ओलांडून जाताना... भाग-१४



आभाच्या वर्गात सोशॉलॉजीचा क्लास सुरु होता.. अय्यर सर आपल्या विचित्र शैलीत शिकवत होते.. हे सर एकदम कुल होते.. त्यामुळे पोरं एन्जॉय करत होती.. कमेंट्स करत होती.. सरही त्यावर काहीतरी जोक मारत होते.. असा खेळीमेळीत वर्ग सुरु होता.. आभा हे सारं एन्जॉय करत होती.. कॉलेजमधला आधीचा सगळा वेळ तिने आकाशच्या मागे घालवला होता.. तेव्हा हे सगळं किती अनइंपॉर्टन्ट वाटायचं.. पण आता क्लासरूम मधली गम्मत तिला कळत होती.. काही नकचढ्या वाटणाऱ्या मुली आता तिच्याशी बोलू लागल्या होत्या.. हे ती क्लासमध्ये जास्त वेळ घालवू लागली होती म्हणून झालं होतं का ती प्रतिष्टीत असा ड्रामा सर्कलची मेंबर झाली होती म्हणून झालं होतं हे काही आभाला सांगता आलं नसतं.. पण हळूहळू तिचा असा एक ग्रुप बनू लागला होता.. क्लासरूममधे ती त्यांच्यासोबत मज्जेत टाईमपास करत होती.. जणू तिची दोन आयुष्य होती.. हे एक अकरावीतल्या मुलीचं क्लासरूम मधलं आयुष्य.. आणि दुसरं आकाश भोवती फिरणारं.. ड्रामाग्रुप मधे रमणार.. आणि दोन्हीही आयुष्य ती पूर्णपणे एन्जॉय करत होती..
लेक्चर संपवून ती क्लासबाहेर पडली तेव्हा ड्रामाग्रुपचा एक मुलगा दारात तिचीच वाट बघत उभा होता.. त्याला इथे पाहून आभाला आश्चर्य वाटलं.. कारण आत्ता ती ऑडीमधेच निघाली होती.. त्याचं आभाकडे लक्ष गेलं तसा तो घाईघाईत तिच्याकडे आला..
“आभा लवकर चल ऑडीमधे.. आकाश आणि अदितीचं भांडण झालंय..”
“काय?” आभाला कळेच ना हे अचानक काय झालं.. “कशावरून?”
“तेच कळत नाहीये ना.. ते काहीच बोलत नाहीएत.. दोघंही एकमेकांसोबत डान्स करणार नाहीत असं म्हणतायत..”
आभाच्या पायाखालची वाळूच सरकली.. प्लानचा भाग म्हणून आभाने अदितीला सारं खरं सांगितलं होतं.. ती आकाशची गर्लफ्रेंड नाही.. तर ती तसं नाटक करतेय.. अदितीने आकाशला ते सगळं सांगितलं तर नसेल ना.. आभा ऑडीच्या दिशेने धावत सुटली.. पाठोपाठ तो मुलगाही होता.. अदितीने त्याला विचारलं..
“प्रतिक नाहीये का रिहर्सलला..”
“आला नाहीये अजून.. आकाश आणि अदिती आज एक तास आधीच येवून प्रॅक्टिस करत होते.. तेव्हाच झालय वाटतं काहीतरी..”
आभासामोरच ते ठरलं होतं.. आपण त्यांना असं एकटं सोडायलाच नको होतं असं आभाला वाटलं..

आभा जवळजवळ धावतच ऑडीमधे पोहोचली तेव्हा आकाश आणि अदिती दोन टोकांना एकमेकांकडे पाठ करून बसले होते.. आभा आत येताच दोघांनीही आभाकडे पाहिलं.. आभाच्या ह्रदयाचे ठोके वाढले होते.. तिला इथे कुठलाही तमाशा नको होता.. इतकं छान चाललेलं तिचं लाईफ इतक्यात डिस्टर्ब व्हावं असं तिला अजिबात वाटत नव्हतं.. तिने एक खोल श्वास घेतला.. धीर एकवटला आणि विचारलं..
“गाईज.. एनिथिंग राँग?”
आता तिला काय ऐकायला मिळणार आहे याची आभाला कल्पना नव्हती.. पण तिने काहीही ऐकायची तयारी ठेवली होती.. इतकंच काय पण तिने विधीशाला whatsapp करून संध्याकाळी बोलावूनही घेतलं होतं.. आभाचा प्रश्न संपला तसे आकाश आणि अदिती दोघंही एकत्रच बोलू लागले..
“मला याच्याबरोबर डान्सच करायचा नाहीये.. हा मला सतत चुकवतो.. याला काही लक्षातच नाहीये..”
“मला हिच्याबरोबर अजिब्बात डान्स करायची इच्छा नाहीये.. हि स्वत:पण चुकते आणि दुसऱ्यांनाही चुकवते..”
असं ते दोघं एकत्रच बोलल्याने आभाला काहीच कळल नाही.. आधी तर ती त्यांच्या बोलण्यात विश्वासघात, खोटी गर्लफ्रेंड, नाटक असे शब्द शोधत होती.. पण ते काही तिला मिळाले नाहीत आणि काही क्षण गेल्यावर हे काहीतरी वेगळंच बोलतायत हे तिला जाणवलं..
“एक मिनिट.. एक मिनिट.. तुम्ही दोघं एकेक करून बोलता का.. मला काही कळत नाहीये..”
पण त्या दोघांनाहि आपलं मत आधी मांडायचं असल्यामुळे पुन्हा त्यांचा तसाच गोंधळ सुरु झाला.. आभाने जवळजवळ ओरडून दोघांना गप्प केलं..
“अदिती आधी तू बोल..” यावर आकाशने एक डिसअपॉइंटमेंटवाली रीअॅक्शन दिली..
“आभा मी याच्याबरोबर डान्स नाही करू शकत..”
“मलाच नाही डान्स करायचा हिच्याबरोबर..”
“एक मिनिट आकाश.. अदिती काय झालय नक्की..” आभाला अजूनही काहीही क्लीअर होत नव्हतं..
“आभा हा सतत चुकतोय.. याचे मार्किंग चुकतायत.. टायमिंग चुकतायत.. आणि मी याला सांगायला गेले कि हा चीडतोय.. सिंक्रो होतच नाहीये काही..”
“बस.. म्हणजे याच्यावरूनच भांडत होता तुम्ही?” आभाला आजूनही विश्वास बसत नव्हता.. ज्या भांडणच तिने मघापासून इतकं टेन्शन घेतलं होतं.. त्याच्या कारणाविषयी इतके कयास बांधले होते पण तसं इथे काहीच नव्हतं.. एकांकीकेतल्या एखाद्या मुद्यावरून ते दोघं भांडत होते.. आभाला हायसं वाटलं आणि तिला स्वत:चच हसू आलं.. मनात चोर असला कि माणूस कुठच्या कुठे पोहोचतो.. मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात तेच खरं.. आभा हा सगळा विचार करून स्वत:शीच हसली.. ते पाहून आकाश आणि अदितीला खूप विचित्र वाटलं..
“आभा.. हसू येतय तुला.. आम्ही सिरीअसली बोलतोय.. आमचा परफॉर्मन्स खराब होईल अशाने.. मी हेच समजावतोय हिला पण हि ऐकतच नाहीये.. आता लैलाच्या एक्झिट नंतर जो डान्स आहे त्यात पण टायमिंग चुकली..”
“एक मिनिट.. मी नाही तू चुकतोयस..” ते पुन्हा लहान मुलांसारखे भांडू लागले.. चिडलेली माणसं किंवा प्रेमात पडलेली माणसं, लहान मुलांसारखीच वागतात.. यांच्या बाबतीत तर दोन्हीही झालं होतं.. आभाने दोघांना गप्प केलं..
“एक मिनिट.. काय चाललय तुमचं.. तुम्ही कितीवेळा रिहर्सल केल्यायत.. कितीवेळा शोज केलेयत लोकांसमोर.. तुम्ही कसे चुकू कसे शकता?”
“दर शोला हि असंच वेगवेगळ करायची.. पण मी अॅडजेस्ट करत होतो..”
“एक मिनिट.. मी दर शोला तेच करायचे पण तुझं काहीतरी वेगळ असायचं.. याच्या उत्स्फूर्त डान्समधे हा दरवेळी वेगळं काहीतरी करायचा आणि मी अॅडजेस्ट करायचे..”
आता कोण अॅडजेस्ट करायचं यावरून दोघं वाद घालू लागले.. प्रयोगातले किस्से दाखले म्हणून ऐकवू लागले..
आभाला आश्चर्य वाटत होतं.. कालपर्यंत एकमेकांना इतकं सांभाळून घेणारे आज काहीच अॅडजेस्ट करायला का तयार नव्हते? मैत्रीमैत्रीत चुका होतात.. आपण एखाद तास रुसतो आणि सोडून देतो.. पण मग प्रेमात झालेली एक चूक इतकी धरून का बसतो माणूस? मूव्ह ऑन व्हायचं ठरवलं तरी माणूसाच मन तिथेच का घुटमळत असतं? गोष्ट खूप छोटी होती.. वादाचं कारणही शुल्लक होतं.. पण आभाच्या मनात असंख्य प्रश्न क्षणात उभे राहिले.. पण त्यातला एकच तिने त्यांना विचारला..
“मग आता अॅडजेस्ट का करत नाही आहात तुम्ही?”
दोघांनी आभाकडे पाहिलं.. त्यांना काय बोलावं ते सुचत नव्हतं.. मघापासून तावातावाने भांडणारे दोघे अचानकच गप्प झाले.. एक प्रकारचा ऑकवर्डनेस दोघांमध्येही भरून राहिला.. आभा शांतपणे दोघांकडे पाहत होती..
“नका अॅडजेस्ट करू दोघही.. आपण एक काहीतरी ठरवून घेवूया.. मग दोघांनी तेच करा.. काहीही नवीन नको.. म्हणजे अॅडजेस्ट करण्याचा प्रश्नच येणार नाही.. ठीक आहे?” दोघंही यावर काहीच बोलले नाहीत.. “लैलाच्या एक्झिटला मेजर प्रॉब्लेम आहे ना.. चला तो सोडवून घेवू आधी..”

हि एकांकिका एक फिक्शन होती.. लैला मजनूचं जर लग्न झालं असतं तर त्याचं आयुष्य कसं असतं अशी एकांकिकेची कॉन्सेप्ट होती.. संसाराच्या जवाबदार्या.. लैलाचं मटिरिअलिस्टिक होणं.. मजनूचं त्या साऱ्यासाठी पैशामागे पळणं.. त्याचं प्रेम हरवत जाणं आणि फायनली त्यांनी वेगळं होणं.. विषय जगावेगळा नव्हता.. मांडणी होती.. गाणी, डान्स, कविता या साऱ्यासोबत ४० मिनिटात बसवलेलं हे पॅकेज लोकांना भारावून टाकणारं होतं..

आभा स्टेजच्या मधोमध उभी होती.. एकांकिकेत काम करणारी लैला आली नव्हती त्यामुळे ती तिचं वाक्य घेवून एक्झिट करणार होती.. टायमिंगवर म्युझिक ऑपरेट करणारा म्युझिक सोडणार होता.. आणि अदिती आणि आकाशने आपला पार्ट करायचा होता.. त्यात होणाऱ्या चुकांवर ते नंतर चर्चा करणार होते..
आभाने दोघं रेडी आहेत का नाही ते चेक केलं.. दोघेही आपल्या जागेवर होते.. एकमेकांच्या विरुद्ध विग्जमधे.. आभाने वाक्य घ्यायला सुरुवात केली..
“आता तुझ्यासारखा मला दिसत नाहीस तू..
एक अनोळखीपण भरून राहिलंय तुझ्यात आणि माझ्यात..
सात जन्मांच्या गाठी जशा सुटून जाव्यात क्षणात.. “
सगळे आभाकडे बघत होते.. जणू तिच या नाटकाची नायिका असल्यासारखी ती तो डायलॉग भावना ओतून बोलत होती.. हातात स्क्रिप्ट नव्हतं.. हिला हे सारं पाठ कसं झालं हाच प्रश्न सगळ्यांना पडला होतं..
“निसटून गेलं सारं कसं आणि मागे राहिली हुरहूर थोडी..
तुझ्या.. माझ्या....”
आणि आभा अचानक ब्लँक झाली.. तिला पुढचं काहीच आठवेना.. तिने घाई घाईत तिथे उभ्या असलेल्या एका मुलाकडे स्क्रिप्ट मागितलं.. तो तिचा परफॉर्मन्स बघण्यात एवढा गुंग झाला होता कि त्याच्याही हातात असलेलं स्क्रिप्ट फॉलो करायचंच राहून गेलं होतं.. तो गडबडला आणि पानं चाळू लागला.. झटक्यात ऑडीच्या एकदम शेवटच्या दारातून एक आवाज ऑडीमधे घुमला..
“निसटून गेलं सारं कसं आणि मागे राहिली हुरहूर थोडी..”
आभा स्टेजवर होती त्यामुळे मागे अंधारात कोण आहे तेच तिला दिसत नव्हतं.. ती डोळे बारीक करून पाहण्याचा प्रयत्न करू लागली..
“निसटून गेलं सारं कसं आणि मागे राहिली हुरहूर थोडी..
तुझ्या माझ्या प्रारब्धामध्ये कधी कुणी लिहिली हि कोडी..”
हे बोलत बोलत जसा तो माणूस पुठे आला तसा तो आभाला दिसला.. एक पंचेचाळीशीतला माणूस.. फॉर्मल शर्ट पॅन्ट.. केस थोडेसे अस्ताव्यस्त.. डोळ्यांवर चष्मा.. त्यांना पाहून साऊंडवर बसलेला मुलगा जोरात ओरडला..
“शशिकांत सर.. कसे आहात..”
आभाला हे नाव कुठे वाचलय ते आठवलं.. ते एकांकिकेचे लेखक होते..
“मी बरा आहे.. चालु द्या.. चालू द्या तुमचं.. रिहर्सल नका थांबवू..” ते म्हणाले.. आणि आभाने कंटिन्यू केलं..
आभाने ती लास्ट ओळ परत घेतली.. तिने एक्झिट घेतली आणि म्युझिकवाल्याने म्युझिक प्ले केलं.. अदिती आणि आकाशने एन्ट्री घेतली.. पण ते दोन्ही विंग्जमधून एकमेकांजवळ येतानाच टायमिंग चुकले.. पुठे ३-४ स्टेप्समध्येच त्यांच्यात गोंधळ उडाला आणि मग त्यांनी डान्सच थांबवला..
“आभा.. धिस वोन्ट वर्क यार.. छोड..” अदिती म्हणाली..
“पार्टनर्स चेंज करा.. मला हवं तर मागे टाका.. आय अॅम फाईन..” आकाश म्हणाला..
“मीही तयार आहे मागे नाचायला.. आय हॅव नो इश्युज..” अदिती म्हणाली..
“वा.. म्हणजे फायनली तुमचं कुठल्यातरी बाबतीत एकमत झालय..” आभा म्हणाली.. त्यावर ऑडीमधली सगळी मुलं हसली.. आभा आकाश आणि अदिती जवळ आली..
“आता तुम्ही दोघ एक काम करा.. माझ्यासाठी प्लीज.. बसा आणि बोला..”
“आभा..” आकाश काहीतरी बोलणार होता पण आभाने त्याला मधेच तोडलं..
“प्लीज.. तुम्ही दोघही या शोसाठी महत्वाचे आहात.. त्यामुळे तुम्हाला रिप्लेस वगैरे काही करणार नाहीओत आपण.. सो प्लिज तुम्ही बोला आणि हे जे काय आहे ते सॉर्ट आउट करा..”
आभा त्याचं काहीही न ऐकता त्यांना तसच ऑकवर्ड झोन मधे सोडून स्टेजखाली उतरली.. अदिती आणि आकाशने एकमेकांकडे पाहिलं.. दोघांनाही काय बोलावं कळत नव्हतं.. हे संकट टाळावं म्हणून आकाशने आभाकडे पाहिलं.. तिने खुणेनेच त्याला प्लीज बोल असं सांगितलं.. आकाशने अदितीकडे पाहिलं..
“बोलुयाच राईट.. आय गेस दॅट विल मेक इट इझी..”

आभाला त्या दोघांना बोलताना पाहून हायसं वाटलं.. मग ती ऑडियन्सच्या पहिल्याच रांगेत बसलेल्या शाशिकांतना जावून भेटली..
“तू नवीन लैला करतेयस का?” शशिकांतने तिला विचारलं..
“नाही.. मी प्रतिकला असिस्ट करतेय..तो आलाय कॉलेजला.. कुठे राहिला..” आभाने खिशातून मोबाईल काढून चेक केला..
“पण कामही चांगल करशील तू.. आत्ता पाहिलं न मी..”
“ते.. ते असचं यांची रिहर्सल घ्यायची म्हणून..” आभा फोन खिशात ठेवत त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसत म्हणाली..
“अच्छा.. मग.. कशी वाटली एकांकिका..”
“छान आहे..”
“पण..” शशिकांत म्हणाला.. आभाला त्याचा रोख कळला नाही..
“पण काय..”
“एकांकिका आवडली ‘पण’!!... असा एक पण तुझ्या वाक्याच्या पुढे आहे.. तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय तो.. बोल काय खटकलंय..”
आभाला काही खटकलं नव्हतं.. पण काही शंका होत्या.. पण त्या अशा पहिल्याच भेटीत कशा सांगायच्या.. आणि तसंही त्याचं निरसन करून घेण्याची फार गरज आभाला वाटत नव्हती..
“नाही.. मला काय खटकणार.. असं काही नाही.. छान आहे..”
“ठीक आहे.. नाही म्हणजे तुला माझं नुकसानच करायचं असेल तर तुझी इच्छा..”
या वाक्याचा काय अर्थ हे आभाला अजिबात कळलं नाही..
“काय?”
“बघ.. म्हणजे जर या एकांकिकेत माझ्याकडून काही चूक झाली असेल.. खटकण्यासारख काही लिहिलं गेलं असेल आणि ते जर तू मला नाही दाखवून दिलस तर नेक्स्ट टाईम मी तिचं चूक करणार.. म्हणजे झालं ना माझ्यातल्या लेखकाचं नुकसान..”
आभाला या सगळ्या स्पष्टीकरणाची जामच गम्मत वाटली.. ती हसली..
“नाही.. तसं खरच काही नाहीये..” ती समोर पाहू लागली.. स्टेजवर आकाश आणि अदिती बोलत होते.. ते काय बोलतायत ते कळत नव्हतं.. पण त्यांच्यातली अस्वस्थता आभाला खाली बसूनही जाणवत होती.. तिला काय वाटलं कोण जाणे ती शशिकांतकडे बघून म्हणाली..
“तुम्हाला असं नाही वटत कि या एकांकिकेत अगदी लैला मजनू हि पात्र वापरण्यापेक्षा नॉर्मल कॅरेक्टर्स वापरले असते.. म्हणजे आपल्या आजुबाजुचे वाटतील असे तर लोकांनी जास्त रिलेट केलं असतं एकांकीकेशी..”
“अच्छा...” शशिकांतने तिच्या वाक्यावर जरा विचार केला.. “का तू रिलेट नाही करू शकत यांच्याशी..”
“तसं नाही.. पण.. हे लैला मजनू वाटत नाहीत.. त्याचं प्रेम इतकं हाय क्लास होतं.. आणि हे असे पैशाच्या मागे लागलेले.. आजच्या काळातल्या जोडप्यांसारखे लैला मजनू... ऑड वाटत नाहीत?”
“हां.. त्यांची लव्हस्टोरी विचारात घेता आहे ऑड.. पण तुला एक गंमत सांगू.. बहुतेक सगळ्या अजरामर लव्हस्टोरिंमधल्या कपल्सची लग्न कधीच झाली नाहीत.. आणि ज्यांची झाली त्यांच्या प्रेमकथांना लग्नाच्या वेळीच फुलस्टॉप मिळाला..”
“म्हणजे यु मीन टू से.. लग्नानंतर प्रेम संपत.. राईट?” आभाने हसून विचारलं..
“नाही.. लग्नानंतर ते फक्त प्रॅक्टिकल होतं.. मग असं प्रॅक्टिकल प्रेम ज्यांना झेपत त्याचं टिकत.. ज्यांना नाही झेपत.. त्याचं असं होतं..”
आभाला हि गोष्ट विचार करायला लावणारी होती.. जर कुठलही नातं या एकांकिकेत दाखवलय तसच संपणार असेल तर या सगळ्याला अर्थ काय.. तिला स्टेजवर बसलेले अदिती आणि आकाश दिसले.. आता त्यांनी स्क्रिप्ट घेतलं होतं.. त्यात ते काही तरी नोट डाउन करत होते.. पण अजूनही तो ऑकवर्डनेस तसाच होता..
आपल्याला आवडणारा माणूस दुसऱ्यावर प्रेम करतो हे आकाश प्रॅक्टिकल होवून स्वीकारू शकला नाही.. त्याने एक खोटं जन्माला घातलं.. आभाही त्या बाबतीत प्रॅक्टिकल होवू शकली नाही.. तिने विधीशाच्या मदतीने हा प्लान उभा केला..  
बापरे! आपण फारच पोक्त माणसासारखा विचार करतोय असं आभाला वाटलं.. आणि तिला स्वत:चच हसू आलं..
“असं असेल तर मग प्रेम करायलाच नको नाही..” ती स्वत:च्याच तंद्रीत, पण उघडपणे बोलून गेली..
“असं कसं? प्रेम हे करायलाच पाहिजे.. पण मग जे काही होईल त्याची तयारी ठेवून ते करायला पाहिजे.. आपल्या कंडीशन्सवर नाही..” आभाला ते पटलं.. शशिकांतला ते तिच्या डोळ्यात दिसत होतं.. “कसं असतं ना आभा.. ज्याचा पतंग सगळ्यात उंच उडत असतो ना त्याच्या हातावर मांज्याच्या जखमा सगळ्यात जास्त असतात.. प्रेमाचंहि तसच असतं.. त्यामुळे आपण ठरवायचं असतं आपला पतंग उंच न्यायचा कि आपले हात सांभाळायचे..”
आभाला हे वाक्य एकदम भिडलंच.. किती सोप्प.. तरीही किती कठीण.. ती यावर काही बोलणार इतक्यात प्रतिक तिथे आला.. त्याला प्रिन्सिपलने बोलावून घेतलं होतं.. तो शाशिकांतला बघून खुश झाला.. दोघही बोलण्यात बिझी झाले.. बोलण्यात मधे मधे आभाच येणारं नाव तिच्या कानावर पडत होतं.. पण तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं.. ती स्टेजवर बसलेल्या आकाश आणि आदितीकडे पाहत होती..
एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालून बघताना ते दोघेही थंडपणे रीअॅक्ट होत होते पण समोरच्याचं लक्ष नसताना त्यांच्या डोळ्यातले भाव खूप काही सांगून जात होते.. आभाला त्यांना पाहून हसू आलं.. ते दोघंही ठरवू शकत नव्हते.. पतंग उंच उडवायचा कि आपले हात वाचवायचे..
आभाला आता एकांकिकेचा अर्थ लागू लागला होता.. आणि आता तिलाही कळेनासं झालं होतं.. 
पतंग उंच उडवायचा कि हात वाचवायचे..


क्रमशः  









Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४

ओलांडून जाताना... भाग - 3