ओलांडून जाताना.. भाग-७



आभाच्या घरातून सकाळी सकाळी कुकरच्या शिट्टीचे आवाज येत होते.. किचनमध्ये आईची लगबग सुरु होती.. त्यातच घरकाम करणाऱ्या सुरेखा सोबत सोसायटीतलं गॉसिपिंगहि सुरु होतं.. बाबा आणि दादा सकाळीच आपापल्या कामांना पळाले होते.. आणि आता आभाही कॉलेजला जायला तयार होत होती..
खरं तर कॉलेजला जायचं या विचारानेच तिला गरगरायला होत होतं.. आकाशला प्रपोज करण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री तिने जे पत्र त्याला दिलं होतं त्याचं उत्तर घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांच्या ग्रुप मधली सुधा आली होती.. तिने आकाशच ते पत्र वाचलं असणार याबद्दल आभाला काहीच शंका नव्हती.. त्यामुळे आता अख्या ग्रुपमधे हि गोष्ट पसरली असणार याची आभाला खात्री होती.. आभाला मिळालेला नकार सगळ्यांना कळला असणार पण ज्या आदितीसाठी आकाशने तिला नकार दिला होता त्या अदितीने त्यालाच नकार दिलाय हि गोष्ट मात्र कुणालाच कळू शकणार नव्हती याच आभाला अधिक दुख: होतं.. म्हणजे इथेही आकाश सेफ..
आज साधासा लाईट पिंक कलरचा पंजाबी सूट घालून आभा घराबाहेर पडली.. आईने हा सूट इंदोरहून आणला होता.. पण अतिशय साधा दिसतो म्हणून एका घरगुती कार्यक्रमाला तो एकदाच वापरल्यावर आभाने कपाटात ठेवून दिला होता.. आज का कोण जाणे तो डल पिंक कलर तिला मिरवावासा वाटत होता.. तो तिच्या मानसिकतेला मॅच करत असावा बहुतेक..
ती सोसायटीतून बाहेर पडताना गेटवरच तो उभा होता.. आकाश.. तसाच डल पिंक कलरचा शर्ट आणि जीन्स.. ‘शिट! पुन्हा कलर मॅच झाले..’ आभाने मनात विचार केला.. त्याचं असं बरेचदा व्हायचं.. नकळत.. आभाला तेव्हा वाटायचं कि ते दोघे खरच मेड फॉर इच अदर आहेत.. आत्ताही तिला तेच वाटत होतं.. फक्त आपल्यातला एक कुठेतरी भरकटला आहे याची तिला खंत होती..
ती चेहऱ्यावर काही न दाखवता गेट मधून बाहेर निघू लागली..
“आभा!” आकाशने तिला टोकालाच.. तिलाही ते अपेक्षित होतं म्हणा.. “अ.. काहि विचार केलास का तू?”
आभाच्या तळपायची आग मस्तकात गेली.. नेह्मी तो भेटल्या भेटल्या तिच्या कपड्यांवर कमेंट करायचा.. त्याच्या कपडयांचे रंग जर मॅच झाले असतील तर त्या बद्दल बोलायचा.. रात्री झोप नित झाली का ते विचारायचा.. पण आता त्याला फक्त त्याच्या कामाची पडली होती..
अदितीच्या बर्थडे पार्टीत आकाशने तिला प्रपोज करायच्या आधीच त्याला कळल होतं कि सोहम हा तिचा Boyfriend आहे त्यामुळे त्याचं सार अवसानच गळाल होतं.. त्यात भरीस भर म्हणून तो तिला प्रपोज करणार होता हे ओळखून अदितीने त्याचं सांत्वन केलं ज्याने त्याचा मेल इगो पारच दुखावला.. त्यातून वाट काढायची म्हणून आभा त्याची Girlfriend आहे असं त्याने जाहीर केलं होतं.. आणि तेच खोटं खरं करण्यासाठी त्याला आभाच्या मदतीची गरज होती.. आभाला मिळालेल्या नकारापेक्षा तिला या गोष्टीचा जास्त राग आला होता..
आभा काहीही न बोलता पुढे जायला निघाली..
“आभा मला कळतंय माझं हे वागणं किती चुकीचं आहे.. पण मी खरच अडकलोय.. मला माहितीये कि हे नाटक कारण तुला आवडणार नाही.. तुला खूप त्रास होईल.. पण थोडे दिवस.. मग आपण ब्रेक अप करू.. हवं तर तू कर.. पण आज मला सांभाळून घे.. नाहीतर मी पुन्हा त्या ग्रुप मधे तोंड दाखवू नाही शकणार..”
त्याच्या आवाजात जेन्युइनीटी होती.. आभाला दोन क्षणांसाठी वाटलं कि त्याला होकार द्यावा.. तिचा त्रास तर संपणार नाहीये कमीतकमी त्याचा त्रास तरी संपवावा.. आणि कदाचित या नाटकातूनच त्यांच्या नात्याला तिला हवं तसं वळण मिळेल.. पण मग तिला आपल्या कझिन कम बेस्ट फ्रेंडचं, विधीशाच बोलणं आठवलं.. आभाला आकाशच प्रेम खरंच हवं असेल तर या मार्गाने ते मिळणार नव्हतं.. विधीशाच्या सुपीक डोक्यातून एक कल्पना निघाली होती.. त्या मार्गाने जावूनच आभा आणि आकाशच मिलन होवू शकेल असं विधीशाच मत होतं.. विधिशा सहसा चुकत नसे.. पण तो प्लान ऐकल्यावर आभाला मात्र तसं अजिबात वाटत नव्हतं.. या साऱ्या गोंधळाने आभाला कन्फ्युज करून सोडलं होतं.. कुठला मार्ग निवडावा याबद्दल तिचं काहीच ठरत नव्हतं.. अखेर तिने या सगळ्यात न पाडण्याचाच निर्णय घेतला..
“आकाश.. I am Sorry!!.. पण मला वाटत नाही मी तुझी काही मदत करू शकेन..” आकाशला ज्याची भीती होती तेच उत्तर त्याला मिळत होतं.. “काही गोष्टी बोलण्याआधी माणसाने विचार करायचा असतो.. मी हे बोलण्या आधी तो केलाय..”
आभा आकाशकडे पाठ करून निगुन गेली.. आकाश शॉक्ड तसाच उभा होता..
त्याच्यासाठी आभाच्या तोंडून हा पहिला नकार होता.. नाहीतर आत्तापर्यंत त्याच्या प्रत्येक गोष्टीवर आभाचा होकार ऐकायचीच सवय होती त्याला.. या वर्षी तिने अकरावीला अडमिशन घेतल्या पासून ती आकाशच्या सोबतने काहीही करायला तयार असायची.. बाकीचा ग्रुप नसला तरी आभा असणार.. भांडणं झाली कि आभा आकाशच्या बाजूने उभी राहणार याची तर अख्ख्या ग्रुपला सवय झाली होती.. सगळ्या बाबतीत आकाशला तिचा सपोर्ट असायचाच.. पण तेव्हा कधीच याचं महत्व का नाही वाटलं.. कदाचित एका नकारानंतरच त्या अनेक होकारांची किंमत कळत असेल.. आपल्यासाठी कधीही काहीही करायला तयार असणाऱ्या माणसांनाच आपण सगळ्यात जास्त टेकन फॉर ग्रांटेड घेत असतो हे आकाशला जाणवलं..
आभाला आपण आवडतो.. तिच्यासाठी आपण खास आहोत याची कल्पना आकाशलाही होती.. पण त्याने तिला कधीच सिरीअसली घेतलं नव्हत.. आत्ताच कॉलेजमधे पाउल टाकलाय.. आपल्याला आधीपासून ओळखते.. आपण एकाच सोसायटीत राहतो.. त्यामुळे आपला आधार वाटत असेल तिला.. त्यातूनच हि भावना जन्माला आली असेल असं सोयीस्कर गणित आकाशने मंडल होतं.. त्यांच्या काही कॉमन फ्रेंड्सनाही ते जाणवल होतं.. ते आकाशला तसं म्हणायचेही.. पण आकाश त्यांना उडवून लावायचा.. अदितीवरच्या प्रेमाने त्याला या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लावलं होतं का? आता विचार करताना आकाशला असं वाटून गेलं..
आकाशसाठी कॉलेजमधला आजचा दिवस फार काही चांगला जात नव्हता.. त्याला संध्याकाळच टेन्शन आलं होतं.. डान्सचा सगळा ग्रुप ज्यात आदितीही असणार होती सोहमही, आज संध्याकाळी भेटून कुठल्यातरी पिकनिकचा प्लान आखणार होते.. तिथेच आज आकाशला त्याच्या Girlfriend सोबत म्हणजेच आभासोबत जायचं होतं.. आता तो तिथे काय सांगणार हा प्रश्नच त्याला सतावत होता..

त्यात आज दिवसभर आभा त्याला दिसली नाही.. नाहीतर इतरवेळी ती स्वत:च्या क्लासपेक्षा त्यांच्या क्लास मधेच जास्त दिसायची.. कधी कधी लेक्चरहि अटेंड करायची.. एकदा सायकोच्या लेक्चरला आकाशने तिला विचारलं होतं..
“आम्हाला इथून पळून जावसं वाटतंय आणि तुला हौस लेक्चरला बसायची..लेक्चर नाही टॉरचर आहे हे..”
“म्हणूनच बसलेय मी या लेक्चरला.. टॉरचरभी झेलेंगे साथमे..”
एकदा हिस्ट्रीच्या सरांनी एक असाईनमेंट करून आणायला सांगितलं होतं.. आभा आकाशसोबत नेमकी त्याच क्लासला बसली.. सरांनी असाईनमेंट मागितलं पण ते तिच्याकडे कुठून असणार.. विसरले म्हणून सांगितलं तिने.. सरांनी शिक्षा केली तिला.. बरच काही सुनावलं.. आभाने सगळं मान खाली घालून ऐकलं.. काही बोलली असती तर परत लेक्चरला बसल्यावर पकडली गेली असती त्यापेक्षा तिने ओरडा खाल्ला.. पुढच्यावेळी परत आकाशच्या शेजारी त्याच लेक्चरला बसायला मोकळी..
आता विचार केल्यावर आकाशला वाटलं कि त्यावेळी त्याने त्याच असाईनमेंट तिला का दिलं नाही.. तिला ओरडा खाऊ दिला.. नंतर तिच्या वेडेपणाबद्दल झापलं.. पण ती तेव्हाही आकाशकडे छानस हसून बघत होती..
आभा आज लांचलाही दिसली नाही.. नाहीतर ती न चुकता हजर असायचीच.. आकाशच्या आवडीचेच पदार्थ तिच्या डब्यात कसे काय असायचे हा प्रश्न आज त्याला पडत होता जेव्हा आभाचा तो डबा त्याच्या पुढ्यात नव्हता.. आभा तो त्याच्यासाठीच आणायची जणू.. त्याचं झाल्याशिवाय कुणालाच डब्याला हात लावू द्यायची नाही.. त्याला कॅन्टीनमधे यायला उशीर होत असेल तर काहीतरी कारण सांगून डबा उघडण्यासाठी थांबून राहायची आणि अशावेळी आकाश येताना बाहेरून काही खाऊन आला कि तिचं तोंड एवढंसं व्हायचं.. मग लंच न केल्यामुळे संध्याकाळी आकाशला भूक लागली कि तिचा डबा उघडायचा.. त्यावेळीही तो तिने जसा घरून आणला होता तसा असायचा.. कुणीही हात न लावलेला.. आकाअशावेळी भुकेल्या वाघासारखा त्यावर तुटून पडायचा.. पण आज त्याच्या मनात विचार चमकून गेला.. डबा जर पूर्ण भरलेला असायचा.. तर आभा काय खायची?
आपली काळजी करणारी.. आपल्याला पॅम्पर करणारी अशी एक मैत्रीण प्रत्येकालाच असते.. तिचं कधीच कुणाला काहीच कसं वाटत नाही.. ती समजून घेईल.. ती बडी आहे रे आपली.. आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत फक्त.. या वाक्यांमधून आपण स्वत:ची समजूत काढत असतो का नकळत तिच्या मर्यादा आखत असतो..
गेले दोन दिवस स्वत:च्या आणि अदितीच्या विश्वात असलेल्या आकाशला आज जाणवत होतं कि त्याच्या वागण्याने आभाला किती त्रास झाला असेल.. आभाला आपण नकार दिल्यावर अदितीने आपल्याला होकार दिलं असता तर आज आपण आभाचा इतका विचार केला असता का?
शिट!! या विचाराने त्याला अजूनच गिल्टी वाटू लागलं.. आभाने आपल्याला ते नाटक करायला नकार दिला तेच बरं झालं.. नाहीतर नकळत आपण तिला खूप त्रास देवून बसलो असतो.. आभाला भेटून आपण सांगायला हवं कि तिने जो निर्णय घेतलाय तो बरोबर आहे..
तो आभाला शोधायला म्हणून उठणार तोच कुणीतरी कुणालातरी विचारलं..
“अरे आभा दिसली नाही रे आज..”
“आलेली ती.. आत्ताच घरी गेली.. भाऊ आला होता न तिचा घ्यायला..”
आकाशला हे ऐकून अजूनच विचित्र वाटू लागलं..


संध्याकाळी ठरल्या प्रमाणे कॉलेजजवळच्या रेस्टॉरंटमधे त्याचा सगळा डान्सचा ग्रुप भेतला.. अदिती सोबत सोहमहि आला होता.. ग्रुप छान जमलाय तर एखादी पिकनिक काढूया असा प्लान बनत होता.. खास कपल्सची पिकनिक.. आकाशला तिथे जायची इच्छाच होत नव्हती.. पण गेला नसता तरी कधीना कधी या परिस्थितीला समोर जावच लागलं असत.. आता जे झालय ते निस्तरायच असं म्हणून आकाश तिथे पोहोचला.. दोन टेबल जॉईन करून सगळा ग्रुप तिथे बसला होता..
“अरे हा बघा.. आकाशही आला..” सोहमचं लक्ष त्याच्याकडे सगळ्यात आधी गेलं.. “का रे एवढा उशीर..”
“लायब्ररीत अडकलो होतो जरा..”
“ए अक्की, इतना स्टुडीअस कबसे बन गया रे तू..?” एकाने थट्टा केली..
“छोड ना.. आकाश बस लवकर.. प्लान डीसाइड करा पटापट.. मला जायचय रे घरी लवकर..” एक मुलगी म्हणाली आणि सगळे तिचं हे नेहमीचं असत यावरून तिची थट्टा करू लागले.. आकाश बसायला म्हणून टेबला जवळ आला.. तो बसणार तोच अदिती त्याच्याकडे पाहून म्हणाली..
“आकाश एकटाच आलास.. Girlfriend येणार होती न सोबत.. आभा..”
“अरे हो.. आकाश कपल्स पिकनिक आहे.. कपल कुठे आहे तुझी?” सोहमने विचारलं..
“काय अक्की.. तिच्या बरोबरच बिझी नव्हतास ना लायब्ररीत?” सगळे हसू लागले.. आकाशला अजून शरमल्या सारखं झालं..
“नाही ती.. ती जरा..”
“हाय उशीर तर नाही झाला ना मला..?” आकाशच्या मागून एका मुलीचा आवाज आला.. सगळ्यांनी वळून तिच्याकडे पाहिलं.. आकाशला तो आवाज ओळखीचा वाटला.. पण त्याचा त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता.. त्याने आश्चर्याने वळून पाहिलं.. त्याचा अंदाज बरोबरच होता..
“हाय मी आभा.. आकाशची Girlfriend!!” आभा हसतमुखानं तिथे उभी होती..

क्रमशः 




Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४

ओलांडून जाताना... भाग - 3