ओलांडून जाताना.. भाग-१७
आता सारं काही सुरळीत
होतंय असं आकाशला वाटत होतं.. कारण आज सकाळी आभा कालच्या प्रकारावर काहीही रिअॅक्ट
न करता कॉलेजला जाण्यासाठी त्याच्या बाईकवर बसली.. आकाशने काल तिला बिचवर फिरायला
नेलं होतं.. (भाग १६) तिथे त्यांनी खूप एन्जॉय केलं पण त्यांची ती डेट संपता संपता
आकाशने माती खाल्ली होती.. त्याने आभाला चुकून अदिती अशी हाक मारली होती.. आभाने
त्यावर फार काही रिअॅक्ट केलं नाही.. पण त्याला मनातून याची भीती वाटत होती कि गेल्या
काही दिवसात त्यांचं सुधारलेलं नातं यामुळे पुन्हा बिघडणार तर नाही ना.. पण तसं
काहीही झालेलं नाहीये याची आकाशला खात्री पटली जेव्हा त्याने सकाळी आभाला त्याच्या
बाईकजवळ थांबलेलं पाहिलं..
“आभा.. तू.. इथे का थांबलीस.. फोन
करायचास ना.. मी लगेच उतरलो असतो खाली..” आकाशने तिला पाहून घाईघाईत बाईकच्या
दिशेने येत म्हंटल..
“अरे आत्ताच आलेय मी.. डोंट वरी..”
तो एव्हाना फडकं घेवून बाईकची सीट पुसू लागला..
“किती उशीर करतोस आकाश तू.. मी
केव्हाची उभी आहे इथे.. फोनपण उचलत नाहीस तू..” आभा वैतागून आकाशला म्हणाली..
“तू कशासाठी फोन करतेयस ते माहित
होतं मला.. तुझा फोन उचलला असता तर अजून लेट झाला असता..”
“आकाश तुझ रोजचं झालंय हे..
तुझ्यामुळे रोज मला लेट होतो..”
“मग जा स्वत: ट्रेनने.. एकतर लिफ्ट
द्या.. वरून यांची हि नाटकं.. बस आता का इथेच उभी राहणार आहेस..”
“आभा.. आभा..” आकाशने आभाला भानावर
आणलं.. “निघूया ना?”
“हं.. हो..” आभा बाईकवर बसली..
सहाच महिन्यांपूर्वीचा प्रसंग
आभाला नुकताच आठवला होता.. असं संभाषण त्या दोघांमध्ये वरचेवर व्हायचच.. आभाला
तेव्हा वाटायचं याला काही काळजीच नाही माझी.. आकाश तिच्याबरोबर नेह्मी तसंच वागायचा..
त्यात त्याचीही चूक नव्हती.. त्याच्यासाठी ती एक नॉर्मल मैत्रीण होती तेव्हा.. पण
आता परिस्थिती किती बदललेली दिसत होती.. प्रसंग तोच होता पण आकाश बदलला होता..
कशामुळे इतका बदल झाला होता त्याच्यात..
“काळजी??” आभाने विचारलं..
“चूक.. नाही चूक नाही अर्धवट उत्तर
असं म्हणता येईल..”
विधिशा तेलात फ्रेंच टोस्ट
करण्यासाठी ब्रेड सोडताना म्हणाली..त्या दोघी विधीशाच्या किचनमध्ये उभ्या होत्या..
आणि आकाशला आभाबद्दल स्पेशल वाटावं यासाठी कुठली फिलिंग त्याच्यात डेव्हलप करायला
हवी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आभा प्रयत्न करत होती..
“चुकीचं उत्तर.. आता म्हणजे काय?”
“ सिम्पल आहे आभा.. मित्राबद्दल
आपल्याला काळजी वाटते.. बॉयफ्रेंड बद्दलही आपल्याला काळजी वाटते..पण मग
बॉयफ्रेंडला मित्रापासून वेगळं करण्याचं काम कुठली भावना करते..”
“कुठली?”
“भीती..”
“काय.. म्हणजे आकाशला माझी भीती
वाटली पाहिजे.. असं काही करायचय आपल्याला..”
“पागल.. तुझी भीती नाही.. तुला
गमवण्याची भीती.. तू चीडशील, रागावशील, नाराज होशील याची भिती.. तिचं तुला स्पेशल
बनवेल आणि जस्ट फ्रेंड या कॅटेगरीतून तुला बाहेर काढून गर्लफ्रेंड या कॅटेगरीत
नेवून ठेवेल..”
बाईकवर बसल्या बसल्या
आभाला विधीशाची ती गोष्ट आठवली आणि तिला हसू आलं.. विधिशा काय जिनिअस आहे.. तिने
हे सगळं आधीच हेरलं होतं.. सगळं असंच होणार हे तिला बरोबर माहिती होतं.. ती नसती
तर आज हे चित्र कधीच दिसलं नसतं.. आभाने मनोमन विधीशाचे आभार मानले.. इतक्यात आकाशने
अचानक बाईकचा ब्रेक दाबला.. आभाचा तोल एकदम पुढच्या बाजूला गेला आणि ती आकाशला
धडकली..
“सॉरी.. सिग्नल अचानकच..”
“इट्स ओके..” आभा त्याला म्हणाली..
त्याने ते मुद्दाम केलेलं असलं तरीही तिला काही वावगं वाटणार नव्हतं..
लेक्चर्स आटपून आभा
ऑडीटोरीअममधे पोहोचली तेव्हा तिकडे एकच गोंधळ सुरु होता.. बऱ्याच लोकांनि एकत्र
बोलल्याचा आवाज ऑडीमधे घुमत होता.. आधी आभाला वाटलं प्रतिक आला नाहीये म्हणून सगळे
टाईमपास करतायत.. पण मुलांच्या घोळक्यात प्रतीकही होता.. त्याची आणि आभाची नजरा
नजर झाली आणि तो उठला.. तसे सगळे शांत झाले.. मघापासून ऐकू येणारा गोंगाट अचानक
बंद झाल्यामुळे सगळं अचानकच रिकामं रिकामं वाटू लागलं.. प्रतिक काहीही न बोलता
तसाच चालत आभाकडे येवू लागला..
आभाला वाटलं कि
तिच्यावर नक्कीच काहीतरी प्रॅन्क खेळली जातेय.. ते लोक असं ठरवून कुणाला न कुणाला
टार्गेट करायचे.. आभाला आज जरा उशीर झाला होता पोहोचायला म्हणून कदाचित हा प्लान
आखला गेला असेल असं आभाला वाटलं.. तिने ऑडीमधे पाहिलं.. आकाशही त्या घोळक्यात
होता.. आकाशही प्रँकचा भाग होता तर.. आभा आता जे काही होईल त्यासाठी मानसिक
दृष्ट्या तयार होती.. प्रतिक तिच्या समोर येवून उभा राहिला..
“आभा.. तुला एक महत्वाचं काम करावं
लागणार आहे..” प्रतिक अतिशय गंभीरपणे बोलत होता.. आभाला त्याची हि ट्रिक माहिती
होती.. कित्येकांना प्रतीकच्या या अभिनयाने फसून पोपट होताना तिने पाहिलं होतं..
त्यामुळे तीही तितक्याच शांतपणे म्हणाली..
“काय काम करायचय मला?”
“मला माहितीये आभा तू आधी कधी हे
केलेलं नाहीस.. पण आता आपल्या कॉलेजसाठी तुला करावं लागणार आहे”
आभाला आता हसू फुटू लागलं.. ‘कॉलेजसाठी’
हे कुठल्याही प्रँकसाठी जरा अतीच होतं.. तरी तिने स्वत:चं हसू आवरत विचारलं..
“असं काय करायचय मला?”
“आपल्या एकांकिकेत लीड रोल..”
प्रतिक म्हणाला..
हे फारच अती होत होतं.. आभा आता
हसायलाच लागली..
“ए बास.. खूप झालं.. मला माहितीये
तुम्ही बकरा बनवताय मला पण.. मी बकरा बनत नाहीये..”
सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघत
होते.. कुणीही हसत नव्हतं..
“आभा.. मस्करी नाहीये हि.. आय अॅम
सिरिअस..”
“चलचल.. तुमचा प्लान सपशेल फसलाय..
गाईज..”
तिने सगळ्यांकडे
पाहिलं.. पण कुणाच्याच चेहऱ्यावर हि मस्करी आहे याचा लवलेश नव्हता.. आभाने आकाशकडे
पाहिलं.. त्याने होकारार्थी मान हलवली.. त्याच्या चेहऱ्यावरून आभाला कळलं कि हि
मस्करी नाहीये..
“एक मिनीट.. हे तू खरच म्हणतोयस?”
“आभा.. रीदिमाला न्यूमोनिया
झालाय... डॉक्टरांनी तिला दोन आठवडे बेडरेस्ट सांगितली आहे.. ती फायनलला नाही
पर्फोर्म करू शकत..”
“पण म्हणून मी.. मी नाही करू शकत..”
“का? तुला सगळं नाटक पाठ आहे..
सगळ्या मुव्हमेंटस माहिती आहेत..”
“पण मग इतरांना पण माहिती आहे न हे
सगळं.. अस्क समवन एल्स.. मी कसं..”
“आभा प्लीज.. इथे प्रत्येक आर्टिस्टला
त्याची कामं आहेत.. त्यांच्यापैकी कुणाला शिफ्ट केलं तर त्याचा रोल कोण करणार?”
“पण मला नाही जमणार प्रतिक.. मी
कधीच केलेलं नाहीये हे..”
“इतक्या रिहर्सल केल्यायस तू आभा..
नाही जमणार काय..”
“अरे लीड रोल आहे तो.. काही छोटसं
असतं तर मी इतके आढेवेढे घेतले नसते.. पण लीड..”
“आभा..”
“खरंच नाही जमणार रे प्रतिक.. उगाच
सगळं माझ्यामुळे बिघडायला नको..”
“ठीक आहे.. नको करूस.. एकांकिकच
नको करुया आपण..” प्रतिक रागाने म्हणाला आणि ताडताड चालत बाहेर निघून गेला.. आभाने
ऑकवर्डली सगळ्यांकडे बघितलं आणि तीही प्रतीकच्या पाठोपाठ बाहेर पडली..
बाहेर पॅसेजमधे प्रतिक
सिगरेट पीत उभा होता..
“प्रतिक.. कॉलेज आहे हे.. इथे..”
प्रतीकने फक्त आभाकडे पाहिलं.. आभाला कळलं कि त्याला आता असं काहीही ऐकून घ्यायचं
नाहीये..
“प्रतिक.. चिडू नकोस तू.. पण
अक्टिंग वगैरे कधी केली नाहीये रे मी.. इट्स नॉट माय कप ऑफ टी.. हे खरच नाही जमणार
मला..”
“तूच ठरवून मोकळी झालीस? आणि
कुठल्या आधारावर? तू ते केलं नाहीएस म्हणून तुला येत नाही? असं असतं ना आभा तर
जगात कुणालाच काही जमलं नसतं.. मी रिहर्सल्स मधे पाहिलंय तुला.. मी तुला स्क्रिप्ट
वाचताना ऐकलय.. डायलॉग बोलण्याची तुझी पद्धत.. स्टेजवर तुझा वावर.. हे पाहिलंय
मी..”
“अरे पण ती रिहर्सल असते.. तिथे
स्टेजवर ऑडीयन्ससमोर मला नाही जमणार ते..”
“का? आणि हे ही तू ट्राय न करताच ठरवतेयस..
आभा डिरेक्टर आहे मी त्या एकांकिकेचा.. मला काळजी नसेल..”
“अरे पण..” आभा पुढे काही बोलायला
जाणार तोच प्रतीकने तिचे दोन्ही हात पकडले.. आभा जरा गडबडली.. प्रतिक तिच्या
डोळ्यात बघत होता..
“आभा.. माझा तुझ्यावर पूर्ण
विश्वास आहे.. तू हे करू शकतेस.. आणि तूच हे करू शकतेस.. स्वत:ला अंडरएस्टिमेट करू
नकोस.. तू एक बॅलन्सड, समजूतदार, हुशार आणि.. खूप सुंदर मुलगी आहेस.. स्वत:वर
विश्वास ठेव.. माझ्यावर विश्वास ठेव.. आपण मिळून सगळं काही व्यवस्थीत करू..”
आभा यावर काहीच बोलली नाही.. पण
तिच्या ह्रदयाचे ठोके अचानक का वाढले होते हे तिला कळलं नाही..
ऑडीमधे चाललेला गोंधळ
आभा आणि प्रतिक आत येताच थांबला.. सगळे उत्तराच्या अपेक्षेने त्याच्याकडे पाहू
लागले.. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.. दोघेही हसले..
“आभा एकांकिकेत काम करतेय..”
सगळ्या ऑडीमधे एकच जल्लोष झाला.. आकाश
तर खूप खुश दिसत होता.. कुणीतरी साऊंडसिस्टीमवर नाशिक बाजा लावला आणि सगळे नाचू
लागले.. आकाशने आभाला धरून सगळ्यांमध्ये आणलं.. तीही त्यांच्या तालात ताल मिळवून
नाचू लागली.. तिचं लक्ष प्रतीककडे गेलं.. तो सगळ्या घोळक्यापासून दूर राहून आभाला
बघत होता.. आभा आणि त्याची नजरनजर झाली.. दोघंही एकमेकांकडे पाहून छानसं हसली..
क्रमशः
Comments
Post a Comment