ओलांडून जाताना... भाग-२४
‘नाय पायला कदी.. हाय
पान्यामदि.. मला जंजिरा दाकवाल का.. हो नाखवा बोटीनं फिरवाल का..’
हळदीचा मेन कार्यक्रम उरकला होता.. आता एकंदर
धिंगाणा सुरु होणार होता.. आभाच्या कॉलेजच्या एकांकिकेचा अख्खा ग्रुप एकांकिकेचे
लेखक शशिकांत यांच्या भावाच्या हळदीला गेला होता.. आकाश, आभा आणि अदिती यांच्यात
गेले काही दिवस सुरु असलेले प्रॉब्लेम याचं ठिकाणी सॉर्टआउट करायचे असं प्रतीकने
ठरवलं होतं.. आणि बऱ्यापैकी ती गोष्ट साध्यही झाली होती..
आकाश
आणि आभा पुन्हा नॉर्मल झाले होते.. आभा अदितीशीही नॉर्मलच वागत होती.. पण अदिती
मात्र एकदम बदलून गेली होती.. खूप शांत शांत, हरवल्यासारखी झाली होती.. तिच्यातला
सगळं चार्मच निघून गेला होता.. प्रतिकला हे सारं काही कळत होतं.. पण हा त्या
तिघांचा पर्सनल इश्यू होता त्यामुळे तो त्यात पडायला मागत नव्हता..
हळदीच्या
कार्यक्रमानंतर त्या सगळ्यांनीच तिथून काढता पाय घेतला.. एकतर घरी पोहोचायला फारच
उशीर होणार होता आणि आता तिथे सुरु झालेल्या ‘दारू’ कामामुळे कुणालाच तिथे
थांबण्यात काही पॉईंट वाटत नव्हता.. सगळे शशी सरांना भेटले.. त्यांच्या मिसेसना
भेटले आणि निघाले.. जाण्याच्या आधी अदिती शशीसरांच्या मिसेस सोबत जरा जास्त रेंगाळली..
त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.. प्रतिक हे सारं पाहत होता..
अदितीला यांच्याशी असं कनेक्ट होताना पाहून त्याला खरंच आश्चर्य वाटलं.. हा
अदितीचा स्वभाव नव्हता..
ते
सगळे बिल्डींगखाली उतरले.. जाताना सगळे जसे आले होते तसेच जाणार होते.. प्रश्न होता
आभा आणि अदितीचा.. येताना आभा ट्रेनने आली होती.. आणि अदिती ज्या मैत्रिणीच्या
गाडीने आली होती तिला लवकर निघायचं असल्यामुळे अदितीसमोर आता परत कसं जायचं हा
प्रश्न होता.. येताना प्रतिकसोबत पंकजच आला होता.. त्यामुळे प्रतिक दोघींना
सोडायला तयार होता.. अदिती त्याच्यासोबत जायला तयार झाली.. आकाश बाईक घेवून आला
होता.. आभा आपल्यासोबत यावी असं त्याला वाटत होतं.. आज त्यांच्यात जे बोलणं झालं
होतं त्यानंतर ती आपल्यासोबतच येईल याची त्याला खात्री होती.. आभा त्याच्या
बाईकजवळ आली तसा आकाश निघायला तयार झाला..
“आकाश..
मी प्रतिकच्या गाडीने जातेय..” आकाशने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं.. त्याच्या
चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून आभाला त्याच्या मनात काय वादळ चाललय ते जाणवलं.. “तू
विचार करतोयस तसं काही नाहीये..” ती हसून म्हणाली.. “आजच केस सेट केलेयत.. बाईकने
एवढ्या प्रवासात सगळे बिघडून जातील.. आणि तुला तर माहितीये मग उद्या माझा किती
वेळ..”
“नाही..
इट्स ओके..” आभाने त्याच्या हातावर आपला हात ठेवला..
“खरंच
ओके आहे ना..” आकाशने खुणेनेच होकार दिला आणि हसला.. आभाही हसली आणि प्रतीकच्या
गाडीकडे निघाली.. गाडीच्या मागच्या सीटवरून अदिती हे सगळं पाहत होती.. हळदीच्या
कार्यक्रमातही बराचवेळ आभा आणि आकाश असेच एका कोपऱ्यात उभं राहून बोलत होते.. आभा
आली आणि गाडीचा मागचा दरवाजा उघडून अदितीच्या शेजारीच बसली..
“सॉरी
प्रतिक.. चला..” बसता बसता ती म्हणाली तशी प्रतीकने गाडी स्टार्ट केली आणि ते
निघाले.. त्यांच्या गाडीसोबतच आकाशने आपली बाईक पळवली..
आकाश
गाडीच्या टप्प्यातच राहून बाईक चालवत होता.. मध्येच आभाज्या खिडकीशी बसली होती
त्या खिडकीच्या अगदी जवळ तो गाडी न्यायचा.. मग आभा आणि त्याची नजरानजर व्हायची..
मग पुन्हा आयदर तो पुढे निगुन जायचा किंवा मग मागे रहायचा.. आभा त्याच्याकडे पाहून
हसत होती.. आज हळदीच्या कार्यक्रमादरम्यान जे घडलं होतं त्याने ती खूष होती.. पण
जे घडलं त्याबद्दल पूर्ण विचार केल्याशिवाय आता तिचं मन शांत होणार नव्हतं..
आभाला
हळदीच्या गोंधळात आईचा फोन आला होता.. तिथे इतका गोंगाट सुरु होता कि काहीहि ऐकू
येत नव्हतं.. आभा लोकांच्या गर्दीतून वाट काढत गच्चीच्या एका कोपऱ्यात गेली.. आईला
ती थोड्याच वेळात निघतेय इतकंच तिला सांगायचं होतं.. आईशी बोलून झालं आणि ती वळली
तेव्हा समोर आकाश उभा होता.. त्याला तिथे अचानक उभं पाहून ती जरा दचकली.. पण मग
त्याच्याकडे पाहून तिला हसूच आलं.. तो चेहऱ्यावर इतके ऑकवर्ड भाव घेवून उभा होता
कि त्याला पाहून कुणी हसू थांबवूच शकलं नसतं.. आभा अशी अचानक हसू लागली हे पाहून
त्यालाही आश्चर्य वाटलं..
“हसतेस
काय?”
“मग
काय करू? तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन आहे.. भीती आहे.. कि अजून काय आहे काहीही कळत
नाहीये..” ती पुन्हा हसू लागली..
“इथे
माझी कंप्लीट फाटलीये आणि तुला हसू येतय.. आभा.. एवढं सारं घडल्यावरहि तू इतकी कुल
कशी राहू शकतेस?”
“कारण
कुणीतरी समजावलय मला.. जे झालं ते बदलू शकत नाही.. जे आपले आहेत ते समजून घेतील..
जे नाही समजून घेणार ते आपले नाहीत..”
“प्रतिक?”
आभाने होकारार्थी मान हलवली.. “सॉलिड आहे तो.. मला पण हीच गोळी चारली त्याने पण
माझ्यावर नाही असर झाला..”
“तू
कॉलेजचा डान्सिंग स्टार आहेस.. तुला इमेजची पडलेली असणारच..”
“माझी
इमेज गेली भो..” तो बोलता बोलता थांबला.. “सॉरी.. पण इमेजच काही पडलेलं नाही गं
मला.. इट्स.. इट्स ऑल अबाउट यु.. मला तुझं टेन्शन होतं.. सॉरी आभा जे काही
फार्महाउसवर घडलं..”
“अरे..
अजब आहे.. इथे आपलं ठरलेलं सिक्रेट मी लिक केलं.. तमाशा झाला त्यामुळे.. आणि सॉरी
तू म्हणतोयस..”
“ते
आता माझ्यासाठी महत्वाचं नाही राहिलय आभा.. तो सगळा मूर्खपणा होता.. नीट विचार
केल्यावर तू जे केलंस त्यात काहीच चुकीचं वाटत नाही मला पण मी तिथे तुझ्याशी जे
वागलो दॅट वॉज राँग.. मी आपल्या क्लोजनेसचा गैरफायदा घ्यायला गेलो.. आणि ते
सगळं.....”
“आकाश..
ओके.. थोडा मुर्खपणा तू केलास.. थोडा मी केला.. कान्ट वी जस्ट मूव्हऑन?” आकाशने
आभाकडे पाहिलं.. कधी कधी योग्य व्यक्ती आपल्या किती जवळ असते.. पण आपण भलतीकडेच
भरकटत असतो.. पण आता आपण भरकटायचं नाहीये हे आकाशने ठरवून टाकलं होतं.. तो आज
आभाला प्रपोज करणार होता..
“आभा..
मला.. तुला काहीतरी विचारायचं आहे..” आभा गालातल्या गालात हसली..
“आकाश..
मला माहितीए तू काय विचारणार आहेस..”
“काय?”
“आकाश..
मुलींना कळतं मुलं जेव्हा त्यांना विचारणार असतात..”
आकाशला
या गोष्टीचं खरच आश्चर्य वाटत होतं.. आधी अदितीनेही तिच्या बर्थडे पार्टीच्या वेळी
असंच ओळखलं होतं आणि आता आभानेही..
“पण
मग जर तू ओळखलंच आहेस.. तर उत्तरही सांग..” आकाशच्या या वाक्यावर आभा हसली..
“कुणाची
तरी हळद सुरु आहे.. कुठली तरी विअर्ड गाणी लागली आहेत.. गच्चीचा एक कोपरा आहे..
जिथे बऱ्याच वेस्ट वस्तू पडल्यायत.. माझ्या आयुष्यातल्या इतक्या मोठ्या गोष्टीचं
उत्तर मी अशा ठिकाणी कसं देवू आकाश.. तो क्षण थोडा तरी स्पेशल वाटायला हवा ना..”
“मग
उद्या बाहेर जावूया कुठेतरी.. बिच ऑर समथिंग..”
“उद्यापासून
रिहर्सल्स आहेत आकाश...”
“रिहर्सल्स
नंतर..”
“आकाश..
सवाईसाठी फार थोडा वेळ राहिलाय.. आधीच आपण इतका गोंधळ घालून सगळ्या ग्रुपला
डिस्टर्ब केलं आहे.. आधी हे सॉर्टआउट करू.. मग आपलं..”
“ठीक
आहे.. सवाईचा प्रयोग संपला कि लगेच.. थियेटरच्या बाहेरच.. मी तुला भेटेन..”
“आकाश?”
“प्लीज
आभा.. प्लीज..”
“ओके..”
आभाचे गाल लाल झाले होते.. तो ब्लश करत होती.. ती आकाशकडे पाहून हसली आणि तिथून
निघाली.. पण आकाशने जाण्याआधीच तिला थांबवलं..
“आभा..
पण होकारच देशील ना..”
आभाने
वळून त्याच्याकडे पाहिलं.. हसली आणि काही उत्तर न देता तिथून निघाली..
आता
गाडीत बसून तो प्रसंग आठवूनही आभाला गुदगुल्या होत होत्या.. तिने आकाशकडे पाहिलं
पण तो तिला दिसत नव्हता.. आभा खूप एक्सायटेड होती.. एका अर्थाने विधीशाचा प्लान
पूर्णपणे यशस्वी झालं होता.. ज्या मुलाने महिन्याभरापूर्वी तिला नकार दिला होता तो
आज तिचा होकार मिळावा म्हणून आतुर होता.. आभाच उत्तर ठरलेलं होतं.. त्यासाठी तर ती
इतकं अंतर पार करून इथवर आली होती.. आज ती खूप खूष होती..
तिच्या
शेजारी बसलेल्या अदितीच्या मनात मात्र वेगळंच वादळ सुरु होतं... आज पर्यंत तिच्या
आईने तिची जी मावशी तिच्या समोर उभी केली होती आज तिचं एक वेगळंच रूप अदितीसमोर
उभं राहिलं होतं.. एका लूजर कवीशी लव्हमॅरेज केलेली.. दहा बाय दहाच्या खोलीत आपला नवरा,
सासू आणि दिरासोबत राहणारी.. अदितीच्या मॉम कडून पैसे उसने घेणारी.. तिचे वापरलेले
ड्रेस वापरणारी.. दुखी: आयुष्याला वैतागलेली मावशी तिच्या मॉम ने तिच्यासमोर उभी
केली होती... पण हि मावशी तर तशी नव्हती..
त्या
दोघी समोरासमोर आल्या तेव्हा मावशी तिच्याकडे पाहून छानसं हसली होती.. पण ओळखीची
बाकी कुठलीच खूण तिने दाखवली नाही.. ग्रुप मधल्या इतर सगळ्यांना भेटली तशीच
अदितीला भेटली.. हीच आपली मावशी आहे का हा प्रश्न अदितीला पडावा इतकं तिचं वागणं
वेगळं होतं.. पण तिचं अदितीची मावशी होती.. छान शेवाळी रंगाची, जरी काठाची साडी
नेसलेली.. हसरी.. आनंदी.. अदिती पुढचा संपूर्ण वेळ तिच्याकडेच पाहत होती..
तिची
एकच लगबग सुरु होती.. आजची ती होस्ट होती त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी लोक तिलाच
विचारत होते.. ती हसत सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होती.. लोकांना भेटत
होती.. शशिकांतसर आवर्जून तिला बोलवत होते.. त्यांच्या गेस्टशी तिची ओळख करून देत
होते.. इतक्या साऱ्या लगबगीतहि तिच्या आणि शशिकांत सरांमध्ये असलेलं गोड नातं
दिसून येत होतं.. त्यांनी कुठल्याही छोट्याशा गोष्टीसाठीहि तिला जावून विचारणं..
तिने त्यांच्या शेजारून जाताजाता मागून त्यांचा कुर्ता ठीक करणं.. या गर्दीतही मधे
मधे त्यांनी एकमेकांकडे पाहून डोळ्यांनीच बोलणं.. अदिती हे सारं पाहत होती.. मावशीच्या
चेहऱ्यावरचं हसू.. नवर्याबद्दल तिच्या डोळ्यात दिसणारा अभिमान.. तिचं विरारला का
असेना पण हक्कच असं टू बेडरूमचं घर.. हे सारं आज पर्यत अदितीला वाटत असलेले
मावशीबद्दलचे सगळे समज खोडून काढत होता..
हळदीची
मेन सेरेमनी सुरु करायची असं ठरलं आणि मावशी लगबगीने राहिलेली काहीतरी गोष्ट
घेण्यासाठी लगबगीने खाली निघाली.. अदितीच्या मनात काहीतरी आलं.. तीही तिच्या
पाठोपाठ गेली.. शशिकांत सरांचं गर टॉप फ्लोरवरचं होतं.. मावशी लगबगीने एका घरात
शिरली.. अदितीने ते पाहिलं.. ती त्या घराच्या दारात येवून उभी राहिली.. तिने
दारातून घर न्याहाळल.. साधी पण नेटकी सजावट केलेली होती... अदितीने जरा विचार केला
आणि तिने घराच्या आत पाउल टाकलं..
मावशी
किचनमध्ये एक पाण्याची कळशी नळाखाली लावून ती भरण्याची वाट बघत उभी होती.. अदिती
तिच्या मागे येवून उभी राहिली..
“मावशी..”
तिने दचकून मागे पाहिलं.. “ओळखलं नाहीस मला.. मी अदिती..” मावशीने तिच्याकडे हसून
पाहिलं..
“आत्ता
आत्ताच तर भेटले होते.. कशी विसरेन..”
“मग..
वर..?”
“अदिती..
तुला ऑकवर्ड वाटायला नको म्हणून टाळलं..”
“मला
का ऑकवर्ड?”
“असंच..
जावू दे..” ती हसून वळली आणि कळशीचा नळ बंद करून तिने ती कळशी बाजूला ठेवली आणि
दुसरी नळाखाली लावली..
“मावशी..
मागच्या वेळी मी जिथे आले होते.. ते..”
“ते
घरही माझंच.. आता दीर राहणार तिथे.. आधी आम्ही सगळे रहायचो.. लग्नानंतरची सात वर्ष
तिथे काढली.. मग इथे..”
“पण
म्हणजे मी जेव्हा तुला भेटले होते त्या घरात तेव्हा खरं तर तू..”
“इथे
रहायचे.. तुझ्या आईने सांगितलं भाईंदर जवळ पडतं.. म्हणून तिथे आले होते मी..”
अदितीसाठी
हा खूप मोठं शॉक होता.. म्हणजे जेव्हा आईने अदितीला मावशीच्या आर्थिक
परिस्थितीबद्दल ते सांगितलं होतं तेव्हा खरं तर ती चांगल्या फ्लॅटमध्ये राहत
होती.. अदिती काहीच न बोलता तसाच विचार करत उभी राहिली..
“तू
काय विचार करतेयस ते कळतय मला..” मावशीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हंटल.. “मी
तुझ्या आईला चांगलं ओळखते.. तिने जेव्हा मला तिथे भेटायला बोलावलं तेव्हाच मी
समजून गेले होते गं सगळं.. म्हणून यांना सांगितलं.. पोरीच्या कॉलेजमध्ये जाताय
तिला तुम्ही कोण आहात ते कळू देवू नका.. पण बघ.. आज अखेर आलोच समोरसमोर..”
मावशीने
दुसरी कळशी नळाखालुन काढली आणि नल बंद केला.. अदिती मात्र आता पूर्णपणे कन्फ्युज झाली
होती.. तिच्या मॉमने तिला जे काही सांगितलं होतं त्याचा काय अर्थ होता.. जी कथा
खरी मानून तिने आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय घेतला होता ती कथाच खोटी होती..
“मावशी..
आई तुला मधून मधून खरंच चेक पाठवायची का?”
“अदिती..
पुन्हा कधीतरी बोलू.. चल आता..”
“मावशी
प्लीज..” मावशीचा नाईलाजच झाला.. पण खरं तर तिलाही खरं काय आहे ते अदितीला कलावं
असं वाटतच होतं..
“हो..
पण माझे हे तुझ्या वडिलांच्या कंपनीसाठी जिंगल लिहायचे.. ते त्याचे असायचे..”
“आणि
ते जुने कपडे”
“ते
माझ्या एन.जी.ओ.साठी.. जिथे मी काम करते..”
अदिती
या साऱ्यामुळे अजूनच खचत चालली होती.. तिच्या आईने हे काय केलं होतं.. हे एवढं
नाटक उभं करायची तिला काय गरज होती.. अदिती शॉकड होती.. तिच्या मावशीने ते ओळखलं..
अदितीच्या आईने काय केलंय हेही ती पूर्णपणे जाणून होती..
“हे
बघ बेटा.. तुझ्या आईची पद्धत चुकलिये.. पण तिचं इंटेन्शन वाईट नसणार.. मी प्रेमात
पडून एक निर्णय घेतला.. सात वर्ष त्या छोट्याशा खोलीत काढली.. गरीबी पाहिली..
अॅटजेस्टमेंट केली.. पण माझ्या नवऱ्यामुळे माझं निभावून गेलं.. पण.. तुझ्या आईला
तुझी काळजी वाटली तर त्यात काहीही वावगं नाहीये..”
“पण
इतकी वर्ष तू आनंदीच होतीस न मावशी.. पण मग मला हे का सांगितलं गेलं कि तू दु:खी
आहेस.. तुझं तुझ्या नवऱ्याशी पटत नाही..”
“अदिती..
काही गोष्टी मुलांच्या मनावर खोलवर रुजाव्यात म्हणून आई वडिलांना कधी कधी खोटं
बोलावं लागतं..”
“इतकं..
मला सांगितलं गेलं लग्नानंतर प्रेम संपत.. पैसा नसेल तर नात्यातला चार्म निघून
जातो.. जेव्हा आमच्या एकांकिकेची स्क्रिप्ट आईला ऐकवली ना मी.. लैला आणि मजनूचं लग्न
होतं आणि मग आर्थिक गोष्टीनवरून वाद होवून ते वेगळे होतात.. तेव्हा आई म्हणाली
होती.. हे अगदी तुझ्या मावशीच्या लाईफवर लिहिलेलं स्क्रिप्ट आहे..”
“चूक..
हे खरं तर तुझ्या मॉम आणि डॅडवरून इन्स्पायर होवून लिहिलेलं स्क्रिप्ट आहे..”
अदिती
आणि मावशीने वळून पाहिलं.. दारात शशिकांत उभा होता..
“अहो..
काय हे.. चला वर.. उशीर होतोय..” मावशी लगबगीने त्यांच्याकडे जात म्हणाली..
“थांब..
हिच्या बाबतीत खूप उशीर होण्याआधी हिला काही गोष्टी कळायला हव्यात.. तिचा हक्क आहे
ते जाणून घ्यायचा..”
अदितीच्या
चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसू लागलं.. शशिकांत अजून असं काय सांगणार होता जे तिला
माहित नव्हतं.. पण माहित असायला हवं होतं..
क्रमशः
Comments
Post a Comment