ओलांडून जाताना.. भाग-२८



मघापासून भरलेला थेटरबाहेरचा सगळा परिसर आता एकदम ओस पडला होता.. स्पर्धेची तिकिटं मिळू न शकलेले काही लोक बाहेर अजूनही वाट पाहत होते.. तिकिटांच्या बाबतीत काही होवू शकतंय का हि शक्यता पडताळून पाहत होते.. पण आत दुसरी एकांकिका सुरु झालेली असल्यामुळे त्याची काहीच शक्यता नव्हती..
थेटरच्या मागच्या बाजूला जिथे आभाच्या कॉलेजची बस उभी होती तिथेहि खूप लगबग सुरु होती.. पुढे ज्यांच्या ज्यांच्या एकांकिका होत्या ते सारे अतिशय एक्सायटेडली तयाऱ्यानां लागले होते.. आभाच्या कॉलेजच्या बसमध्येही त्यांची चक्री सुरु होती.. एकप्रकारच टेन्शनचं वातावरण होतं.. चुकत कुणीच नव्हतं.. पण दडपणाखाली सगळेच होते.. मोबाईलवर एकांकिकेच्या मधली गाणी वाजवून डान्सर्स मनातल्या मनात गाण्यांची प्रॅक्टिस करत होते.. डायलॉग्जचं टायमिंग त्यावर मॅच केलं जात होतं.. एकांकिकेची अशी बैठी तालीम अर्ध्यावरच आली होती आणि इतक्यात प्रतीकचा फोन वाजला.. प्रतीकने खुणेनेच सगळ्यांना तालीम कंटिन्यू करायला सांगितली आणि तो फोनवर बोलू लागला..
“हां.. रोहन बोल..” रोहन हा एकांकिकेच म्युझिक ऑपरेट करणारा होता.. तो थेटरच्या वरच्या मजल्यावरच्या एका पॅसेजमध्ये बसून हेडफोन वर एकांकिकेच न्युझिक चेक करत होता.. त्याने तिथूनच फोन केला होता..
“अरे प्रतिक दादा.. लोच्या झालाय?” तो काहीशा टेन्स आवाजात म्हणाला..
“काय झालय..” प्रतीकच्या आवाज ऐकून सगळ्यांनी तालीम थांबवली आणि ते त्याच्याकडे बघू लागले..
“अरे आपली म्युझिक फाईल करप्ट झालीये लॅपटॉपमधली.. कुठलंच म्युझिक चालत नाहीये..”
“सीडी आहे ना आपल्याकडे.. ती..”
“तिच्यात आपले सगळे म्युझिक पिसेस एकाच ट्रॅक मध्ये आहेत.. त्यावर ऑपरेट करताना काही चूक झाली तर..” प्रतीकच्या चेहऱ्यावरचा वैताग आता स्पष्ट दिसत होता.. बसमधले सगळे अजूनच जास्त टेन्स झाले..
“पेनड्राईव्ह.. त्यात आहे ना..” प्रतीकचा आवाज वाढला..
“अरे.. ते..” रोहनला कसं बोलावं ते कळत नव्हतं.. तो बोलायला चाचरू लागला.. तसा प्रतीकचा आवाज अधिकच वाढला..
“काय झालय? का आता त्यातही प्रॉब्लेम आहे काही?”
“अरे ते.. ते पेनड्राईव्ह लागत नाहीये लॅपटॉप..” त्याने वाक्य पूर्ण करायच्या आतंच प्रतीकने एक जोरदार शिवी हासडली.. तसे बस मधले सगळे अजूनच घाबरले..
“काय झालय प्रतिक..” आकाशने हिंमत करून विचारलं..
“चू____ आहोत का आपण... इथे आलो आहोत ते..” प्रतीकचा पारा चांगलाच चढला होता.. शेजारी बसलेल्या आभाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला..
“प्रतिक... डोंट अब्युज.. झालय काय?” आभा त्याला शांत करत म्हणाली..
“अरे इथे आपण जीव तोडून एकांकिकेची तयारी करतोय आणि तिथे..” प्रतीक स्वत:ला कंट्रोल करण्यासाठी थांबला..  “त्या बिनडोक रोहनने म्युझिकचा प्रॉब्लेम करून ठेवलाय.. सगळे बॅकअप होते ते हि नीट काम करत नाहीएत.. आता.... जावू दे.. मीच जावून बगतो काय झालय ते..”
प्रतिक जायला उठला.. तोच आभाने त्याला अडवल.. हा तिथे गेला तर रोहनची काही खैर नाही हे ती जाणून होती..
“एक मिनिट प्रतिक.. आपली रिहर्सल बाकी आहे अजून.. तू थांब.. लेट आकाश गो..”
आकाश या साऱ्या प्रकरणात अचानक आपलं नाव ऐकून गडबडला.. पण आता आभानेच ते पुढे केलेलं असल्यामुळे त्याला काहीच बोलता येईना..
“हो.. हो.. मी जातो ना..” तो कसंनुस म्हणाला..
“नको मीच जातो.. त्या रोहनला चांगलाच धारेवर धरल्याशिवाय अक्कल नाही यायची त्याला..”
“प्रतिक.. त्याला अक्कल शिकवण्याची हि वेळ नाहीये.. बस तू इथेच.. आकाश तू जा आणि बघ काय करता येतय.. आम्ही रीडिंग संपवून येतोच..” आभा म्हणाली तसा आकाश मानेनेच होकार देवून उठला आणि निघाला..
प्रतीकने आभाकडे पाहिलं.. हे सारं फक्त आभाने सांगितलं होतं म्हणून तो करत होता.. दुसऱ्या कुणालाही तो अजिबात जुमानणार नव्हता.. आणि ते आभालाही माहित होतं.. ती त्याच्याकडे पाहून हसली.. आणि तिने सगळ्यांकडे वळत पुन्हा तालीम सुरु केली..

आकाश बसमधून बाहेर पडला.. त्याला आठवलं कि त्याच्या मोबाईलमध्ये काही म्युझिकचे पीस आहेत.. आणि त्याच्या मेलवर तर त्यांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट आहे.. आपण यावर काहीतरी उपाय शोधून काढूच असं त्याला वाटू लागलं होतं.. आभाने त्याच्यावर हि जवाबदारी टाकली होती.. त्यामुळे तिला इम्प्रेस करण्याची हि एक संधी ठरली असती..
आकाश लगबगीने थेटरकडे निघाला तोच तिथेच कॉर्नरला उभ्या असलेल्या एका मुलीने त्याला हाक मारली..
“एक्सक्युज मी.. कॅन यु प्लीज डू मी अ फेवर..”
आकाशने थांबून तिच्याकडे पाहिलं.. ती एक गोरीशी.. थोडीशी जाड म्हणता येईल अशी मुलगी होती.. फ्लोरोसंट ग्रीन हेअर बँड, काळ्या रंगाचा एक शर्ट आणि जीन्स आणि खांदयावर एक लाल रंगाची बॅग.. ती विधिशा होती.. आकाश इच्छा नसताना स्त्री दाक्षिण्य म्हणून मदत करायला तिच्याकडे गेला.. ती आपला एक डोळा चोळत होती आणि खूप इरीटेट झाल्यासारखी वाटत होती..
“काय झालं..”
“सॉरी.. पण माझ्या डोळ्यात अचानक काहीतरी गेलय.. आणि खूप त्रास होतोय.. कॅन यु जस्ट चेक..” आकाशकडे खरं तर या सगळ्यासाठी वेळ नव्हता.. पण तरीही तो तिची मदत करायला पुढे गेला..
“बघू.. काय झालय..” आकाश तिच्या डोळ्यात काय गेलय ते पाहू लागला.. विधीशाला हेच हवं होतं.. ती आकाशच्या डोळ्यात डोळे रोखून पाहू लागली.. आणि तिने आकाशला हिप्नोटाईझ करायला सुरुवात केली..

बसमध्ये रिहर्सल सुरु होती पण प्रतिकचं त्याकडे अजिबात लक्ष नव्हतं.. त्याने पंकजला फोन केला होता आणि त्याच्याकडून काही मदत मिळू शकतेय का ते तो पाहत होता.. आभाचं अर्ध लक्ष त्याच्याकडे होतं कारण त्याच्या अस्वस्थ होण्यामुळे सगळा ग्रुपच अस्वस्थ झाला होता.. आणि सगळेच चुकू लागले होते.. आभा अखेर न रहावून त्याच्याकडे गेली..
“प्रतिक.. सगळं होईल ओके.. रिलॅक्स हो जरा.. पाचवी आहे आपली एकांकिका.. अजून दोन बाकी आहेत मध्ये..”
“हो.. म्हणून मी पंकजला एक सीडी घेवून इथे यायला सांगितलं आहे.. पण तोही एका मिटिंगमध्ये आहे.. ती उरकून तो वेळेत..”
“येईल.. होईल सगळं नीट.. आणि आता आकाशही गेलाय ना.. तो करेल काहीतरी.. शांत हो..”
असं म्हणत आभाने त्याच्या हातावर आपला हात ठेवला.. त्याने हाताकडे पाहिलं.. आभाकडे पाहिलं.. ती हसली..
“चल.. बघून घे एकदा.. तुला हवा तसा होतोय का..” ती पुन्हा रीडिंग रिहर्सल साठी निघून गेली.. प्रतिक तिला जाताना पाहत राहिला..
“मला वाटत नाही याचा शेवट मला हवा तसा होईल..” प्रतिक स्वत:शीच पुटपुटला..

“एक्सक्युज मी.. काय करताय तुम्ही? वेड लागलय का तुम्हाला?”
आकाश वैतागून म्हणाला.. विधिशा दचकली.. ‘शिट!! याच्यावर हिप्नॉटिझमचा परिणाम होत नाहीये..’ विधिशा मनातल्या मनात म्हणाली..
“आर यु... आर यु ट्राइंग टू हिप्नोटाईझ मी.. आर यु इनसेन?” आकाश वैतागलाच होता..
“नो.. नो.. आय वॉज जस्ट.. जस्ट किडिंग..” विधिशा सारवासारव करत म्हणाली..
“कुठल्या कॉलेजची आहेस तू.. तूला काय आमची एकांकिका पडायलापाठवलंय?” आकाशला वेगळाच संशय आला.. पण तोवर विधीशाने तिथून काढता पाय घेतला होता.. ती जवळ जवळ तिथून पळाली.. आकाशला तिच्या मागे जायचं होतं.. पण आधीच त्याला उशीर होत होता.. तो वर जायला निघाला..

विधिशा बर्याच दिवसांनी अशी पळाली होती.. तिला धाप लागली होती.. आकाश आता मागे नाहीये हे जाणवून ती श्वास घ्यायला थांबली.. तिने कपाळावर हात मारून घेतला.. तिचा हा प्लान केवळ मूर्खपणाच होता.. प्रत्येक गोष्ट इतक्या विचारपूर्वक करणाऱ्या तिने इतका मूर्खपणा कसा काय केला होता.. ती हिप्नॉटिझमचा बेसिक रूल विसरली होती.. हिप्नॉटिझम प्रत्येकावर लागू होत नाही.. प्लानच्या या स्टेजला तिला आकाशच्या मनात नक्की काय आहे ते जाणून घ्यायचं होतं.. पुढचं पाऊल म्हणून ती अदितीलाही हिप्नोटाईझ करणार होती.. पण आता तिला प्लानमधला फोलपणा लक्षात आल्यावर ती तशी रिस्क अजिबात घेवू इच्छित नव्हती..

प्रतिक आणि आभा रिहर्सल आटपून घाईघाईत वर पोहोचले तेव्हा आकाश आणि रोहन लॅपटॉप सोबत खटाटोप करण्यात गुंतले होते..
“काय झालं? काही मार्ग सापडला..” प्रतीकने इगरली विचारलं..
“याच्या मोबाईल वर आहेत पण क्वालिटी चांगली नाहीये.. त्याच्या मेलवर सगळे ट्रॅक आहेत पण आपल्याकडे नेट नाहीये..” रोहन सहज म्हणून बोलून गेला..
“साला नाटचं लावतोय मघापासून.. अरे काहीतरी पॉझिटिव्ह सांग..” प्रतीकने आकाशकडे पाहिलं.. आणि खिशातून मोबाईल काढत तो बोलू लागला.. “तुझं अकाउंट सांग पटकन.. आपण मोबाईलवर डाऊनलोड करू..”
“मी ट्राय केलय ते.. फाइल्स हेवी आहेत खूप..” आकाशने प्रतिकला सांगितलं..
“फ__! आता?” आभा मघापासून त्याचं बोलण्यावर विचार करत होती.. अचानक तिची ट्यूब पेटली..
“एक मिनिट.. माझी एक मैत्रीण आहे.. एकांकिका बघायला आलीये.. तिच्याकडे नेह्मी तिचा लॅपटॉप आणि नेट कनेक्ट असतं.. मी तिला विचारते..” आभाने घाईघाईत तिचा फोन बाहेर काढला आणि विधीशाला कॉल लावला..
“विधी.. तू आज लॅपटॉप आणि नेट आणलं आहेस ना..” विधीशाने फिन उचलल्या उचलल्या आभाने विचारलं..
“हो.. का?”
“ग्रेट.. पु.लं.च्या इथे भेट.. मी येतेय..” आभाने फोन कट केला.. आणि ती प्रतिक आणि आकाश एकमेकांशी बोलत होते तिथे गेली..
“काय.. हा टोटल मूर्खपणा आहे.. कुठला ग्रुप असं करेल..” प्रतिक आकाशी बोलत होता..
“माझ्या मैत्रिणीकडे आहे लॅपटॉप.. पटकन डाऊनलोड करून घेवू..” आभा त्याचं बोलणं तोडत मध्येच म्हणाली..
“हां.. चल..” आकाश आभा सोबत जायला निघाला..
“एक मिनिट.. पण ती मुलगी कोण होती ते कळलं?” प्रतीकने आकाशला विचारलं.. अशा वेळेतही हि पोरं कुठल्याशा मुलीची चर्चा करतायत हे पाहून आभा जरा वैतागलीच..
“कोण मुलगी?”
“अगं एक भेटली होती.. इथे वर येताना.. मला हिप्नोटाईझ करायचा प्रयत्न केला तिने..”
“काय? कोण?”
“काय माहित.. ब्लॅक शर्ट आणि जीन्स घातली होती.. रेड बॅग होती खांद्याला..” हेच कपडे विधीशाने घातले होते हे आभाला रिअलाइज व्हायला दोन क्षण गेले.. ‘देवा.. ती खरंच विधिशा असेल तर..’ आभाने मनातल्या मनात विचार केला.. एव्हाना आकाश प्रतीकशी बोलून जिन्याकडे निघाला होता..
“एक मिनिट आकाश..” आभाने आकाशला थांबवलं.. जर ती विधीशाच असेल तर आकाशने तिला पाहणं बरोबर नव्हतं..
“काय झालं.. चल ना जावूया..”
“नाही.. तू थांब इथेच.. मी जावून आले..”
“अगं पण..”
“तुम्ही इथे थांबून आपल्या कडे असलेल्या सी डी चे ट्रॅक एडीट होतायत का ते बघा.. तिचं नेट नाहीच चाललं तर दुसरा मार्ग असावा..” आभा मनाला येईल ते कारण बनवत होती..
“अगं पण माझ्या मेल वर आहेत ते..” आकाश म्हणाला..
“मग मी तुझा मेल नाही का उघडू शकत.. आकाश प्लीज आपल्याकडे वेळ कमी आहे मी जावून येते..” आभा काही न ऐकता घाईघाईत तिथून निघाली.. आकाश आणि प्रतिक दोघांनाही कळलं नाही तिचा प्रॉब्लेम काय आहे ते..

आभा लॅपटॉपला नेट कनेक्ट करून मेल साईट टाईप करत होती.. विधिशा शेजारीच बसली होती.. आता ती आभासोबत जरा जास्तच नाईसली वागत होती.. आभाने आल्या आल्या काहीही न बोलता तिचा लॅपटॉप हातातून घेतला होता आणि कामाला लागली होती.. विधीशाला कळतच नव्हतं हिचा नक्की प्रॉब्लेम काय झालाय..
“काय झालं.. खूप मोठा प्रॉब्लेम आहे का?” विधीशा तिच्या मुडचा अंदाज घ्यायच्या हिशोबाने म्हणाली..
“तुझं काय चाललय विधी..” आभा स्क्रीन कडे बघत म्हणाली.
“काय?” विधीशाला अंदाज येत नव्हता..
“तू आकाशला हिप्नोटाईझ करण्याचा प्रयत्न केलास ना.. खरं सांग.. काय चाललय तुझं..”
“काहीही नाही.. मी ती नव्हते..”
“पण तुझ्या चेहर्याकडे बघून वाटत नाहीये तसं.. खरं सांग विधीशा आता काय प्लान शिजतोय तुझ्या डोक्यात..”
“काही नाही गं.. मी फक्त असंच.. सहज..”
“सहज?? तुझ्यासोबत राहून मला तुझ्या डोक्यात काय येवू शकतं याचा अंदाज येवू लागलाय.. हे सहज नक्कीच नाहीये.. त्याला हिप्नोटाईझ करून तुला त्याच्या मनातून काय काढून घ्यायचं होतं.. सांग.. सांग ना..”
विधीशाला काय बोलावं ते कळत नव्हतं.. तिने लॅपटॉपच्या स्क्रीन कडे पाहिलं.. ती साईट ओपन झाली होती..
“आभा.. मेल..” ती विषय बदलत म्हणाली.. आभालाही त्याची जास्त घाई होती.. तिने घाई घाईत आकाशचा मेल आय-डी टाईप केला.. आणि पासवर्ड टाईप करायला जाणार तोच तिला रिअलाइज झालं कि तिला तो माहीतच नाहीये.. तिने आकाशला फोन केला..
“आकाश.. साईट ओपन झालीये.. पासवर्ड सांगतोस तुझा..”
“थँक गॉड.. पासवर्ड..” आकाश बोलता बोलता थांबला..
“काय रे..”
“अं.. मी whatsapp करतो तुला.. थांब..” आकाशने फोन कट केला..
“काय म्हणाला तो?” विधिशा परत मूड लाईट करण्यासाठी हसत हसत म्हणाली..
“तुझ्या या गोड बोलण्याचा काहीच परिणाम होणार नाहीये.. मी तुझ्यावर खूप रागावले आहे..” इतक्यात आभाचा फोन वाजला.. आकाशचा whatsapp होता.. तिने ओपन केला.. वाचत ती टाईप करायला जाणार तोच थांबली..
“काय झालं..” विधिशा आभाच्या फोनमध्ये डोकावून पाहत म्हणाली.. ती ज्यासाठी आकाशला हिप्नोटाईझ करत होती त्याचं उत्तरच जणू त्याने पाठवलं होतं..
स्क्रीनवर मेसेज मध्ये पासवर्ड लिहिला होता.. “ADITI0101”
अदितीचं नाव आणि तिची बर्थडेट होती ती...

क्रमशः






Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४

ओलांडून जाताना... भाग - 3