ओलांडून जाताना.. भाग-२०



मुंबईच्या बाहेर बस पडेपर्यंत सगळे बस मध्ये सेट झाले होते.. अंताक्षरीचा शोध लागून आज किती वर्ष झाली असतील याचा काही अंदाज नाही पण तरीही आजही पिकनिक म्हंटल कि अंताक्षरीच का खेळली जाते याचा विचार आभा अंताक्षरी खेळता खेळता करत होती.. त्यातही काही अक्षरं आल्यावर काही गाणी ठरलेली.. त्यांच्याशिवाय अंताक्षरी पूर्णच होणार नाही.. जसं ‘ठ’ आलं कि ‘ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिये’ किंवा ‘ठाडे रहिओ’.. हि गाणी प्रत्येक अंताक्षरीत येतातच.. ‘ड’ वरून ‘डमडम डिगा डिगा’ म्हटलं जातंच.. आत्ताही एकदम मागच्या सीट वरून सिद्धार्थ तेच गात होता.. बाकीचे टाळ्या वाजवत होते..

सोहमच्या डोक्यात बरेच दिवस हि पिकनिक रेंगाळत होती.. अगदी वर्ष सुरु झालं तेव्हा पासून अदितीने त्याला होकार दिल्यानंतर तिच्या मित्रांशी कनेक्ट होण्याचा हा सगळ्यात चांगला मार्ग असेल असं त्याला वाटत होतं.. म्हणून त्याने सगळं काही स्वत: अरेंज करून हा योग जुळवून आणला होता.. आणि एका अर्थी आपण अतिशय योग्य केलंय याची खात्री सोहमला आता पटत होती.. पिकनिक.. मुंबई बाहेर पडणं.. त्यात हिवाळ्यातल थंड वातावरण.. अदितीवर या सार्याचा योग्य असर झालेला त्याला दिसत होता.. पिकनिकला निघाल्यापासुनच अदितीचा नूर एकदम बदलला होता.. (भाग १९) मग ते कॉलेजपर्यंत येताना गाडीत त्याला खेटून बसणं असो किंवा आता बस मध्ये त्याचा हात स्वत:हून खांद्याभोवती गुरफटून बसणं असो.. हि अदिती नवीन होती.. इंटेन्स होती.. अॅग्रेसिव्ह होती.. आणि त्याला ते खरंच आवडत होतं.. तिने एखाद्या क्रिटीकल अक्षरावरून बरोबर गाणं ओळखून भेंडी वाचवली कि ती खूष होवून त्याला मिठी मारत होती.. आज ती जरा जस्तच खूष असल्यासारखी भासत होती.. रोमॅन्टिक हवामानाने तिच्यावर परिणाम केला होता.. तिने सोहमचे दोन्ही हात धरले आणि स्वत:भोवती गुरफटून घेतले.. सोहमनेही तिला घट्ट जवळ घेतलं.. आणि तिच्या डोक्यावर हनुवटी टेकवून तो अंताक्षरी ऐकू लागला..

खिडकीच्या सीटवर सोहमला बसवून अदिती स्वत: शेजारच्या सीटवर बसली होती.. सोहमकडे तिची पाठ होती आणि त्याचे दोन्ही हात तिने स्वत:भोवती गुरफटून घेतले होते.. तिची नजर समोरच्या बाजूला बसलेल्या आकाशवर होती.. आपण त्याला पाहतोय हे त्याला दाखवून न देता ती सारं काही ऑबझर्व करत होती.. तो आभासोबत बसला होता.. तिचा हात हातात घेवून.. त्याची नजर मधेमधे अदितीला पाहत होतो हे अदितीला बरोबर कळत होतं.. त्याचं आपल्याकडे लक्ष आहे हे जाणवताच ती सोहमला अजून बिलगायची.. किंवा काहीतरी कारण काढून वळून त्याला मिठीच मारायची.. एकदा सोहमला मिठी मारल्यावर पटकन वळून तिने आकाशकडे पाहिलं.. त्याने गडबडीत नजर फिरवली.. अदितीला हे पाहून खूप मजा येत होती.. आज ती ठरवून आकाशला टीज करत होती.. तिच्या मनाच्या आत भरून राहिलेल्या वादळाला मार्ग करून देण्याचा हा प्रयत्न असावा बहुतेक..
अदितीचं आकाशवर खूप प्रेम होतं.. पण तिच्या आईने तिला सक्त ताकीद दिली होती.. जे तिच्या मावशीने केलं ते करायचं नाही.. प्रेमात पडून आपल्या आर्थिक पातळीपेक्षा कमी असलेल्या  खुठल्याही मुलामागे हुरळून जायचं नाही.. मर्सिडीजमधून फिरणारी मुलगी बस आणि ट्रेनचे धक्के खात कधीच सुखात राहू शकत नाही हे अदितीलाही पटत होतं.. पण तिच्याही नकळत ती एका मध्यमवर्गीय मुलाच्या, आकाशच्या प्रेमात पडली होती.. इतकी कि त्याच्यापासून स्वत:ला दूर करण्यासाठी तिच्याकडे एकच मार्ग उरला होता, स्वतःला दुसऱ्या कुणाच्यातरी प्रेमात पडायला भाग पाडायचं.. म्हणून तिने सोहमला होकार दिला पण लवकरच तिला कळलं कि त्याचा काहीच फायदा होणार नाहीये..
आकाशने तिला आभा त्याची गर्लफ्रेंड आहे असं सांगितलं तेव्हा तिला त्रास झाला होता, आकाशाचं तिच्यावर प्रेम आहे हे तिला कळलं होतं.. त्यामुळे त्याच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी असेल हे तिला सहनच होत नव्हतं पण एका अर्थी त्याचं तिला बरंही वाटलं होतं कारण आता आकाशपासून दूर जायला तिला अजून एक कारण मिळालं असतं.. पण त्याचं दरम्यान आभाने अदितीला हे सांगितलं कि ती आकाशची खरोखरची गर्लफ्रेंड नाहीये आणि फक्त त्याच्या सांगण्यावरून नाटक करतेय, तेव्हा अदितीला खूप आश्चर्य वाटलं होतं आणि का कोण जाणे पण या गोष्टीमुळे तिला वाटणारं आकाश बद्दलच आकर्षण अजून जास्त वाढलं होतं..
पण गेले काही दिवस तिला वेगळंच चित्र दिसत होतं.. आकाश आणि आभामधे असणारा अलूफनेस जावून ते अधिकाधिक जवळ येताना दिसत होते.. आभाचं आकाशच्या बाईकवरून कॉलेजव्यतिरिक्त इतर ठिकाणी फिरणं.. त्याला बाईकवर घट्ट बिलगून बसणं.. या साऱ्या गोष्टी अदितीला खटकू लागल्या होत्या.. ते दोघे आनंदी दिसत होते.. एकमेकांसोबत खूप खूष दिसत होते.. पण अदिती मात्र खूप डिस्टर्ब होती.. ज्याच्यावर प्रेम केलं, ज्याने आपल्यावर प्रेम केलं तो दुसऱ्या कुणासोबत खूष आहे आणि आपण खूष राहू म्हणून ज्याला निवडलं त्याच्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाहीये.. आपला प्रत्येक निर्णय फसलाय.. चुकलाय.. याविचाराने अदितीची प्रचंड चिडचिड होत होती.. कधी कधी तिला वाटायचं सगळं सोडावं आणि जावून आकाशला सांगावं तिला काय वाटतय.. त्याला सांगावं तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे..
पण मग तिच्या नजरेसमोर यायची तिची आई.. आईने नेवून दाखवलेलं मावशीच दहा बाय दहाचं घर.. जिथे तिने टोकाचा विरोधाभास पहिला होता.. एक बहिण जिने आर्थिक बाजू लक्षात घेवून लग्न केलं, ती मोठ्या फ्लॅटमधे राहत होती.. गाड्यातून फिरत होती.. दागिने घालून मिरवत होती.. आणि दुसरी जिने प्रेम करून लग्न केलं.. ती एका छोट्याशा घरात लोकांच्या गर्दीत राहत होती.. आपल्या श्रीमंत बहिणीकडून पैशांची मदत घेत होती.. बहिणीच्या दिलेल्या जुन्या साड्या वापरत होती.. हे सारं आठवलं कि अदिती गोंधळून जायची.. अस्वस्थ व्हायची.. तिची अजून जास्त चिडचिड व्हायची..
पण आज तिला आकाशला दाखवून द्यायचं होतं कि तो जसा तिच्या शिवाय खूष आहे तशी तीही खूप खूष आहे.. तिला दाखवून द्यायचं होतं कि तिचा निर्णय चुकलेला नाही.. तिने ज्याला निवडलं आहे त्याच्यावर तिचं खरोखर प्रेम आहे.. म्हणून अदिती आज जरा जास्तच हसत होती.. सोहमशी जास्तच जवळीक साधत होती.. आणि आकाश ते पाहून अस्वस्थ होत होता याने ती अजूनच जास्त खूष होत होती..

आज अदिती खूप खूष दिसत होती.. ती सोहमला बिलगून बसली होती.. त्याला मिठ्या मारत होती.. हे आकाशसाठी नवीनच होतं.. तो मधे मधे तिच्याकडे पाहत होता.. तिचही त्याच्याकडे लक्ष आहे असं त्याला वाटत होतं पण त्याची खात्री मात्र नव्हती.. अदितीच्या कुठल्याच गोष्टीची त्याला आता खात्री देता येत नव्हती.. काल पर्यंत चार लोकांत सोहमशी योग्य ते अंतर राखणारी अदिती आज त्याच्याशी फारच जवळीक साधत होती.. आकाशला हि गोष्ट खूप अस्वस्थ करत होती.. अदिती आपल्या रिलेशनशिपचं प्रदर्शन का करतेय हे त्याला कळत नव्हतं.. पण नकळत तोही तेच करत होता.. त्यालाही अदितीला दाखवून द्यायचं होतं कि तोही एका खूप छान अशा रिलेशनमध्ये आहे..
आभा त्याच्या शेजारीच बसली होती.. आणि आकाश आभाचा हात धरून बसला होता.. त्यालाही तिला जवळ घ्यायचं होतं.. तिच्या भोवती आपले हात गुरफटून बसायचं होतं.. पण आभाने ते त्याला करू दिलं नसतं याची त्याला खात्री होती.. त्यामुळे तो फक्त तिचा हात धरून बसला होता आणि मध्ये मध्ये तिच्या कानाशी जावून काहीतरी बोलत होता.. बाहेरचं काहीतरी तिला दाखवायच्या उद्देशाने तिच्या खांदयावर हात ठेवून तिला बाहेरचं काहीतरी दाखवत होता.. पण याहून जास्त त्याच्या बाबतीत काहीही होत नव्हतं.. पण एका पॉईंटला आभाने स्वत:हून त्याच्या खांदयावर डोकं टेकवलं आणि तो सुखावला.. त्याने वळून अदितीकडे पाहिलं.. तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं.. पण तिच्या चेहऱ्यावरच हसू जरासं मावळ्यासारखं वाटत होतं..

प्रतिक मागच्या सिटवर बसून हा गेम एन्जॉय करत होता.. हि दोन जोडपी एकमेकांसमोर आपलं प्रेम ज्या प्रकारे शोऑफ करण्याचा प्रयत्न करत होती ते खरच खूप विनोदी आणि पोरकट होतं.. त्याच्यात स्पर्धाच लागली होती जणू.. इतरांना हे सारं नॉर्मल कपल्स मधलं लवीडवी अफेक्शन वाटत असलं तरी प्रतिकला या साऱ्यामध्ये दडलेला खूप मोठ्ठा ड्रामा दिसून येत होता.. तो एक चांगला दिग्दर्शक होता पण आकाश आणि अदिती इतकेही चांगले नट नव्हते कि ते त्याला उल्लू बनवू शकले असते..
हा प्रकार पूर्ण प्रवासभर सुरु होता.. मध्ये ते नाष्टा करायला उतरले तिथेही याचं तेच सुरु होतं.. आकाशने आभाच्या आवडीने खाण्याचे पदार्थ मागवले कि तिथे अदिती सोहमला स्वत:च्या हाताने भरवायला तयार.. इथे अदिती सोहमच्या बकवास जोकवर जोरजोरात हसत होती तर तिथे आकाश मुद्दाम कालच्या एकांकीकेतल्या आभाच्या परफॉर्मन्सचा विषय काढून तोंड फाटेस्तोवर तिची स्तुती करायला थकत नव्हता... वर जोड्याजोड्याने मोबाईलवर फोटो काढण्याची स्पर्धा ती वेगळीच.. तसे तर ग्रुपमधले प्रत्येक जणच मधे मधे आपापले फोटो काढत होते.. ग्रुप मधे अजून काही कपल्स होते त्यांचेही जोड्याने फोटो काढणं सुरु होतं.. पण आकाश आणि अदितीने आपल्या जोडीदारांसोबत जो काही फोटो काढण्याचा सुळसुळाट चालवला होता त्याला तोड नव्हती..  
अखेर हे सारे प्रकार करत ते कर्जतला सोहमच्या फार्म हाउसवर पोहोचले.. मस्त प्रशस्थ बंगला होता.. बंगल्याच्या भोवती मन प्रसन्न करणारी हिरवळ.. सुंदर सुंदर फुलझाडं.. पध्दतशीर कापलेली गवताची कुंपण आणि मागच्या बाजूला एक छानसं स्विमिंग पूल.. पाहताच सगळ्यांचा मूड फ्रेश झाला एकदम.. एवढा प्रवास करून इथपर्यंत आलो त्याचं चीज झालं असं सगळ्यांनाच वाटू लागलं..
अदितीने फार्महाउस पाहताच खूष होवून सोहमला मिठी मारली.. त्याच्या फार्महाउसची तोंडभरून स्तुती केली.. प्रतीकने आकाशकडे पाहिलं.. खेळातला एक गुण विरोधी टीमला मिळाल्यावर जसे भाव खेळाडूच्या चेहऱ्यावर असतात तसेच त्याच्या चेहऱ्यावर होते..

इतर पोरं मात्र धमाल करायच्या मागे लागली होती.. सोहमने पूर्ण तयारी केली होती.. त्याच्या आचार्यांनी खाण्याची व्यवस्था करून एकीकडे बुफे सारखे काउंटर्स मांडले होते.. त्या सगळ्या तयारी वरून इथे बर्याच पार्ट्या होतं असाव्यात हे जाणवत होतं.. पोरांचा उत्साह या सगळ्याने अधिकच वाढला.. त्यांनी सोबत आणलेल्या स्टॉकमधल्या बिअरच्या बाटल्या फटाफट उघडल्या.. काही पुढारलेल्या पोरीनीही त्या ओल्या पार्टीत भाग घेतला ज्यात आदितीही होती.. आभा कोल्ड्रिंक पीत पार्टीची मजा घेत होती.. आकाश बिअर पिण्याआधी आभाकडे आला..
“आभा.. मी बिअर घेतली तर काही प्रॉब्लेम नाही ना..”
“मला?” आभाने विचारलं.. आकाशने तिच्या मागेच बसलेल्या अदितीकडे पाहिलं.. तीने बिअरची बाटली तोंडाला लावली होती..
“हो.. तुलाच विचारतोय.. पिऊ ना मी.. चालेल ना..”
आभाला सकाळ पासून काय चाललय, कशामुळे चाललय हे कळत होतं.. तसं होईल याची कल्पना विधीशाने तिला दिली होती.. पण हे सारं प्रतीकमुळे होईल असं विधीशाचा कयास होता पण इथे ते अदितीमुळे घडत होतं.. पण जे काही होतं होतं ते खूप क्युट आहे असं आभाला मनापासून वाटत होतं.. आज तिलाही कुठलीच बंधन नको होती.. योग्य अयोग्यच विचार नको होता.. तिलाहि वाहवत जायची इच्छा होती.. तिने आकाशकडे हसून पाहिलं आणि नजरेनेचं होकार दिला..

कुणीतरी म्युझिक सिस्टीम ऑन केलं.. जोरजोरात गाणं वाजू लागलं.. सगळे जण त्यावर धुंद होवून नाचायला लागले.. अदिती, सोहम आणि आकाश, आभा या जोड्यांची इथेही स्पर्धा सुरु झालीच.. तिथे काही मुलांनी पूलमध्ये उड्या टाकल्या.. काही मुलींना त्यांनी पूलमध्ये ओढलं.. अदिती आणि सोहमने एकत्रच पूलमध्ये उडी टाकली.. दारूची नशा जशी चढत होती तशी शरीरांदरम्यानची अंतरं कमी होतं होती.. अदिती तर आता जास्तच सुटली होती.. तिला पाहून आकाशलाही जोश चढत होता.. आभा मात्र शुद्धीवर होती.. हे सारं आता तिला जरा जरा अनकम्फर्टेबल वाटू लागलं होतं..
मघापासून एकमेकांना चोरून पाहणाऱ्या आकाश आणि अदितीच्या नजर आता उघडपणे एकमेकांना आव्हान देत होत्या.. हि स्पर्धा हळूहळू गंभीर वळणावर चालली होती.. कोणत्याही क्षणी कुणीही लक्ष्मणरेषा ओलांडू शकत होतं.. आणि अदितीने त्यातही पहिली बाजी मारली.. तिने एका धुंद क्षणी सोहमचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले.. सगळ्या मुलानी एकच कल्ला केला.. सोहम आणि अदिती एकमेकांच्या मिठीत काही क्षण त्याचं अवस्थेत होते.. मग अदितीने आपला लिपलॉक तोडला आणि आकाशकडे पाहिलं.. ‘आता तुझी पाळी’ तिच्या नजरेत असं आव्हान होतं..
आकाशचा मेल इगो पुन्हा दुखावला.. त्याने समोरचं असणाऱ्या आभाला जवळ ओढलं.. तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि तो तिच्या ओठांना ओठ भिडवणार तोच आभाने त्याला दूर ढकललं.. ती त्याला काहीच बोलली नाही.. फक्त त्याच्याकडे बघत राहिली.. आकाशलाही आपली चूक जाणवली.. त्याने मान खाली घातली.. म्युझिकच्या नशेत कुणालाच काय घडलं ते कळलं नव्हतं.. फक्त अदितीला सगळं समजत होतं.. तिच्या चेहऱ्यावर विजयी हसू होतं.. आभा जशी तिथुन बुफे काउंटरच्या दिशेने निघाली तशी अदिती पूल बाहेर आली.. आकाशने एव्हाना पुलकडे पाठ फिरवली होती.. आपण हे काय करून बसलो याचा त्याला पश्चाताप होत होता.. इतक्यात त्याचा खांदा कुणीतरी थोपटला.. त्याने वळून पाहिलं ती अदिती होती.. तिच्या डोळ्यात अजूनही नशा दिसत होती..
“सो आकाश.. हाउ इज लाईफ..” आकाशने तिच्यापासून नजर फिरवली.. “तुझ्यासाठी वाईटच असणार म्हणा.. सॅड यार.. तुझी गर्लफ्रेंड तुला साधा कीसही देत नाही.. च..च..च.. गर्लफ्रेंडच आहे ना ती तुझी.. का??” आकाशने रागाने अदितीकडे पाहिलं..

आभा बुफे काउंटरकडे गेली आणि तिथे भरून ठेवलेला ग्लास उचलून घटाघटा पाणी प्यायली.. पार्टीत असं काही होईल याची तिला कल्पनाच नव्हती.. ग्लास ठेवून ती वळली तर समोर प्रतिक बसला होता.. गच्चीवर जाणाऱ्या जिन्याकडे तो एकटाच सिगरेट ओढत बसला होता.. तिला पाहून तो हसला..
“छान चाललीये ना पार्टी..” आभाने हसून होकार दिला..
“तू आणि आकाश खूप क्लोज आहात नाही?” अचानक या प्रश्नावर आक्य बोलावं तेच आभाला समजेना.. “ओ.. सॉरी.. असणारच तुम्ही क्लोज.. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात.. छान आहे.. तुमच्यासारखं खरं खुरं प्रेम सापडण कठीण आजच्या जगात.. True Love..”
आभाला त्याचं बोलणं विचित्र वाटत होतं.. जणू त्याला सगळं काही माहित होतं.. स्वत:ला  खरं माहित असताना समोरच्याचं खोटं ऐकण्यात जी मजा येते तिचं त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती.. आभा यावर काही बोलणार इतक्यात त्यांना पूल जवळून भांडणाचे आवाज ऐकू येवू लागले.. म्युझिक अचानक बंद झालं होतं.. आभा आणि प्रतीकने एकमेकांकडे पाहिलं आणि ते पूलच्या दिशेने धावले..
पूल जवळ पोरांनी घोळका केला होता..प्रतिक आणि आभा वाट काढत मध्ये पोहोचले तेव्हा कळलं कि आकाश आणि अदिती भांडत होते.. सोहम अदितीला धरून सावरत होता.. काही मुलांनी आकाशला धरल होतं.. पण तो त्याचं ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता.. आभा गडबडीने आकाशच्या दिशेने धावली..
“आकाश.. काय करतोयस..”
“अरे हि नॉनसेन्स बडबडतेय.. चढलीये हिला आभा..” आकाश जोरात ओरडत म्हणाला..
“आकाश कंट्रोल...” आभा त्याला सावरायला काहीतरी बोलणार तोच तिथून अदिती ओरडली..
“ए.. हि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वाली नाटकं पुरे करा आता..”
“अदिती..” सोहम तिला आडवायचा प्रयत्न करत म्हणाला..
“काय अदिती.. हिला.. हिला विचार..” ती आभाकडे बोट दाखवत म्हणाली.. “हिने सांगितलंय मला.. या दोघांच रिलेशनशिप एक नाटक आहे.. नाटक..”
आभा शॉकड तिच्याकडे पाहत राहिली.. सगळ्यांच्या नजरा अचानक आभाकडे वळल्या..
“हिनेच सांगितलंय मला.. माझ्या पार्टीत हा स्वत:ची इज्जत सांभाळायला जे बोलला ते खरं करून दाखवण्यासाठी या आकाशने हिला रिक्वेस्ट केली होती.. गर्लफ्रेंडचं नाटक करायची..”
आभाला यावर काय करावं काही समजत नव्हतं.. तिने आकाशकडे पाहिलं.. तो विश्वास न बसल्यासारखा तिच्याकडेच बघत होता..

क्रमशः 




Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४

ओलांडून जाताना... भाग - 3