालण्यासाठी जमवतोय न पैसा.. तरी तुझी सततची कटकट.. काल रात्री पण तेच.. आज सकाळपासून तेच.. तुला.......” जानकीच्या बहिणीने फोन कट केला.. तिने जानकी आणि शशिकांतकडे पाहिलं.. ती कसनुस हसली..
“खूप काम...” इतकच बोलून ती गप्प बसली.. तिला माहित होतं कि आपण जानकीला नाही.. स्वत:लाच फसवतोय..
नंतर जेवण उरकून ते लगेच निघाले.. प्रतीच्या प्रवासात ती याच सगळ्याबद्दल विचार करत होती.. तेवढ्यात शशिकांत तिला म्हणाला..
“तू एक मार्क केलंस.. तुझ्या बहिणीच्या शेजारची बेडरूम वापरातली होती..”
“मग? त्याचं काय?” शशिकांतच म्हणणं जानकीला कळलं नाही..
“अॅश-ट्रे मध्ये राख होती.. बेड शेजारच्या टेबलवर कुणीतरी वाचत असलेलं नॉवेल होतं..एक जोड घरात घालायच्या मेन्स स्लीपर दिसत होत्या..”
“म्हणजे काय शशिकांत?”
“खात्रीने नाही सांगू शकत पण तुझी बहिण आणि तिचे मिस्टर एका रूम मध्ये राहत नाहीत..” जानकीला यावर विश्वास बसला नव्हता..
पण हे खरं होतं.. अदिती लहानपणापासून हेच दृश्य बघत होती.. सुरुवातीला महिन्याचे काही दिवस तरी तिचे मॉम डॅड रूम शेअर करत.. पण आता ते केव्हाच बंद झालं होतं.. आई अदितीला सांगायची कि डॅड उशिरापर्यंत टी.व्ही. पाहतात.. ते तिला सहन होत नाही.. म्हणून ते वेगवेगळ्या रुममध्ये झोपतात.. पण ते कारण खरं नाही हे लवकरच अदितीला समजलं.. पण लहानपणापासून अदिती असेच मॉम डॅड पाहत होती.. लग्न झाल्यावर असंच होतं हे मॉमने तिला सांगितलं होतं.. अजून एक खोटं जे ती खरं मानून बसली होती..
खरं समजून जे खोटं समोर येत गेलं त्यावर ती आयुष्याचे निर्णय घेत गेली होती.. आणि आता जेव्हा सगळी सत्य एकत्रच समोर आली होती तेव्हा तिला तिचा प्रत्येक निर्णय चुकीचा वाटत होता.. शशिकांत सर त्या दिवशी निघण्या आधी अदितीला म्हणाले होते..
“योग्य वयात लग्नाचा निर्णय घेतल्यावर चांगला जोडीदार सगळेच मिळवतात.. पण योग्य जोडीदार मिळाल्यावर लग्नाचा घेतलेला निर्णय नेहमीच चांगला असतो..”
अदितीला या एका वाक्यात तिची सारी उत्तरं मिळाली होती.. हे जर आपल्याला आधी समजलं असतं तर आपण मॉमला विरोध केला असता.. जसा तिच्या मावशीने चान्स घेतला होता तसा तिलाही घ्यायला आवडला असता.. आणि आकाशच स्वभाव पाहता, जिद्द पाहता तो निर्णय फसला नसता याची तिला खात्री होती..
पण हा सगळा विचार करण्यासाठी आता खूप उशीर झाला होता.. सगळे बाण सुटले होते.. आणि अदितीच शेवटी प्रत्येक बाणाची शिकार झाली होती..
कॉलेजमध्ये प्रत्येक रिहर्सल अटेंड करताना तिला आपण काय चूक केलीये हे सतत जाणवायचं.. पण आता शेवटचेच काही दिवस राहिले होते.. सवाई संपल्यावर ती या सार्यातून कायमची बाहेर पडणार होती.. डान्स, एकांकिका, कल्चरल ग्रुप तिची प्रत्येक हौस फिटली असं तिला वाटत होतं.. सवाईच्या आदल्या रात्री झोपताना तिने हा सारा विचार मनाशी पक्का केला..
पण सवाईच्या एका रात्रीत सगळ्यांची आयुष्य बदलून जाणार होती.. कुणीच विचार केला नसेल असं त्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडणार होतं..
क्रमशः
Comments
Post a Comment