ओलांडून जाताना... भाग-13

एकांकिकेच्या तालमी पुन्हा सुरळीत सुरु झाल्या होत्या.. अदितीने एकांकिका सोडायचा निर्णय घेतल्यावर आभा जावून तिच्याशी बोलली होती आणि तिला पुन्हा एकांकिकेत काम करण्यासाठी कन्विन्स करण्यात यशस्वी झाली होती.. पण  ती तिच्याशी काय बोलली हे तिने कुणालाच सांगितलं नव्हतं.. पण त्या संध्याकाळी तिने विधीशाला सगळा वृतांत सांगितला...
विधीशाच्या प्लाननुसार आतापर्यंत सगळं सुरु होतं.. पण त्यामुळे सगळेच कन्फ्युज झाले होते.. आभालाही खरं तर काहीच कळत नव्हतं.. गोष्टी तिथेच रेंगाळतायत असं वाटत होतं.. पण विधीशाच्या प्लानचा तो एक महत्वाचा टप्पा होता.. सायकलॉजीकली या कन्फ्युजन नंतर.. या एकसुरीपणा नंतर प्रत्येकाला दिशा देणं सोप्प जाणार होतं.. जोवर तोचतोचपणा माणसाला पछाडत नाही तोवर झालेल्या छोट्या छोट्या बदलांकडे माणूस लक्ष देत नाही.. आता आकाशला, अदितीला आणि आभालाही आयुष्यात बदल हवा होता.. आता एक छोटासा धक्कासुद्धा त्यांना खूप पुढे घेवून जायला पुरेसा होता.. आणि विधीशाने त्यातला पहिला धक्का द्यायचं ठरवलं अदितीला..
आभा अदितीला समजवायला कॅन्टीनमधे गेली तेव्हा तिलाही माहित नव्हतं कि ती काय बोलणार आहे.. विधीशाने अदितीपर्यंत सत्य पोहोचवायची जवाबदारी आभाला दिली होती पण ते पोहोचवायचं कसं हे आभालाही कळत नव्हतं.. आभाने अदितीला तिचं एकांकिकेतल महत्व समजावून सांगितलं.. तिच्या डान्सवर या वर्षीचा रिझल्ट किती अवलंबून आहे याची जाणीव करून दिली.. अशा प्रसंगी तिला समजवण्यासाठी कुणीही जे काही बोललं असतं ते ती बोलत होती.. पण तिला जे सांगायचं होतं त्या विषयावर येण्याची संधी काही तिला सापडत नव्हती.. पण मग ती संधी अदितीनेच तिला दिली..
“तू म्हणतेयस ते पटतय मला आभा.. आय नो हाउ इंपॉर्टंट धिस इज.. पण जर कुठली गोष्ट करताना मनच लागत नसेल तर ती कशी करायची?”
“तू आधीही हि गोष्ट अनेकदा केलीएस.. आपल्या एकांकिकेचे किती परफॉर्मन्स झालेयत अदिती.. अजून एक..”
“खरंय तुझ.. खूप परफॉर्मन्स झालेयत.. म्हणून मन उडालं असेल कदाचित..” अदिती खिडकीतून बाहेर बघत बोलली..
आत्ता पर्यंत हे सारं संभाषण फक्त आपल्याला हवी असलेली माहिती अदिती पर्यंत पोहोचवायची एवढ्याच उद्देशाने आभा करत होती.. पण अदितीच्या आवाजातला रिकामेपणा.. तिच्या डोळ्यात काहीतरी हरवल्याचे भाव आभाला जाणवू लागले आणि विधिशा, तिचा प्लान, प्लानची पुढची स्टेप हे सारं आभा विसरली.. अदितीच्या डोळ्यात हि कुठली व्यथा होती?
“अदिती... इज इट बिकॉज ऑफ आकाश?” अदितीने आभाकडे पाहिलं आणि फक्त हसली.. पण ते हसू तिच्या डोळ्यामध्ये कुठेच डोकावत नव्हतं..
“अदिती.. आय डोंट नो मी तुला हे सांगायला पाहिजे कि नाही.. पण... आकाशने मला तुझ्या बर्थडेच्या दिवशी जे काही घडलं ते सांगितलंय..”
अदिती दोन क्षण काहीच बोलली नाही.. तिने आभापासून पुन्हा नजर फिरवली.. मग पुन्हा आभाच्या नजरेत बघून ती म्हणाली..
“सॉरी..मी चुकलेच त्या दिवशी.. मला खरंच माहित नव्हतं कि तुम्ही दोघं..”
“अदिती.. तुला माफी मागायची गरज नाहीये.. इट्स फाईन.. कधी कधी काही गोष्टी नाही होत वर्कआउट.. पण त्यामुळे बाकीच्या वर्कआउट झालेल्या गोष्टी का स्पॉइल करण्यात हुशारी नाही असं मला वाटत.. विसरून जा ना सगळं झालेलं..”
“आभा.. बोलायला सोप्प आहे खूप.. पण काही गोष्टी, आठवणी अशा विसर म्हणून नाही विसरता येत.. तसं झालं असतं तर लाईफ एकदम सोप्प झालं असतं..”“मला तुमच्यात नेमकं काय झालय माहित नाही.. पण अनुभवावरून सांगते.. प्रयत्न केला तर जमू शकतं.. मी तेच करतेय..” अदितीला काहीच कळलं नाही.. तीच्या डोळ्यातलं प्रश्नचिन्ह आभा सहज वाचू शकत होती..
“खरं तर हे हि मी तुला सांगायला नको.. पण आकाशला मी या ३१ तारखेलाच प्रपोज केलं होतं.. आणि १ तारखेला त्याने आमच्या एका मैत्रिणीच्या हातून पत्र पाठवून मला नकार कळवला होता..”
“काय? पण मग तुम्ही दोघं...” अदितीच्या चेहऱ्यावर प्रचंड आश्चर्य दिसत होतं.. आपण हे बरोबर करतोय का चुकीचं याचं उत्तर आभाकडे नव्हतं.. पण आता मागे फिरता येणार नव्हतं..
“आकाश तुझाकडे बोलून बसला कि त्याची एक गर्लफ्रेंड आहे.. बोललेलं खरं करण्यासाठी आम्हाला हे करावं लागलं..”
अदितीला या साऱ्यावर विश्वासच बसत नव्हता.. जी गोष्ट गेले कैक दिवस तिला अस्वस्थ करत होती तिच्या मागचं सत्य हे होतं.. म्हणजे आकाशच्या आयुष्यात दुसरी मुलगी नव्हती.. म्हणजे आकाश त्या दिवशी अदितीला प्रपोज करणार होता.. अदितीच्या मनात अनेक भावना एकाचवेळी येत होत्या.. काही गोष्टींबद्दल राग होता.. तर काही गोष्टींबद्दल अतिशय आनंद होत होता.. पण तिला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटत होतं आभाचं..
“पण मग एवढं सगळं झालं तरी तू हे करायला तयार झालीस?”
“करणार नव्हते मी.. पण मग माझ्या मैत्रिणीने समजावलं मला.. कधीकधी आपण छोट्या छोट्या गोष्टी खूप ताणतो आणि मग तिथेच अडकून बसतो.. गेले काही दिवस तुला तसच वाटत असेल ना..” अदिती काहीच बोलली नाही.. पण तिच्या गप्प राहण्यातून आभाला उत्तर मिळालं होतं.. “माझी मैत्रीण मला म्हणाली होती.. आपल्या लाईफमध्ये काही गोष्टी आपोआपच महत्वाच्या बनतात.. अनएक्स्पेक्टेडली स्पेशल होवून जातात आपल्यासाठी.. पण मग आपण माती खातो.. आपण त्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न करू लागतो आणि मग सगळंच आउट ऑफ कंट्रोल होवून जातं.. म्हणून कधी कधी लाईफमध्ये जे खूप महत्वाचं वाटतं ना.. त्याला सोडून द्यायचं असतं.. मग सगळं लाईनवर येतं..”
आभाचं बोलणं अदितीला विचार करायला लावणारं होतं.. गेले काही दिवस तिने आयुष्यात खरंच एकाच गोष्टीचा विचार केला होता.. आता तिलाही त्याचा कंटाळा आला होता.. तिला जाणवलं कि जर तिने यातून मार्ग काढला नाही तर हे असंच सुरु राहिल.. आकाश सोबत फक्त मैत्री ठेवणं तिला शक्य नसेल कदाचित पण प्रोफेशनली त्याच्यासोबत एकांकिकेचा प्रयोग करायला काहीच हरकत नव्हती.. आभा एवढी मोठी गोष्ट करत होती त्यासमोर हे इतकंही कठीण नसावं.. अदितीने आभाकडे पाहिलं.. आभा छानसं हसली..
“खूप बोलते ना मी.. आईपण हेच बोलते.. आणि आज तर खूप जास्तच बोलून गेले मी.. काही सांगायला नको होत्या अशा गोष्टी बोललेय मी आज इथे.. पण मला खात्री आहे त्या आपल्यातच राहतील..” अदितीने मानेनेच होकार दिला.. “जे मला योग्य वाटलं ते बोलले मी.. पण शेवटी इट्स युअर डिसिजन.. टेक इट वाईजली..”
आभा अदितीला तिथेच सोडून निघाली.. अदितीला विचार करायला सांगितला होता तिने पण आता तिच्याच मनात विकारांच काहूर माजलं होतं.. ती जे अदितीला बोलली होती त्यामुळे तिच्याच मनात अनेक प्रश्न उभे राहिले होते.. हे जे सगळं ती कंट्रोल करू पाहत होती ते खरच शक्य होतं का? का या सगळ्याने सगळंच आउट ऑफ कंट्रोल होणार होतं? आभा आपल्याच तंद्रीत ऑडीकडे जात असताना अदितीने तिला हाक मारली आणि आभाची तंद्री तुटली.. त्या क्षणी ती विचार मनातून गेला असला तरी ते प्रश्न तिच्या मनात तसेच रेंगाळत होते.. जे संध्याकाळी तिने विधीशाला विचारले..
“सायकॉलॉजिकली आय अॅम डॅम शुअर कि हे होईल.. पण सायकॉलॉजी खूप अन एक्स्पेक्टेड असते.. त्यामुळे जरा उन्नीस बीस होवू शकतं..”
“विधी तुला कळतंय का तू काय बोलतेयस ते..” आभाला विधीशाने दिलेलं उत्तर अजिबात आवडलं नव्हतं.. “हे सारं आपण सुरु केलं आणि आता तू स्वत:च कन्फ्युज आहेस..आणि तू मलाही कन्फ्युज करतेयस..”
“आभा.. आता नो मोअर कन्फ्युजन हा.. तुझ्या या कन्फ्युजनमुळे मला मी तेच तेच बोलतेस असा फील येतो माहितीये.. त्यामुळे आता माझ्यावर सोडलं आहेस न सगळं.. मग सोडून दे.. लेट मी हँडल धिस..” विधीशाने तिला ठणकावून सांगितलं आणि ती पुढ्यातल्या सबवेकडे वळली.. चिकन अँड हॅम विथ एक्स्ट्रा टूना फिश.. विथ ऑल लो फॅट सॉसेस.. ती आज काल डायटवर होती.. तिने ज्या माणसाकडे इंटर्नशिपसाठी अप्लाय केलं होतं त्याच्याकडून कधीही इंटरव्हूचा कॉल अपेक्षित होता.. आणि तिथे तिला स्वत:ची छाप पडायची होती.. पण तिच्या बारीक होण्याची चिंता आभाला मुळीच नव्हती.. तिला तर एक वेगळीच चिंता सतावत होती..
“विधी.. पण मी जे अदितीला सांगितलंय ते जर ती आकाश समोर बोलून बसली तर..”
“ते तर आज ना उद्या होणारच आहे..” विधिशा खाताखाता अतिशय कॅज्युअली म्हणाली..
“पण मग काय करायचं..” आभासाठी मात्र हे मोठं संकट होतं..
“मला फोन..” विधीशाचा पुन्हा एक सल्ला..
“काय?”
“हो.. कारण कुठल्या परिस्थितीत ते घडलय हे समजल्याशिवाय मी ते कसं सांगणार.. पणघाबरू नकोस.. हे होईल तेव्हा काय करायचं त्याचा प्लान माझ्याकडे आहे..” आभाच अजूनही समाधान झालं नव्हतं.. पण ती शांत राहिली..
“आणि आभा.. आता उद्यापासून एक काम कर.. तू आकाशबरोबर बाईक वरून कॉलेजला जात जा..”
आभाचा स्वत:च्या कानांवर विश्वासच बसला नाही.. “काय खरंच..”
“हो.. अदितीचं एक कन्फ्युजन सोडवलंय आता आकाशच एक कन्फ्युजन सोडवण्याची वेळ आलीये..”
आकाश सकाळी तयार होवून बाईकजवळ आला तेव्हा त्याच्या आश्चर्याला सीमा उरली नाही.. आभा त्याच्या बाईकजवळ उभी होती..
“गुड मॉर्निंग आकाश.. कॉलेजलाच चालला आहेस ना?”
“अं??.. हो.. हो..” आकाश जरासा गडबडलाच होता..
“मला सोडशील?”
“मी इतके दिवस यासाठीच तर मागे लागलो होतो तुझ्या.. आत्ता माफ केलस ना मला..”
“आकाश.. मी चिडले नव्हते यार.. विचार करायला वेळ घेतला थोडा..”
“खूप जास्तच वेळ घेतलास..”
“खूप जास्तच वेळ होतोय.. निघूया का?”
खूप दिवसांनी आभाला फार मस्त वाटत होतं.. आकाशच्या खांद्यांवर आपले दोन्ही हात ठेवून बाईकवर त्याच्या मागे बसणं ती खरच मिस करत होती.. आकाशहि खूष होता.. त्याच्या मनावरच ओझं आता हलकं झालं होतं.. त्यांची कथा हळूहळू का होईना मूळ पदावर येत होती याचंच त्याला समाधान होतं..
ते कॉलेजला पोहोचले तेव्हा कॉलेज बरंच गजबजल होतं.. लेक्चर लवकरच सुरु होणार होतं.. आकाशने थेट बाईक पार्किंगच्या इथेच नेली.. त्याने बाईक पार्क केली आणि तो आणि आभा घाईघाईत कॉलेजच्या बिल्डींगमध्ये शिरू लागले.. इतक्यात दारात अदिती उभी असलेली त्यांना दिसली..
“आभा..” तिने आभाला हाक मारली.. आभाला जरासं टेन्शनच आलं होतं.. आपण हिला इतकं सारं बोलून बसलोय ते आजच बाहेर पडणार नाही ना हि शंका तिला होती.. ती अदितीच्या जवळ गेली..
“काय अदिती..”
“मला लास्ट लेक्चर ऑफ आहे आज..”
“अच्छा!!” आभाला तिने काय करणं अपेक्षित आहे हेच कळल नाही..
“म्हणजे मी एक तास आधी येवू शकते रिहर्सलला जर..” तिने आकाशकडे पाहिलं आणि आभाची ट्यूब पेटली..
“ओ.. ओके ओके.. आकाश..” मघापासून त्यांच्यापासून जरा लांब उभा असलेला आणि आपलं त्या दोघींकडे लक्षच नाहीये असं भासवणारा आकाश पुढे आला.. “अरे हिला लास्ट लेक्चर ऑफ आहे.. तुझं काय स्टेटस? दोघही फ्री असाल तर रिहर्सल होवून जाईल ना एक..”
“अच्छा.. ओके.. आय विल मॅनेज समथिंग..”
“नाही प्रॉब्लेम असेल तर राहू डे आभा..” अदिती आकाशला उद्देशून म्हणाली..
“पण मी म्हणतोय ना मी करतो काहीतरी..” आकाश थेट आदितीलाच म्हणाला..
“लेक्चर बंक करायची गरज नाहीये.. असू दे..” अदिती मधेमधे आकाशकडे बघत मधेमधे शून्यात बघत हे वाक्य म्हणाली..
“अदिती.. मी आर्टसला आहे.. सायन्सला नाही.. मी करतो मॅनेज..” आकाश अदितीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला.. अदितीला काय बोलावं कळेना.. तिने आभाकडे पाहिलं.. मग आकाशकडे पाहिलं..
“ठीक आहे.. मी पोहोचते ऑडीत..” आकाशकडे बघून ती म्हणाली आणि घाइघाइत निघाली..
आकाशने आभाकडे पाहिलं.. ती त्याच्याकडे पाहून गाल्यातल्या गालात हसत होती..
“एकांकिकेसाठी.. काल तसाही वेळ वायाच गेला नाही..”
तो आभाला एक्स्प्लेनेशन देत होता हे पाहून आभालाच खूप गंमत वाटली..
“वेळ वाया घालवतोयस तू आत्ता..” आकाशला ती काय बोलतेय ते कळल नाही.. तो तिच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहत राहिला.. “अरे लेक्चर.. घड्याळ बघ लेट होतोय..”
आकाशने घड्याळ पाहिलं..
“आयला.. उशीर झाला..” असं म्हणत त्याने आभाकडे पाहिलं आणि हसून डोळा मारला.. “चल पळतो” म्हणत तो आपल्या क्लासरूमच्या दिशेने धावलाच.. आभा तो गेला त्या दिशेला काही क्षण पाहत राहिली.. मग ती कॅन्टीनकडे निघाली.. खरं तर आज तिचं पाहिलं लेक्चर ऑफ होतं.. पण आकाश बरोबर इतक्या दिवसांनी बाईकवरून यायला मिळणार म्हणून ती कुठलाही विचार न करता घरातून लवकरच निघाली होती.. आता ती एक तास कॅन्टीनमधे बसणार होती.. एकटीच..
पण ती कॅन्टीनमधे पोहोचली आणि तिला जाणवलं कि तिला एकटं बसावं लागणार नव्हतं.. कॅन्टीनमधे प्रतिक बसला होता.. मिसळ खात.. तिला पाहून तो खुश झाला..
“अरे ड्रामाक्वीन.. ये ये.. बस बस..”
“ड्रामाक्वीन? आता हे काय नवीन?” आभा त्याच्या समोरच्या बाकड्यावर बसत म्हणाली..
“खऱ्या आयुष्यात नाटकाप्रमाणे डायलॉग बोलणारी आणि तितक्याच ड्रमॅटिकली सगळ्यावर रिअॅक्ट करणारी तू एकच भेटली आहेस मला.. म्हणून तू ड्रामाक्वीन..” आणि तो हसू लागला..
“प्लीज.. आणि मग तू कोण लाउड कुमार का अँग्री बर्ड.. सतत चिडचिड..”
यावर प्रतिक अजून जोरात हसला..
आकाश त्या दोघांना सेकंड फ्लोरच्या बाल्कनीतून बघत होता.. सरांना त्यांना हिस्ट्रीच्या काही स्लाईड्स दाखवायच्या होत्या म्हणून ते त्यांना प्रोजेक्टर रूम मधे घेवून चालले होते.. आभाला प्रतिकबरोबर बसलेलं पाहून आकाशला खरच आश्चर्य वाटलं.. आभा तर म्हणाली होती तिचं लेक्चर आहे.. आभा पहिल्यांदा आकाश सोबत खोटं बोलली होती.. आकाशला याचं जास्त आश्चर्य वाटलं..
प्रतिक आणि आभा खळखळून हसत होते.. कित्येक दिवसांनी आज आभा इतकं खळखळून हसत होती.. आज तिला सगळ्याच बाबतीत फ्री वाटत होतं.. सगळे कन्फ्युजन संपले होते.. अदितीला खरं कळलं होतं.. पण तरीही ती नॉर्मल झाली होती.. आकाश सोबत आभाला नॉर्मल राहायची परवानगी विधीशाने दिली होती. आता काहि दिवस तरी काहीच गडबड होणार नाही आशी आभाला खात्री वाटत होती.. पण आजच तिला वाटणारी हि खात्री धुळीला मिळणार होती याची त्या क्षणी तिला कल्पना नव्हती.. अदिती आणि आकाशच कडाक्याचं भांडण झाल्याची खबर पुढच्या काहीच तासात तिच्यापर्यंत पोहोचणार होती..

Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४

ओलांडून जाताना... भाग - 3