ओलांडून जाताना.. भाग-२३



      दूरवर कुठेतरी जोरजोरात स्पीकरवर गाण्याचा आवाज येत होता..
“खंडरायाच्या लग्नाला.. नवरी नटली.. नवरी नटली.. सुपरी फुटली..”
संध्याकाळचे सहा वाजले होते.. विरारच्या एका अपार्टमेंटच्या गेटवर प्रतिक आणि सगळा ग्रुप उभा होता.. प्रतीकने मोबाईलवरचा पत्ता चेक केला.. पत्ता बरोबर होता..
“इथेच जायचय..” तो सगळ्यांना उद्देशून म्हणाला..
“मी तर गाणं ऐकूनच बोललो होतो.. हेच असणार..” त्यांच्या एकांकिकेचा म्युझिक डिरेक्टरहि आज आला होता.. त्याने गाण्याचा सूर बरोबर ओळखला..
सगळे आत जावू लागले.. पण आकाश अस्वस्थच होता.. आभा आली नव्हती.. खरं तर तो तिच्यासाठीच आला होता.. प्रतिकनेच त्याला तसं सांगितलं होतं..

“हे बघ आकाश.. आपण सगळे एकाच एकांकिकेत काम करतोय.. तुमच्यातल कोऑरडिनेशन हीच या एकांकिकेची ताकद आहे.. आणि इतक्या इंपॉरटंट स्पर्धेत मला तुमच्या पर्सनल प्रॉब्लेम्समुळे हरायचं नाहीये..” कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये प्रतिक आकाशला समजवत होता..
“मलाही ते मान्य आहे ना.. आणि म्हणूनच मला आभाशी बोलायचं आहे.. पण ती कॉलेजला येत नाहीये.. तिच्या घरी जायचं म्हटलं तरी मला टेन्शन येतय.. कॉलेजच्या पोरांसमोर तमाशा झाला तो झाला उगाच सोसायटीत नको..”
“उच्च विचार आहेत तुझे..” प्रतीकच्या या वाक्यावर आकाशने चमकून त्याच्याकडे पाहिलं.. “आभाचं ठीक आहे.. ती तुला शशि सरांच्या भावाच्या हळदीत भेटेल.. पण ती एकटीच नाहीये ना एकांकिकेत..” प्रतीकने एवढं बोलून बाहेर पाहिलं.. कॅन्टीनच्या दाराजवळ अदिती उभी होती.. आकाशला प्रतिकला काय म्हणायचय ते कळलं..
“प्रतिक.. मी आधीच तिच्याशी काय बोलायचं आहे ते बोललोय..”
“हेच ना कि आभा आणि तू एकत्र असाल तेव्हाच तू हे सॉर्ट आउट करशील.. पण तो झाला तुमच्या तिघांमधला इश्यू.. तुमच्या दोघांमध्ये जो आहे तो कधी सॉर्ट आउट करणार तुम्ही?”
“आमच्यात काही इश्यू नाहीये..” आकाश तिथून उठत म्हणाला..
“आकाश.. हा तुमच्यातलाच इश्यू आहे ज्यात आभाला उगाच ओढून घेतलस तू.. आता जो पर्यंत हि कडी सुटणार नाही ना तोपर्यंत हे असंच सुरु राहणार..” आकाशने प्रतिककडे पाहिलं.. त्याचं म्हणणं आकाशला कळत होतं.. पण वळत नव्हतं..
“मग यावर उपायचं नाही असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं..” आकाश जावू लागला तशी अदिती पुढे आली..
“आकाश.. खूप झालं एकमेकांपासून असं पळणं.. मी चुकले.. आय अॅम सॉरी.. मला माहिती होतं कि तुझं माझ्यावर प्रेम आहे.. प्रत्येक मुलीला हि गोष्ट आवडते कि कुणीतरी तिच्यावर खूप प्रेम करतय.. मला आभाने जेव्हा सांगितलं कि तू आणि आभा हे नाटक करताय तेव्हा किती अभिमान वाटला  होतं माझा मलाच.. पण मग मला दिसु लागलं कि हळूहळू तुम्ही खरंच जवळ येताय.. प्रेम करू लागला आहात एकमेकांवर.. माझा इगो हर्ट झाला.. माझ्यावर प्रेम करणाऱ्या एका मुलाला आभासारखी मुलगी कशी काय आवडू शकते.. म्हणून त्या दिवशी मी तुला टीज करू लागले आणि बघता बघता..” अदितीचे डोळे हे बोलतानाही भरून आले होते.. आकाशने तिच्याकडे पाहिलं.. त्याचा चेहरा अतिशय थंड होता..
“मी खूप नशीबवान आहे हे आज मला कळतय.. थँक गॉड त्या दिवशी मी तुला प्रपोज करू शकलो नाही.. मला वाटलं होतं कि तुझं प्रेम आहे माझ्यावर.. पण कदाचित प्रेमाचा अर्थच तुला माहित नाही.. कारण तसं असतं तर तू माझं आणि आभाच बनत आलेलं नातं असं बिघडवल नसतंस..” अदिती यावर काहीच बोलली नाही.. तिचा चेहरा थंड होता.. डोळ्यात पाणी होतं.. आकाशने प्रतीककडे पाहिलं.. “बरं झालं प्रतिक तू या गोष्टी इथेच बोलायला लावल्यास.. आता काही गोष्टी माझ्यासाठी जास्त सोप्या होणार आहेत..” तो पुढे आला आणि त्याने प्रतीकशी हात मिळवला.. “शशी सरांच्या घरी भेटूच..” मागे न बघता आकाश कॅन्टीनच्या बाहेर निघून गेला.. अदितीही वळून जायला निघाली..
“अदिती..” प्रतीकने तिला थांबवलं.. “तुझ्या अशा वागण्या मागची खरी कथा काय आहे ते माहित नाही.. पण आकाशला तू जी सांगितली आहेस ती कथा खरी नाही हे नक्की..”
“नसेल खरी कदाचित.. पण आता तिच गरजेची होती..” अदिती प्रतिककडे वळून न पाहता म्हणाली आणि कॅन्टीनबाहेर निघून गेली..

शशीसरांच्या बिल्डींगमध्ये शिरताना प्रतीकने शेजारून चालणाऱ्या अदितीकडे पाहिलं आणि त्याला कॅन्टीनमध्ये काल घडलेला तो सगळा प्रसंग आठवला.. अदितीचाही हिरमोड झाला होता.. कारण तीही आभाला भेटण्यासाठी इथे आली होती.. खरं तर तिला इतक्या लांब येण्यात अजिबात रस नव्हता.. तिला फक्त हे सारं मिटवायच होतं.. ती जर मोकळ्या मनाने आकाशला स्वीकारू शकत नव्हती तर तिला त्याच्या मार्गात येण्याचा काहीही अधिकार नव्हता.. तिचं एक मन आतल्या आत तुटत होतं.. तर दुसरी प्रॅक्टिकल बाजू तिला सांगत होती जे होतंय ते खरच योग्य आहे..
त्यांच्या नात्याला भविष्य नव्हतं.. आकाशची आर्थिक परिस्थिती पाहता तिच्या आईने त्याचं कधीच लग्न होवू दिलं नसतं.. जरी तिला विरोध करून अदितीने लग्न केलं असतं तर ती सुखी झाली असती?.. तिने आपल्या मावशीला पाहिलं होतं.. प्रेमात पडून १० बाय १० च्या खोलीत अडकलेलं.. लव्हमॅरेजचे परिणाम तिने स्वत: पाहिले होते.. ते सारं ती खरचं निभावू शकणार होती का? मर्सिडीजच्या ऐवजी ट्रेन आणि बस.. १८०० स्वेअरफिट च्या फ्लॅट ऐवजी ६०० स्वेअरफिटचा ब्लॉक.. हा बदल जर तिला झेलता आला नसता तर.. प्रेम टिकलं नसतं आणि त्यांच्या एकांकीकेतल्या लैला मजनूप्रमाणे त्याचं आयुष्य एक नाईटमेअर होवून बसलं असत तर? अदिती हे सारे विचार करून स्वत:ची समजूत काढत होती.. आकाशपासून दूर राहण्यासाठी आता हा एकच मार्ग तिला मदत करणार होता..
लिफ्टमध्ये उभं राहताना नेमके अदिती आणि आकाश शेजारी शेजारी आले.. दोघांनी ऑकवर्डली एकमेकांकडे पाहिलं.. आकाशची नजर अदितीच्या आरपार बघत होती.. अदितीला प्रश्न पडला.. याचं नजरेच्या आपण प्रेमात पडलो होतो? हीच का ती नजर? पण मग तिने स्वत:ला समजावलं, सगळं काही योग्य व्हायचं असेल तर हीच नजर गरजेची आहे.. काल पर्यंत तिला आकाशच्या नजरेत तिच्यासाठी प्रेम दिसत होतं पण आज? तिने जे ठरवलं होतं ते योग्य प्रकारे काम करत होतं.. आता सगळ काही सुरळीत होणार होतं..

आकाशला लिफ्टमधे फारच अवघडल्यासारखं वाटत होतं.. अदिती त्याच्या अगदी शेजारी उभी होती.. एकदा दोघांची नजरानजरही झाली.. पण आता त्याला तिच्याबद्दल काहीच वाटेनासं झालं होतं.. माणसाचं मन किती विचित्र असतं, काल पर्यंत जिच्यासोबत अख्ख आयुष्य घालवायला तो तयार झाला असता आज तिच्या शेजारी काही सेकंद उभं राहणंही त्याला नकोसं झालं होतं..
अदितीला त्याच्याबद्दल प्रेम वाटत नाही, सोहम तिचा बॉयफ्रेंड आहे हे कळल्यावरही आकाशला तिच्याबद्दल प्रेम वाटत होतं.. आभाबद्दल आकर्षण वाटत असतानाही एक मन अदितीच्या दिशेने त्याला ओढत होतं.. पण अदितीने ज्या प्रकारे प्रेमाचा अपमान केला होता तो त्याला सहन होत नव्हता.. अदिती अशी असेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं... आपण माणसं ओळखायला चुकतो असं त्याला वाटू लागलं होतं.. एकतर त्याने अदितीवर आंधळेपणाने प्रेम केलं होतं आणि त्या दरम्यान दुसरीकडे आभाला त्याच्याबद्दल वाटणारं प्रेम दुर्लक्षित करून तिचं मन दुखावलं होतं.. पण आता अदितीचं खरं रूप तिच्याच तोंडून ऐकल्यावर त्याला तो स्वत: महामूर्ख वाटत होता आणि आभा अजूनच ग्रेट वाटू लागली होती..
त्याला हे सारं आभाशी शेअर करायचं होतं.. आज तिची भेट होणार नव्हती त्यामुळे आता तो उद्या स्वत: तिच्या घरी जाणार होता.. आता काहीही झालं असतं तरी त्याला आभाशी लवकरात लवकर बोलणं भाग होतं..
लिफ्ट थांबली तसा तो भानावर आला.. लिफ्टच ग्रीलचं दर हाताने उघडून एकेकजण बाहेर पडू लागले.. आकाश घाईघाईत पुढे झाला.. अदितीला टाळून त्याला लवकरात लवकर बाहेर जायचं होतं.. गाण्यांचा आवाज आता जास्तच वाढला होता.. ‘खंडरायाच्या लग्नावरून’ गोष्ट आता ‘रसिकाचे लग्नात’ पर्यंत आली होती.. गच्चीवर नक्की काय धुमशान सुरु असेल हे कुणीच इमॅजिन करू शकत नव्हतं.. आगळे जिन्याने वर जावू लागले.. गच्चीच्या दारातून लायटिंग दिसत होती.. प्रतिक आणि इतर ग्रुप पाठोपाठ आकाश आत आला.. आणि समोरचं दृष्य पाहून चक्रावलाच..
डीप रेड कलरचा सुंदर असा रॉ सिल्कचा पंजाबी सूट घालून आभा त्यांच्याच दिशेने येत होती.. तिच्या चेहऱ्यावर छानसं हसू होतं..
“अरे.. आलात तुम्ही.. किती उशीर..”
सगळेच तिला पाहून चकित झाले होते.. आकाशला तर प्रचंड आश्चर्य वाटत होतं.. हि इथे कशी.. तो गोंधळला होता.. प्रतीकने त्याची रिअॅक्शन पाहिली.. त्याचा चेहरा पाहून त्याला हसू आलं.. त्याने आभाकडे पाहिलं.. ती प्रतिककडे पाहून हसली..

त्याचं दिवशी सकाळी आभाचा मोबाईल वाजला.. तिने पाहिलं, तो प्रतीकचा कॉल होता.. आज शशीसरांकडे हळदीला जायचं होतं.. तिची अजिबात इच्छा नव्हती.. त्यामुळे प्रतीकाचा फोन उचलायची इच्छाही तिला होत नव्हती.. प्रतिकला नकार देणं तिला जड जाणार होतं.. पण तरीही प्रतीकचा फोन न उचलूनही चालणार नव्हतं..
“हॅलो!” आभा फोन उचलून म्हणाली..
“आभा, ५ वाजता मी येतोय गाडी घेवून.. ओशीवराला मी येणारंच आहे पंकजला (म्युझिक डिरेक्टर) घ्यायला.. तू तयार रहा.. आकाशपण आपल्या बरोबरच असेल.. ”
“प्रतिक अरे..”
“आता फालतूची कारणं नकोत गं.. तुला मी  सांगितलंय ना.. मला हा इश्यू क्लोज करायचाय..”
“कॉलेजमधे करूच न..”
“बाहेरचं मॅटर बाहेरचं सोडवायचं..”
“प्रतिक प्लीज.. मला एकवेळ डायरेक्ट तिथे यायलाही काही प्रॉब्लेम नाही.. पण प्रवासातला तो ऑकवर्डनेस मी खरंच नाही झेलू शकणार..” आभा वेळ मारून न्यायला काहीतरी बोलली.. तिला माहित होतं कि प्रतिक तिला डायरेक्ट विरारला यायला नाही सांगणार..
“हे बेस्ट आहे.. आपण असंच करू..” पण प्रतिक नेहमीप्रमाणे अनएक्स्पेक्टेड असं काहीतरी बोलला..
“काय.. अरे वेडा झालायस का तू.. मी डायरेक्ट विरारला कशी येवू..”
“का लोक जात नाहीत का विरारला.. आपल्या कॉलेजमधल्या किती मुली विरारलाच तर राहतात..”
“अरे पण..”
“आता प्लिज.. रडू नकोस उगाच.. डायरेक्ट ये तू..”
“नाही रे.. अरे.. मी नाही फेस करू शकत सगळ्यांना..” आभा अखेर न रहावून म्हणालीच..
“तुमचा प्रॉब्लेम काय आहे सगळ्यांचा? त्या आकाश अदितीचं पण तेच.. फायनली त्यांना बोलतं केलं तर आता तुझी नाटकं..”
“आकाश आणि अदिती बोलले एकमेकांशी?”
“हो.. तुला एक गंमत सांगू आभा.. तुम्ही सोडून बाकी कुणालाच तुमच्या या प्रॉब्लेमची काही पडलेली नाहीये.. मी या दोन दिवसात एकालाही त्याबद्दल बोलताना पाहिलेलं नाही.. तुम्ही तिघंच सगळं अझ्युम करून वेड्यासारखे वागताय.. तुला एक सल्ला देवू.. आज ये.. आणि येशील तेव्हा अशी नॉर्मल वाग जसं काही झालंच नाही..”

आभा ग्रुपमधल्या प्रत्येकाला भेटली.. आकाशला आणि अदितीलाही.. फार्महाउसला आपण गेलोच नाही.. तिथे काही घडलंच नाही असं ती वावरत होती.. आकाश तिच्याकडे आश्चर्यान बघत होता... आभाने त्याच्याकडे पाहिलं आणि हसली.. आकाशहि हसला.. मनावरच खूप मोठं ओझं हलकं झालय असं त्याला वाटत होतं..
अदितीला आभाचं कौतुक वाटत होतं.. ज्या प्रकारे तिने हे सारं प्रकरण हाताळलं होतं.. ज्या प्रकारे आता ती वागत होती.. हे सगळं खूप बॅलन्सड होतं.. अदिती आभाच्या विचारात हरवलेली असतानाच शशिकांत सर तिथे आले.. ते सगळ्यांना पाहून खूप खूष होते..
“अरे वा.. बरं झालं तुम्ही सगळे आलात..”
“आता तुम्ही बोलावलं तर येणार नाय काय..” ग्रुपमधला एक मुलगा म्हणाला..
“नाही लांब पडलं असेल ना तुम्हाला विरार म्हणजे..”
“सर अहो मुंबईतल्या मुंबईत फिरण्यापेक्षा पुण्याला जाणं जास्त जवळ आहे.. त्यामुळे कुठेही असतं तरी लांबच पडणार होतं..” सिद्धार्थ म्हणाला..
“पण सर बिल्डींग छान आहे तुमची.. गार्डन वगैरे मस्त आहे..” प्रतिक म्हणाला..
“हां.. एकदम हाय फाय नाहीये.. पण प्रसन्न आहे.. मुळात घर प्रशस्त आहे..”
“ टू बेडरूम किचन ना सर..” पंकज म्हणाला..
“हो मस्त आहे घर.. मी आले न बघून.. खिडकीतून बाहेर इतका चांगला व्ह्यू आहे..” आभा म्हणाली..
“चालायचंच.. माझ्या फॅमिलीसाठी पुरेसं आहे.. मी, माझी बायको, आई आणि मुलगी.. एक मिनिट तुम्हाला माझ्या बायकोला भेटवतो.. अगं.. इकडे ये जरा..” सर बायकांच्या एका ग्रुपकडे बघत म्हणाले..
“आले आले..” त्यांच्या बायकोने वळून पाहिलं..
अदिती तिला पाहून शॉकड झाली.. ती अदितीची मावशी होती..

क्रमशः





Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४

ओलांडून जाताना... भाग - 3