ओलांडून जाताना.. भाग- २६



     थंडी आता अचानक कमी झाली होती.. बरेच दिवस कमी स्पीडवर सेट झालेल्या fan चा स्पीड आता वाढला होता.. आभा त्याचं पंख्याकडे बघत बेडवर झोपून राहिली होती.. रात्रीचे दोन वाजले तरी तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता.. या महिन्याच्या सुरुवातीला हे घडलं होतं.. एका वेगळ्या कारणामुळे.. आणि आज तोच अनुभव तिला येत होता एका वेगळ्या कारणामुळे..
उद्या तिच्या आयुष्यातला पहिला सवाई परफॉर्मन्स होता.. सवाईच कशाला, तिच्या एकंदर आयुष्यात तिने इतक्या लोकांसमोर कधीही परफॉर्म केलं नव्हतं.. तिने पाहिलेले याचं एकांकिकेचे इतर प्रयोग तिला आठवले.. लोकांच्या जथ्यांनी भरलेली ऑडीटोरीअम्स.. नारेबाजी करणारी पोरं.. शेरेबाजी करणारी पोरं.. टाळ्या वाजवणारे लोक.. विनोदावर दिलखुलास हसणारे लोक.. त्यावेळीही तिला ते सारं खूप एक्सायटिंग वाटायचं.. ती त्या गर्दीचा एक भाग व्हायची.. त्यांच्याबरोबर वाहत जायची.. आपल्या कॉलेजला घसा बसे पर्यंत सपोर्ट करायची.. आणि हात दुखेपर्यंत त्याचं कौतुक करायची..
पण उद्या हे सारं बदलणार होतं.. ती त्या गर्दीतून उठून त्या रंगमंचाचा एक बाग होवून जाणार होती.. तिच्यासाठी हे एक फार मोठं पाउल होतं.. इतरांनी वर्ष वर्ष घालून त्यांना जे मिळालं नव्हतं ते तिला अवघ्या महिन्या भरात मिळालं होतं.. थेट सवाई फायनलचा परफॉर्मन्स..
हे सारं कुणामुळे घडलं होतं.. आकाशमुळे? कारण त्याच्या एका नकारामुळे तिचा हा सगळा प्रवास सुरु झाला होता.. मग हे त्याचं श्रेय का हे त्या अदितीचं श्रेय जिच्यामुळे आकाशने तो नकार आभाला दिला होता.. का मग याचं श्रेय विधीशाला द्यायचं.. जिने हरल्यावरही हा खेळ एका वेगळ्या पद्धतीने खेळायची जिद्द आभाला दिली होती.. तिचा प्लान नसता तर आभाने इथपर्यंतचा प्रवास सुरूच केला नसता.. आज तिच्या प्लानमुळे ठरल्याप्रमाणे आकाश अदितीला विसरून आभाच्या आयुष्यात परत आला होताच पण त्याचबरोबर आभाला तिची एक संपूर्णपणे स्वतंत्र ओळख मिळाली होती.. आकाशच्या सावलीतून तिचं अस्तित्व मुक्त झालं होतं.. मग हे श्रेय विधीशाचच म्हणायला हवं.. पण नाही! जर प्रतीकने तिच्या उर्मटपणाचा राग न मानता तिला नेमकं काय म्हणायचय हे जाणून घेवून तिला हा चान्सच दिला नसता तर हे सारच होणं कठीण होतं..
आभाला जाणवलं.. तिच्या या प्रवासाला यापैकी प्रत्येकजण जवाबदार आहे.. आणि सगळ्यात जास्त जवाबदार जर कुणी असेल तर ते म्हणजे ती स्वत:.. कारण समोर येईल तो प्रत्येक चान्स तिने घेतला नसता तर हे काहीच घडल नसतं.. उद्या ती तिच्या आयुष्यातला पहिला मोठा परफॉर्मन्स तर देणारचं होती.. पण त्यानंतर तिचं पहिलं प्रेम असलेला आकाश तिला प्रपोज करणार होता.. एका महिन्यात तिने कधी विचारही केला नव्हता इतकी मजल मारली होती.. तिच्या प्रत्येक निर्णयाने ती इथपर्यंत येवून पोहोचली होतो.. तिला जाणवलं दुसरे फक्त आपल्या प्रवाहाला दिशा देत असतात.. कुठल्या किनार्यावर जायचं हे शेवटी आपणच ठरवत असतो..
आणि हे जसं आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींना लागू होतं तसंचं आपल्या सोबत काहीही वाईट घडलं तर त्यालाही हाच नियम लागू होत असतो.. आभाने या महिन्याच्या सुरुवातीला जे दु:ख जे फ्रस्ट्रेशन पाहिलं त्यालाही खऱ्या अर्थाने तिचं जवाबदार होती हे आज तिला जाणवत होतं.. एका व्यक्तीला आपलं संपूर्ण आयुष्य बनवून टाकण्याचा निर्णय तिनेच घेतला होता.. त्या प्रमाणेच वागणं त्या व्यक्तीवर का बरं बंधनकारक असावं.. त्या व्यक्तीने आभाच्या निर्णयाप्रमाणे न वागण्याचा निर्णय घेतल्यावर स्वत:ला इतका त्रास करून घेण्याचा निर्णयही तर आभाचा होता..
आपल्या आयुष्यासाठी नेहमीच आपण जवाबदार असतो हे जेव्हा लोकांना प्रॅक्टिकली कळेल तेव्हा ब्रेकअप नंतरचे अर्धे त्रास संपलेले असतील असं विधीशा नेह्मी म्हणायची.. त्याचा आभाला आता उलगडा होत होता.. हा विचार आभाच्या मनात चमकला आणि तिला विधीशाची प्रचंड आठवण आली..
गेले काही दिवस तिचं आणि विधीशाच बोलणं फक्त फोनपुरतंच मर्यादित झालं होतं.. विधिशा भेटणं टाळायची.. फोनवर फारवेळ बोलणही टाळायची.. आभाला वाटत होतं तिच्या आयुष्यातल्या या खास दिवशी विधीशाने तिथे असावं पण विधीशाचा फोनच लागला नव्हता.. विधीशाच काय झालं असावं हा प्रश्न आभाला सतावू लागला.. २६ तारखेलाच संध्याकाळी ती जावून विधीशाला भेटणार होती.. या साऱ्याचा सोक्षमोक्ष लावणार होती..
आभाने घड्याळ पाहिलं.. रात्रीचे ३ वाजले होते.. आता तिला झोपणं भाग होतं.. सवाईला रात्रभर झोप मिळणार नव्हती.. तिने डोळे मिटले.. पण डोक्यातलं विचारांचं तेच चक्र सुरु होतं.. आयुष्यातला पहिला रोल.. पहिलीच मोठी स्पर्धा.. आयुष्यातलं पहिलं प्रेम.. आणि उद्या ती त्याला देणार असलेला पहिला होकार..
रात्री खूप उशिरा तिला कधी झोप लागली तेच कळलं नाही..

दुसऱ्या दिवशी सकाळ पासूनच तिला अभिनंदनाचे बरेच फोन येवून गेले.. घरच्यांना तिचं कौतुक होतं.. आईने तर सगळ्या नातलगांमध्ये तिच्या या प्रयोगाची जाहिरात केली होती.. पण आभाने घरातल्या कुणालाही सवाईला यायला विरोध केला होता.. यावरून आईचं आणि तिचं खूप वाजलं हि होतं..
“माझी मुलगी पहिल्यांदाच स्टेजवर परफॉर्म करणार आणि मी पहायचं नाही ते.. असं का?”
तिने बाबांवर काहीही करून सवाईची तिकिटं मिळवण्याची जवाबदारी टाकली.. मग आभाने बाबांनाच साईडला घेतलं.. ते सगळे आले तर आभा कशी कॉन्शस होईल.. तिच्या परफॉर्मन्सवर कसा परिणाम होईल हे तिने बाबांना नीट समजावून सांगितलं.. पण बाबांना समजवण्यासाठी सगळ्यात उपयुक्त मुद्दा ठरला तो ती स्पर्धा रात्रभर असते हा.. आणि त्यातही आभाची एकांकिका शेवटच्या तीन मध्ये आहे हे ऐकून तर बाबांचा मूड जवळ जवळ संपलाच.. झोपेपुढे त्यांना काहीही प्रिय नव्हतं.. एवढ्या एकाच कारणामुळे त्यांनी आभाला पाठींबा द्यायचं ठरवलं आणि ऐत्यावेली तिकिटं मिळालीच नाहीत असं सांगून आईच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरवलं..
त्यामुळे खरं तर आई सकाळपासूनच खूप अस्वस्थ होती.. तिचा त्रागाच सुरु होता.. आभाने सुरुवातीलाच नाट लावली म्हणून सगळं बिघडलं असं तिचं मत होतं.. पण दुपार नंतर आभा निघायची वेळ जशी जवळ आली तशी आई वरमली.. निघताना तिने आभाला दही भरवलं.. डोळे भरून आशीर्वाद दिले.. आणि आभा घराबाहेर पडली..
खरं तर तिला वाटलेलं इतर बर्याच कॉलेजेस प्रमाणे त्यांचा ग्रुपही कॉलेजमध्ये भेटेल.. आणि मग सगळे एकत्रच जातील.. पण प्रतीकने सगळ्या मुलींना थेट थेटरवर यायला सांगितलं होतं.. आकाशला बॅकस्टेजसाठी मदत करायची असल्याने त्याला मात्र कॉलेजला जावं लागणार होतं.. त्यामुळे तो खरं तर हिरमुसला होता.. त्याच्या या साऱ्या वागण्याची आभाला खूप गम्मत वाटायची.. तिला गेल्या काही दिवसात हे जाणवलं होतं कि तो अदिती मधून पूर्णपणे अलिप्त झालं होता.. आभाला त्या गोष्टीचा आनंदही झाला होता पण अदिती बद्दल तिला वाईटही वाटत होतं.. आभा गेटजवळ आली आणि सवयी प्रमाणे तिने आकाशची बाईक जिथे पार्क असते तिथे पाहिलं.. आकाश बाईक घेवून गेला होता.. म्हणजे पहाटे येताना आकाशच्या बाईकवरून यायचं.. तिला पिकनिकला जाताना बाईकवरून तिने आकाश सोबत केलेला कॉलेजपर्यंतचा प्रवास आठवला.. त्यावेळी ते खूप जवळ आले होते.. आभाला ते आठवून लाजल्यासारखं झालं.. ती स्वत:शीच हसली आणि गेटबाहेर पडली..
आज घराबाहेर पडताना तीला वेगळंच काहीतरी वाटत होतं.. पोटात फुलपाखरं उडतात म्हणजे नेमकं काय होतं हे आता तिला जाणवत होतं.. तिला खूप स्पेशल वाटत होतं.. सगळ जग आपल्यालाच बघतय असं.. हि फिलिंग ग्रेट होती.. प्रेमात पडल्यावर वाटतं त्याहीपेक्षा मस्त होतं का हे? आभा विचार करू लागली..
ती ठरल्या वेळेत थेटरवर पोहोचली.. आजून तिच्या ग्रुपचं कुणीही आलं नव्हतं.. बाहेर इतर अनेक कॉलेज्सच्या बसेस उभ्या होत्या.. मुलांची रेलचेल होती.. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक टेन्शन होतं.. उत्साह होता.. आभा चालत चालत थेटरबाहेर उभारलेल्या पु.लं.च्या पुतळ्या समोरच्या मोकळ्या जागेत जावून पोहोचली.. तिथेही तिच्या ग्रुपचं कुणीच दिसत नव्हतं.. ती तो सारा परिसर न्यहाळू लागली.. तिच्या सारख्याच अनेक मुला मुलींच्या गर्दीने तो भरून गेला होता.. ती सारी पु.लं.च्या पुतळ्या जवळच्या पायऱ्यांवर बसली होती..
आभाच लक्ष पु.लं.च्या पुतळ्याकडे गेलं.. तो त्या मोकळ्या जागेला पाठ करून उभा होता.. रस्त्याकडे त्याचं तोंड होतं.. त्याच्या भोवती स्टेजसारखा चौथरा होतं आणि कुठल्यातरी कार्यक्रमासाठी त्याचाच स्टेजम्हणून वापर करण्याची तयारी तिथे सुरु दिसत होती.. कुणीतरी स्टेजचा बॅकड्रॉप असा उभारला होता कि तो नेमका पु.लं.च्या पुतळ्यासमोर आला होता.. पु.लं. त्या कापडी भिंतीकडे तोंड करून उभे असावेत असं दिसत होतं..
“यांना भिंतीकडे तोंड करून उभं राहण्याची शिक्षा दिलिए असं वाटतय नाही..”
आभाच्या मागून एक ओळखीचा आवाज आला.. आभाने वळून पाहिलं.. ती विधिशा होती..
“विधी” आभा जवळ जवळ किंचाळलीच.. तिने विधीशाला घट्ट मिठी मारली..
“फायनली आलीस तू..”
“बेबी.. तुज्या आयुष्यातला इतका मोठा दिवस आणि मी येणार नाही असं होईल..”
“येस.. येस.. येस.. आय अॅम सो हॅपी..” इतक्यात आभाचा फोन वाजला.. तिने पाहिलं प्रतीकचा फोन होता.. “हां प्रतिक.. बोल.. मी.. मी पु.लं.च्या पुतळ्या जवळ.. कुठे.. अच्छा.. ओके.. येते.. येते लगेच..” आभाने फोन कट केला.. “चल विधी.. ते लोक मागच्या साईडला आहेत.. चल तुझी भेट घडवून देते सगळ्यांशी..” आभा विधीशाला ओढतच म्हणाली.. विधीशाने तिला थांबवलं..
“बेबी.. तू जा पुढे.. तिथे आता खूप गोंधळ असेल.. मी संपल्यावर भेटेन न सगळ्यांना..”
“काही नसेल ग.. चल..”
“आभा.. अगं.. मला भेटायला अजून कुणीतरी येणार आहे..”
आभाला विधीशाच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं.. ती अशा प्रकारे टाळत होती जणू ती काही लपवतेय..
      “कोण येणार आहे?”
“आहे एक मित्र.. तोच तर तिकीट घेवून येतोय..”
“बॉयफ्रेंड??” आभाने कौतुकाने विचारलं..
“नाही ग.. फ्रेंड.. आता तू हो पुढे उगाच लेट होईल तुला..”
आभाला विधीशाच वागणं खरच विचित्र वाटत होतं पण तेवढ्यात पुन्हा प्रतीकचा फोन वाजला आणि ती निघाली.. विधीशाने सुटकेचा नि:श्वास सोडला.. खरं तर तिला कुणीच भेटायला येणार नव्हतं.. पण ती आभाशी आज खोटं बोलली होती..
तिच्या मनात जे होतं ते साध्य करण्यासाठी तिची कुणाशीच ओळख नसणं गरजेचं होतं.. त्यामुळेच ती सगळ्यांपासून लपत होती.. पण असं वागणारी इथे तिचं एक नव्हती.. मघापासून त्या दोघींना दुरून पाहणारा आजून एक जण होता.. जो इथे फक्त एकांकिका पहायला आला नव्हता.. हि रात्र आभा, आकाश आणि अदितीला लक्षात राहणार अशी होती..

क्रमशः 



Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४

ओलांडून जाताना... भाग - 3