ओलांडून जाताना.. भाग-१८



“ प्रेमाच्या अवखळ नात्याला बंध न कुठली चिंता, का लग्नाच्या नंतर होतो त्या नात्याचा गुंता
पाणावून कडा डोळ्यांच्या, जगणे होते अपमान, तरी सांगती मंडपी सगळे शुभमंगल ‘सावधान’ ”
आभाने आणि मजनुचा रोल करणाऱ्या सिद्धार्थने एकत्र एकांकिकेचा शेवटचा डायलॉग म्हंटला आणि एकांकिकेतल अखेरचं गाणं सुरु झालं.. हळूहळू वळत त्या दोघांनी एकमेकांकडे पाठ केली आणि ते दोघं विंगेच्या दिशेने निघू लागले.. एव्हाना आकाश आणि अदितीने स्टेजवर डान्स सुरु केला होता.. बाकीचा अख्खा ग्रुपहि आपापल्या स्टेप्स करत होता.. आभा विंगेत आली आणि ती आनंदाने उड्या मारू लागली.. कुठेही न चुकता.. काहीही गुफ-अप न होता तिची पहिली अख्खी तालीम पार पडली होती.. स्टेजवर गाणं संपलं आणि ऑडीमधून टाळ्यांचा कडकडाट ऐकू येवू लागला.. आभाच्या चेहऱ्यावर मोठ्ठ हसू होतं.. याचसाठी तिने गेले बरेच दिवस मेहनत घेतली होती.. आज त्या मेहनतीचं चीज झालेलं दिसत होतं..

      “मी शाळेत असताना एका नाटिकेत काम केलं होतं.. झाड बनलो होतो मी.. झाड.. आणि नंतर एक पथनाट्यहि केलं होतं.. त्यात मी मंदिराची वीट बनलो होतो.. लोक काय टाळ्या वाजवायचे माझ्या डायलॉगवर..” – बाबा
      “मी नाटिका वगैरे नाही केली.. पण नवरंगमधला डान्स केलेला.. एकदम संध्या.. समोरून छान मेकअप वगैरे करून तयार झाले होते आणि मागून पुरुषाचा गेटप.. प्रेक्षकांकडे पाठ करून एक पुरुषाची स्टेप करत होते तर स्टेजचा अंदाजच आला नाही आणि तशीच खाली पडले..” – आई
आभा आई आणि बाबांसोबत बोलत बसली होती.. म्हणजे ते बोलत होते आणि ती बसली होती.. आभाने एकांकिकेत काम करायला होकार दिला पण तिला त्या विचारानेच दडपण आलं होतं.. त्या रात्री ती त्याबद्दल आई बाबांशीही बोलली.. पण त्याचं काहीतरी वेगळंच होतं.. ते आपण शाळा कॉलेजमधे असताना सांस्कृतिक कार्यक्रमात कसा भाग घ्यायचो आणि कसे ते कार्यक्रम गाजवायचो हे सांगू लागले... आभाला तिचं टेन्शन कमी होईल असं उत्तर तर मिळालं नाहीच वरून उगाचच आई बाबांच्या आठवणी ऐकत बसाव्या लागल्या..
तिने विधीशाशी whatsapp वर याबद्दल चर्चा करायचा प्रयत्न केला तर ती या घटनेलाही त्यांच्या प्लान सोबत जोडून सारं कसं आगदी हवं तसं चाललय हे सांगू लागली.. आभाच्या डोक्यात आता प्लानचा विचारही नव्हता.. ती हा जो होकार देवून बसलीये त्याच्याशी कसं डील करायचं याचाच विचार ती करत होती..
दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला पोहोचली तेव्हा ती बातमी कॉलेजभर पसरली होती.. आभा क्लासरूममध्ये आली आणि सगळे तिचं अभिनंदन करू लागले.. अगदी काही शिक्षकांनीहि तिच्या वर्गात आल्यावर तिच्या नावाची चौकशी केली होती.. कुठल्याही मुलाला किंवा मुलीला पहिल्याच वर्षी, कॉलेजच्या बसलेल्या नाटकात असा मध्येच रोल, तोही लीडरोल मिळाल्याची उदाहरण त्यांच्या कॉलेजमधे तरी नव्हती.. आभाला या सगळ्यामुळे अजूनच दडपण आलं होतं.. तिला हे जमणार नाहीये असं तिला अजूनही मनोमन वाटत होतं.. इतक्या लोकांसमोर आपला पोपट झाला तर तो आपण कसा सहन करणार आहोत हे तिला कळत नव्हतं..
आभा ऑडीच्या दिशेने निघाली तसे तिला अनेक भास होवू लागले.. आपल्याला मळमळतय, पोटात मुरडा मारतोय, डोकं जड झालय, चक्कर येतेय असं तिला सारखं वाटत होतं.. तिच्या छातीत धडधडत होतं.. आत्ता वळून इथून पळून जावं असं वाटत होतं.. ती ऑडीमधे पोहोचली तेव्हा आपण गेले चार दिवस चालून इथे पोहोचलोय असं तिला वाटत होतं.. ऑडीमधे सगळी गॅन्ग गोळा झाली होती.. पण दृश्य नेह्मीपेक्षा वेगळं होतं.. आज सानप सरही तिथे आले होते आणि ते प्रतीकशी काहीतरी बोलत होते.. इतक्यात प्रतिकच लक्ष आभाकडे गेलं..
“सर.. हि आभा.. हिच्याबद्दलच बोलतोय मी..”
सरांनी आभाकडे पाहिलं.. आभाला काय चाललय काहीच कळत नव्हतं..
“मी तिला पाहिलंय आधीही.. प्रश्न हा आहे कि ती ते करू शकणार आहे कि नाही..”
“आपण एक ऑडिशनटाईप करूया ना.. आभा चल..”
आभा प्रतिकसोबत निघाली तसे बाकीचे सगळे एक्सायटेड झालेले तिला जाणवले..
“प्रतिक.. नक्की काय सुरु आहे..? मला सांगशिल काही..” आभा फक्त त्यालाच ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाली..
“सरांना तुझा परफॉर्मन्स बघायचाय..”
“काय?” आभा शॉकड.. “अरे माझी काही तयारी झालेली नाहीये.. मी काय परफॉर्म करणार..”
“अॅक्टिंग नाही करायचीये अगदी.. जस्ट तुझे पाठ असलेला पॅसेज म्हण नाटकातला.. बाकीचं मी सरांना समाजवेन..”
“अरे पण...”
“आभा.. प्लीज.. आता जर मागे फिरलो तर सवाई मधली एन्ट्री मागे घेण्याचा निर्णय घेईल कॉलेज.. आभा आता सगळं तुझ्या हातात आहे..”
आभाला या गोष्टीचं सगळ्यात जास्त टेन्शन आलं.. इतकी जवाबदारी आयुष्यात तिच्यावर पडली नव्हती.. आपण या साऱ्याला होकारच का दिलं असं आभाला वाटलं.. आभा स्टेजवर जावून उभी राहिली तेव्हा बाकीचा सगळा ग्रुप खाली खुर्चांवर बसला होता.. तिचे पाय थरथर कापत होते.. घशाला कोरड पडली होती.. तिने प्रतिककडे पाहिलं.. तो स्क्रिप्टमधे तोंड खुपसून बसला होता... तिने ऑडियन्समधे बसलेल्या आकाशकडे पाहिलं.. त्याने दोन्ही बोटांचे आंगठे दाखवत तिला ऑल द बेस्ट केलं.. त्याच्या डोळ्यात पाहिल्यावर तिला जरा धीर आला.. तिने घसा खाकरला आणि डायलॉग बोलायला सुरुवात केली..
आभा गेले बरेच दिवस प्रतिकला असिस्ट करत होती.. हे डायलॉग ती आधी अनेकवेळा बोलली होती.. तिने हे इतरांना म्हणून दाखवले होते.. तिची स्तुती एकांकिकेच्या लेखकाने शशिकांतनेही केली होती.. त्यामुळे आभा हि ऑडिशन सहज करेल याची सगळ्यांनाच खात्री होती.. आणि आभाने जे काही केलं ते पाहून तर कुणाच्या आश्चर्याला सिमाच उरली नाही.. आभाने अतिशय वाईट परफॉर्मन्स दिला होता.. ती फक्त शिकवलेल्या पोपटासारखी बोलत होती.. त्यात भावना नव्हत्या.. प्रेक्षकांच्या नजरेला नजर देणं नव्हतं..
तिने आपला पॅसेज बोलून संपवला तेव्हा कुणीच काही बोललं नाही.. सगळे आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते.. तिलाही जाणवलं कि आपण फारच वाईट केलय.. तिला राहवलं नाहि.. गळा दाटून येवू लागला.. डोकं जड झालं.. आपण आता कुठल्याही क्षणी रडू हे तिला जाणवलं आणि ती धावत मेकअपरुमच्या दिशेला निघाली.. आकाशने इथे तिथे पाहिलं आणि तोही झटक्यात सीटवरून उठला आणि तिच्या पाठोपाठ धावत गेला.. तसा आभाशी मैत्री झालेला मुलींचा घोळकाही पाठोपाठ निघाला.. आदितीलाही ऑकवर्ड वाटलं.. तीही पाठोपाठ मेकअप रूमकडे निघाली.. सानप सर प्रतीकच्याकडे बघत उठले..
“झालं समाधान.. आता मी निर्णय घेवू शकतो..”
सानप सर ऑडीच्या बाहेर निघाले.. प्रतिकला आभाच्या मागे जावं का त्यांच्या हे डिसाईड करायला दोन क्षण गेले.. पण तो उठून सानप सरांच्या मागे धावला..
तिथे मेकअप रुममध्ये सगळेच आभाला घेरून उभे होते.. आभा खुर्चीत बसली होती.. तिने शेजारी उभ्या असलेल्या आकाशचा हात घट्ट धरला होता आणि ती त्याच्यावर डोकं टेकून रडत होती.. अदिती तिच्या समोर पाय मुडपून बसली होती आणि तिला धीर देत होती..
“आभा.. इट्स ओके.. इट्स फाईन.. फर्स्ट परफॉर्मन्स कुणालाच इझी नसतो..”
“हो.. मी पहिल्या परफॉर्मन्सच्या वेळी स्टेप्सच विसरलो होतो आभा.. डान्सच्या मधेच थांबलो आणि मुर्खासारखा इथे तिथे बघू लागलो..”
“सी.. दि आकाश.. आपला फेव्हरेट डान्सर.. तो स्टेप विसरला होता..” अदितीच्या तोंडून आपली स्तुती ऐकून तेवढ्यातही आकाशला बरं वाटलं.. “आणि  मी.. आय स्टार्टेड क्राइंग ऑन स्टेज.. सगळ्यांचा फर्स्ट परफॉर्मन्स ऑवफुलच असतो..”
“अदिती पण त्यावेळी तुम्ही सगळे लहान होतात.. शाळेत होतात.. मी..”
“आभा.. तुझ्या आयुष्यात तो दिवस आज आलाय हा काय तुझा दोष आहे का..” आकाशने तिच्या खांदयावर हात ठेवत तिला विचारलं..
“आकाश बट.. आज माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे.. जर एकांकिका त्यांनी डॉप केली तर.. मला आयुष्यभर गिल्टी वाटत राहिलं..”
“असं काहीही होणार नाहीये आभा..” दारातून आत येत प्रतिक म्हणाला.. “मी सानप सरांना कन्विन्स केलय.. त्यांनी येणाऱ्या शनिवार पर्यंतचा वेळ दिला आहे.. आपण एक संपूर्ण रिहर्सल करून त्यांना दाखवायची आहे..”
आभा उठून प्रतिकजवळ गेली..
“प्रतिक मी त्यात नाही काम करणार..”
“आभा..”
“प्रतिक आत्ता पाहिलयस तू मी काय माती खाल्लीये ते.. आणि तरीही तुला वाटतय कि  मी.. सॉरी प्रतिक पण..” प्रतीकने तिचे दोन्ही खांदे धरले..
“आभा.. जर तू हे करू शकत नसशील तर बाकी कुणीही करू शकणार नाही..”
“पण प्रतिक..”
“आभा.. आता जर मी कुणी नवीन मुलगी यासाठी तयार करायची ठरवली तर आपल्या हातात तेवढा वेळ नाहीये.. तुला सगळं नाटक पाठ आहे आपल्याला फक्त तुझ्या मनातली हि भीती दूर करायचीये.. आणि फार फार तर काय होईल.. शनिवारची रिहर्सल खराब होईल.. ते एकांकिका मागे घेतील.. पण जर ती चांगली झाली तर.. हा चान्स आपण सोडायचा नाहीये आभा.. कारण मला खात्री आहे ती रिहर्सल सगळ्यात बेस्ट होणार आहे.. आय बिलीव्ह ऑन यु आभा.. आय बिलीव्ह ऑन यु..”
त्याच्या डोळ्यात आभाला पुन्हा तोच आत्मविश्वास दिसत होता.. आणि त्याच्या डोळ्यातून तो तिच्यात उतरत होता..
त्या दिवसापासून येणाऱ्या शनिवार पर्यंतचा काळ आभाच्या आयुष्यातला सगळ्यात मेहनतीचा पण खूप समाधान देवून जाणारा काळ ठरणार होता.. प्रतिक आभावर पूर्ण मेहनत करत होता.. दिवसातलं एखाद दुसरं लेक्चर ती क्लासरूममध्ये असायची.. पण अदरवाइज ती आणि प्रतिक ऑडीमधे आपला सगळा वेळ घालवत होते.. प्रत्येक वाक्य कसं बोलायचय.. त्यावेळी कुठे बघायचं.. काय रीअॅक्शन द्यायची हे सगळं प्रतिक तिला समजवत होता..
आकाश आणि अदिती जेव्हा वेळ मिळेल तेव्हा यायचे.. मग डान्सला लागून असलेल्या पोर्शनची ते तालिम करायचे.. ते दोघं न थकता पुन्हा पुन्हा त्याचं स्टेप्स करायचे..
आकाश तर इतरवेळीही आभाची खूप काळजी घ्यायचा.. संध्याकाळी ऑडीत येताना न चुकता काही न काही खायला घेवून यायचा.. आभाला मुद्दामून खावू घालायचा.. रात्री खूप उशीर व्हायचा.. मग आकाश आणि आभा बाहेरच जेवायचे.. मग तिला बाईकवरून नेताना तिला मागच्या मागे झोप तर लागत नाहीये न याची काळजी त्याला घ्यावी लागायची..
आभा खूप थकत होती.. पण तिला यात आनंद मिळत होता.. प्रतिक तिच्यावर जीव तोडून मेहनत घेत होता तर आकाश प्रत्येक बाबतीत तिची काळजी.. तिला खूप स्पेशल असल्यासारखं भासत होतं.. पण त्याचवेळी तिच्यावर किती मोठी जवाबदारी आहे या जाणीवेने तिची रात्रीची झोप बिघडली होती.. ती इतकी बिझी होती कि विधीशाशी तिचं बोलणं होत नव्हतं.. त्या दोघीच्या ठरवलेल्या प्लानवर तिला विचार करायला वेळ नव्हता.. तिला फक्त एकच दिसत होतं.. येणारा शनिवार..
आणि तो अखेर आलाच.. सकाळी ३ वाजताच आभाला जाग आली आणि परत झोप येण्याचं चिन्हच नव्हतं.. आज ती सानप सर आणि काही इतर शिक्षक यांच्यासमोर परफॉर्म करणार होती.. तिला जास्त कम्फर्टेबल वाटावं म्हणून प्रतीकने त्याचे सारे नियम तोडून तिच्या काही ओळखीच्या लोकांना बोलवायची परमिशन दिली होती.. आभाने कुणालाच बोलावलं नाही.. पण इतरांनी काही लोकांना बोलावलं ज्यात सोहमही होता.. शशिकांत सरही आज आले होते..
बॅकस्टेजला जोरदार तयारी सुरु होती.. प्रतीकने रंगीत तालमी सारखी तालीम करायचं ठरवलं.. मेकप, ड्रेपरी, सेट सकट.. त्याने प्रेक्षकांवर विशेष प्रभावही पडला असता आणि आभाचीही एक तालीम झाली असती.. शोला १० मिनिटं उरलेली असताना आभा तयार झाली कि नाही हे पहायला प्रतिक मेकअप रूम मध्ये गेला..
आभा तयार होवून एकटीच आरशासमोर बसली होती.. प्रतीकने तिला पाहिलं.. ती फार सुंदर दिसत होती.. तिने प्रतीककडे पाहिलं.. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड टेन्शन दिसत होतं.. ती जागेवरून उठली आणि घाईघाईत त्याच्या जवळ आली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली.. प्रतिक दोन क्षण अवघडला.. तिचं डोकं त्याच्या छातीवर टेकलेलं होतं..
तिला खूप टेन्शन आलंय आणि हि मिठी फक्त आधारासाठी आहे हे प्रतिकला जाणवत होतं.. त्यालाही तितकच टेन्शन आलं होतं.. त्याने अलगद तिचं डोकं थोपटलं.. तिने त्याच्याकडे पाहिलं.. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते..
“सगळं काही ठीक होईल ना प्रतिक.. मला जमेल ना सगळं..”
“काळजीच करू नकोस.. आजचा परफॉर्मन्स सगळ्यात बेस्ट असेल..”

आभा एकांकिका संपवून मेकअपरूम मधे आली तेव्हा प्रतिकच हे वाक्य तिला आठवलं.. आजचा हा स्पेशल शो खरच सगळ्यात बेस्ट झाला होता.. एकांकिका सुरु झाल्यावर पहिली दोन मिनिटं वाटणारा ऑकवर्डनेस नंतर कुठच्या कुठे निघून गेला होता आणि ती मनापासून लैला झाली होती..
ती अशाच विचारात हरवलेली असताना इतर सगळा ग्रुप मेकअप रूम मध्ये धावत आला.. आकाश त्यांच्यात सगळ्यात पुढे होता.. त्याने आभाला कौतुकाने मिठी मारली..
“आभा कमाल केलीस तू.. स्टॅन्डींग मिळालं एकांकिकेला.. सानप सर खूप खूष दिसत होते..”
त्याच्या पाठोपाठ प्रत्येकानेच आभाचं अभिनंदन केलं.. आणि दारातून प्रतिक आत आला.. तो आला तोच ओरडत..
“गाईज.. आपण सवाईला जातोय..”
सगळ्यांनी जोरात कल्ला केला.. मुलांनी प्रतीकवर उड्याच टाकल्या.. सगळेच एकमेकांना मिठी मारत होते.. प्रतिक त्यातून वाट काढत आभा पर्यंत आला.. आणि त्याने हात पुढे केला..
“अभिनंदन मिस आभा.. यु मेड इट..”
आभाने आनंदाने त्याचा हात हातात घेतला आणि जोरात ओरडली..
“थ्री चिअर्स फॉर प्रतिक.. हिप हिप..”
“हुर्रे!” सगळे ओरडले..

ते सगळे मेकअप वगैरे उतरवून बाहेर पडले तेव्हा सोहम आणि शशिकांत त्यांची वाट पाहत होते.. शशिकांत आधी आभाला भेटला आणि तिची खूप स्तुती केली.. ती पहिल्यांदा अभिनय करतेय असं अजिबात वाटत नव्हतं.. ते प्रतीककडे बघून एक वाक्य म्हणाले जी आभासाठी सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट होती..
“प्रतिक.. तू एक स्टार जन्माला घातलास असं दिसतय..”
प्रतीकने यावर आभाकडे फक्त अभिमानाने पाहिलं.. त्याची नजर सारं काही बोलून जात होती..
शशिकांत त्यांना पुढच्या आठवड्यात असलेल्या आपल्या भावाच्या हळदीच इंव्हीटेशन देवून निघाला आणि सोहम पुठे आला.. त्यानेहि आभाचं खूप कौतुक केलं.. मग तो प्रतिकला भेटला आणि स्वत:ची ओळख करून दिली..
“मला एक रिक्वेस्ट करायचीये तुम्हाला.. करू का?” सोहमने जरा घाबरतच विचारलं कारण प्रतीकच्या रागाचे किस्से त्याने ऐकले होते..
“काय? बोल ना..” प्रतिक म्हणाला तसा त्याला धीर आला..
“माझं.. एक फार्महाउस आहे.. कर्जतला.. माझी इच्छा आहे कि तुमच्या सगळ्या टीमने आज इतका छान परफॉर्मन्स दिलाय तर तुम्हा सगळ्यांनाच रिलॅक्स व्हायला म्हणून मी उद्या तिथे इन्व्हाईट करावं..” सगळ्यांच्या नजर प्रतिककडे फिरल्या.. प्रतिक जरा गंभीर झाला..
“उद्या? पण..”
“आय विल मॅनेज एव्हरीथिंग.. उद्या संडे आहे तर मझ्या डॅडच्या ऑफिसची बस अरेंज करतो मी.. सकाळी आठ वाजता निघू आपण.. रात्री दहा पर्यंत परत पोहचू..”
सगळ्यांना हा प्लान अतिशय आवडला.. गेले काही दिवस सगळ्यांनी खूप मेहनत केली होती.. पिकनिकच्या नावाने सगळ्यांनाच आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या पण सगळं काही प्रतीकवर अवलंबून होतं.. प्रतीकचा चेहरा खूप गंभीर दिसत होता.. अखेर खूप विचार करून त्याने तोंड उघडलं..
“नाही रे.. सॉरी..” प्रतीकच्या उत्तराने सगळ्यांचेच चेहरे पडले.. सोहमहि हिरमुसला.. कारण सगळी तयारी त्याने आधीच करून ठेवलेली होती.. प्रतीकने पुन्हा एकदा विचार करावा असं त्याला वाटत होतं.. त्याने बोलायला तोंड उघडलं पण प्रतिकच म्हणाला..
“आठच्या ऐवजी सातला निघालं तर नाही चालणार? आठ खूप लेट होईल नाही?”
त्याने सगळ्यांना उद्देशून विचारलं.. सगळ्यांना रिअलाइज व्हायला दोन क्षण गेले आणि मग रिकाम्या कॉलेजमधे सगळ्यांचा एकच आवाज घुमला..

सगळे घरी परतताना उद्याच्या पिकनिकच्या विचाराने खूष होते.. पण प्रतिक मात्र आजच्या दिवसामध्येच रमला होता.. आज आभाचं काम पाहून त्याला तिचं खूप कौतुक वाटलं होतं.. त्याचं सहज लक्ष गेलं.. त्याच्या पांढऱ्या शर्टावर जिथे आभाच डोकं टेकलं होतं तिथे मेकअपचा एक डाग राहिला होता.. तो स्वत:शीच हसला.. त्याने त्या डागावरून अलगद हात फिरवला.. मेकअपचे डाग जात नाहीत हे किती बरं आहे.. त्याच्या मनात विचार येवून गेला..

क्रमशः





Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४

ओलांडून जाताना... भाग - 3