ओलांडून जाताना.. भाग-८...
संध्याकाळी कॉलेजचा कट्टा सामसूम झाला होता.. पूर्वी जशी
रेलचेल असायची तशी आता नसते असं कॉलेजचे एक्स स्टुडन्टस, शिपाई, बाहेरचे फेरीवाले
वगैरे सांगायचे.. मुलांकडे गप्पा मारायला मोबाईल इंटरनेट आले.. टाईमपास करायला मॉल
आले.. तसे कट्टे शांत झाले.. काही घोळके सोडल्यास आता फारसं कुणी नव्हतं तिथे.. पण
कॉलेज जवळच्या दुर्गा परमेश्वरी मधे मात्र मस्त ग्रुप जमला होता.. एकमेकांना
टाळ्या देत पोरांचा एक घोळका सगळ्याचं लक्ष वेधून घेत होता..
त्याच घोळक्यात आभा बसली होती.. ठरल्याप्रमाणे कपल्स
पिकनिकच प्लानिंग करायला आकाशचा सगळा डान्स ग्रुप भेटला होता.. त्यात अदिती आणि
तिचा Boyfriend सोहमही होता.. अदितीच्या वाढदिवसाच्या वेळी जे झालं होतं (भाग ५) त्याचा
परिणाम म्हणून आकाशला आज त्याच्या Girlfriendला घेवून इथे यायचं होतं.. आणि
म्हणूनच आभा इथे आली होती..
ती पहिल्यांदाच या ग्रुप मधे बसत होती.. या मुलांना ती ओळखत
होती.. यांना आधी पाहिलंही होतं.. आकाशच्या तोंडून यांच्या बद्दल ऐकलं होतं..
कॉलेजचा activity ग्रुप होता हा.. यांना कोण नाही ओळखणार.. पण आभा काही क्षणात
त्यांच्यासोबत जेल झाली.. सगळ्यांच्या कॉमेंट्स तिला कळत होत्या.. त्यावर तीही खूप
इंटरेस्टिंग कमेंट्स पास करत होती.. सगळे हसत होते.. अभाला हाय फाय दिल्या जात
होत्या.. आभा जणू कित्येक वर्ष या ग्रुपचा भाग आहे असं बघणाऱ्या कुणालाही वाटलं
असत इतक्या लेव्हलला ग्रुप मधले सगळे तिच्यासोबत जेल झाले होते.. पण या सगळ्यात
दोन लोक मात्र अतिशय अलिप्त असल्याचं जाणवत होतं..
त्यातला एक होता आकाश.. त्याला आभाच प्रचंड आश्चर्य वाटत
होतं.. एक मुलगा तिने प्रपोज केल्यावर नकार देतो.. आणि त्याच्या दुसर्याच दिवशी
येवून तिला आपली Girlfrind बनण्याचं नाटक करण्याची विनंती करतो अशा वेळी मदत
करायला जाणाऱ्या किती मुली असतील.. त्यातही त्याला जास्त आश्चर्य याचं वाटत होतं
याचं कि परिस्थिती इतकी ऑकवर्ड असताना तिचा वावर इतका स्वाभाविक कसा.. इतकं मनमोकळ
हसणं.. चेहऱ्यावर काहीही न दाखवता आदितीसमोर इतक्या सहजपणे वावरणं.. आभाचं हे रूप
तो पहिल्यांदाच पाहत होता.. कधी कधी अल्लडपणात एक प्रकारची मॅच्युरीटी दडलेली असते..
आपण त्या माणसाच हसणं, मस्करी करणं पाहतो पण त्याच्या मनात काय वादळ चाललय याची
आपल्याला कधीच कल्पना येत नाही.. आभाकडे पाहूनही याची कल्पना कुणाला आली नसती.. पण
आकाशला ती येत होती.. कारण तोच तिच्या मनातलं वादळ होता..
जी दुसरी व्यक्ती तिथे अस्वस्थ होती ती म्हणजे अदिती.. आकाशच्या
आयुष्यात दुसरी कुणी मुलगी नाहीच याबद्दल ती ठाम होती.. आकाशच्या नजरेत तिने ते
वाचलं होतं.. आकाशची नजर.. आपल्याकडे असं पाहणारा जगात एक व्यक्ती असावा असं
प्रत्येक मुलीला वाटतं.. आकाश आदितीकडे तसाच बघायचा.. त्याची नजर तिच्या नजरेत
रोखलेली असायची.. जणू तो नजरेतून तिच्या मनाचा ठाव घेतोय..
कॉलेजमध्ये अडमिशन घेतलं त्याच वर्षी हि नजर तिच्या ओळखीची
झाली होती..पण आपल्यावरती रोखणाऱ्या अनेक नजरांपैकी हि एक असं मानून अदिती त्या
नजरेला टाळू शकली नाही.. त्या नजरेत काहीतरी खास होतं.. ती नजर तिला ऑकवर्ड करत
नव्हती.. तिला चॅलेंजहि करत नव्हती.. ती तिला बोलवत होती.. हळू आवाजात..
त्याच्या नकळत अदिती त्याच्यावर लक्ष ठेवून होती.. मुलींना
हि दैवी देणगीच असते म्हणा.. मुलांकडे त्याही बघत असतात.. चेक आउट करत असतात.. पण
आयुष्य खर्च केलं तरी मुलांना त्याचा पत्ता लागत नाही.. अदितीने त्याच दैवी
देणगीचा वापर करून त्या नजरेबाद्द्ल माहिती काढली.. आर्टसचा स्टुडन्ट.. एक
मध्यमवर्गीय घरातला मुलगा.. आकाश..
आर्टसचा स्टुडन्ट, मध्यमवर्गीय घर, हे कळताच आदितीने त्या
नावावर काट मारायची ठरवली.. ती सायन्सला.. डॉक्टर बनायचं ध्येय तिचं.. तिने तुलना
केली आणि तिच्या ठोकताळ्यामध्ये आकाश बसत नाही हे तिला जाणावल..
लहानपणापासून तिच्या आईने तिला तसच घडवलं होतं.. अदिती नववीत
गेली आणि आईने तिला कानमंत्र दिला.. प्रेम कर.. पण स्टेटस जप.. आयुष्याच्या गणितात
प्रेमाची पायरी खूप फसवी असते.. ती पायरी चुकलीस तर पुढचं सार गणित चुकणार.. आणि
उत्तर नेहमीच शून्य येणार.. आदितीसमोर तिच्या मावशीचं उदाहरण होतं.. कुणा वक
तरुणाच्या कवितांच्या प्रेमात पडून तिने त्याच्याशी लग्न केलं होतं.. आता कुठे तरी
भाइंदरच्या चाळीत राहत होती.. आईने अदितीला मुद्दाम मावशीकडे नेलं होतं.. आयुष्यात
पहिल्यांदा आणि शेवटच.. घरी मावशी.. तिची दोन लहान मुलं.. दीर आणि सासू.. मावशीचा
नवरा घरी नव्हता त्या दिवशी.. तरी घर गजबजलेलं होतं.. दादरच्या फ्लॅटमधून आलेल्या
अदितीला त्या दहा बाय दहाच्या खोलीतलं जीवन आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा होता..आणि
तो धडा अदितीला आयुष्यभर लक्षात राहणार होता..
अदितीने आकाशच्या नजरेपासून नजर फिरवायची ठरवली पण आकाशच्या
नजरेने तिची पाठ सोडली नाही.. पुढच्या वर्षी तो जोमाने कामाला लागल्याचं जाणवत
होतं.. अदितीला पहिल्याच वर्षी कॉलेजच्या डान्स ग्रुप मध्ये निवडलं होतं.. एकंदरच कल्चरल
activities मधे ती पुढेच असायची.. आता आकाशही तिथे शिरण्यासाठी प्रयत्न करू लागला
होता.. हे सार अदितीसाठी चाललाय हे न कळण्याइतकी अदिती बावळट नव्हतीच.. ऑडिशन हॉल
मध्ये आल्यापासून रिजेक्ट होवून बाहेर जायीपर्यंत त्याची नजर तिच्यावर खिळलेली
असायची.. तो चुकत होता.. रिजेक्ट होत होता.. पण हरत नव्हता.. आणि मग डान्ससाठी
त्याचं सिलेक्शन झालं..
काय नाचायचा तो.. अदितीला सोहमची आठवण आली.. तिच्या डान्स
क्लासमधे असणारा सोहम.. तिच्यापेक्षा मोठा होता थोडा.. तिच्यावर वेड्यासारखं प्रेम
करायचा.. दोन वेळा प्रपोजही केलं होतं त्याने.. त्याच्या नजरेत ती बात नव्हती जी
आकाशच्या नजरेत होती.. असं वाटायचं कि त्या नजरेत हरवून जावं.. त्याने तसचं
आपल्याकडे पहात राहवं.. काळ वेळेची बंधनं विसरून..
आकाश सोहम सारखा नाचायचा का? नाही.. सोहमचा डान्स हा कदाचित
टेक्निकली परफेक्ट असेल पण आकाशच्या डान्समध्ये एक आग होती.. तो लोकांसाठी नाचतोय
असं कधीच वाटायचं नाही.. ऑडिशनचा अख्खा डान्स त्याने अदितीच्या डोळ्यात डोळे घालून
केला होता.. अदितीला तेव्हाच कळल होतं.. तो कुणासाठी नाचतोय ते...
आकाश ग्रुपमध्ये आला आणि सगळ्यांचा लाडका झाला.. अदिती मात्र
त्याच्याशी अंतर ठेवून होती.. कठीण होतं तिच्यासाठी.. पण तिच्या आईने शिकवलेला धडा
तिला तसच करायला भाग पडत होता.. पण नियतीलाच ते मंजूर नव्हतं कदाचित.. एका ग्रुप डान्ससाठी
त्यांच्या कोरिओग्राफरने त्या दोघांची पेअर केली आणि सगळं बदललं.. तो साल्सा
performance होता.. क्लोज आणि इंटेन्स..
त्या डान्ससाठी उचललेलं प्रत्येक पाउल अदितीला खूप पुढे नेत
होतं.. डान्समधली ती जवळीक.. आकाशचा तिला होणारा स्पर्श.. नजरेत नजर रोखून पाहताना
होणारे ते संवाद.. धावत येवून त्याच्या मिठीत स्वत:ला झोकून देणं.. अदितीसाठी ते
सार अशक्य होतं.. आधीही तिने साल्सा अनेकदा केला होता.. पण हे काहीतरी वेगळच
होतं.. भीती वाटावी असं.. तरीही प्रचंड हवंहवंस..
या सगळ्या प्रोसेसमधे अदितीला आकाशबद्दल अजून जास्त आकर्षण वाटण्याच
अजून एक कारण होतं.. डान्समधल्या या साऱ्या जवळकीचा त्याने कुठल्याही अर्थाने गैरफायदा
घेतला नव्हता.. डान्स दरम्यान तिच्या शरीराला होणाऱ्या त्याच्या स्पर्शांपैकी एकही
स्पर्श तिला कधीच खटकला नाही.. त्याची नजर तिच्या नजरेपासून कधी वेगळी झाली नाही..
अदिती आकाशला जितकं समजून घेत होती तितकंच मागे फिरणं तिच्यासाठी अवघड होत होतं..
तिने त्यादरम्यान आकाशसोबत न बोलण्याचे, त्याला टाळण्याचे
अनेक प्रयत्न केले.. पण आता ते तिच्यासाठीच शक्य नव्हतं.. एक मन तिला दूर राहायला
सांगत होतं तर दुसरं त्याच दिशेला ओढून नेत होतं.. या द्वंद्वात आकाशची नजर
जिंकली.. तिने अदितीला त्याच्याकडे खेचून आणलं.. ग्रुप मधल्या कुणासोबतही झाली
नव्हती इतकी ती आकाशसोबत क्लोज झाली.. पण आता तिला त्याची चिंता वाटेनाशी झाली
होती.. प्रेमात ती आणि तिची सगळी गणितं हरवून गेली होती.. वाहून गेली होती.. अदितीला
या वाहून जाण्यात मजा वाटत होती..
सल्साचा फायनलचा performance तर सगळ्यात इंटेन्स झाला
होता.. सगळ्यांनी डोक्यावर घेतला होता.. फेस्ट गाजवलं त्या performanceने आणि
सगळीकडे चर्चा होती आकाश आणि अदितीच्या जोडीची.. अदितीचे आई बाबाही बघायला आले
होते.. त्यांनाही तो performance खूप आवडला.. बाबांनी तर अदितीच्या वाढदिवसाचं
इन्विटेशन दिलं सगळ्यांना.. अदिती खूप खूष होती.. पण हि खुशी फार काळ टिकली नाही..
अदिती घरी आली आणि हॉलमधेच आईने तिचं स्वागत केलं..
“बेबी.. I am so Proud of you.. You did fantastic job!”
“thanks mom..”
“आणि तुझ्या बरोबरच तो मुलगा.. काय नाव त्याचं?”
“आकाश..”
“Right.. आकाश.. great dancer ha he is.. छान दिसत होती
तुमची जोडी.. डान्सपुरती..”
अदितीच्या चेहऱ्यावरचं हसू मावळल.. तिच्या आईला सगळं
जाणवलंय हे कळायला कुठल्या ज्योतिषाची गरज नव्हती..
“Very talented boy he is i must say.. Art student right?”
अदितीने होकारार्थी मान हलवली..
“मिडलक्लास फॅमिली.. पण आता देव ऐपत बघून टॅलेंट थोडीच
देतो.. काय?”
अदितीची आई हसून नॉर्मलीचं बोलत होती.. पण अदितीच्या घशाला
कोरड पडली होती.. तिचे पायही थरथरु लागले होते..
“सोड.. मी पण काय बोलत बसले तुझ्याशी.. थकली असशील ना..
जा.. फ्रेश हो.. गो..”
अदितीने आवंढा गिळला.. आणि ती रूमकडे जायला निघाली..
“एक मिनिट अदिती..” अदिती जागची थांबली.. आता काय ऐकायला
लागतय या विचारानेच तीच काळीज जोरजोरात धडधडू लागलं होतं.. “जरा चेकबुक आणतेस
माझं.. तुझ्या मावशीचा Poet नवरा पुन्हा एकदा Bankrupt झालाय.. तिच्या लव्ह
मॅरेजची किंमत पुन्हा एकदा आपल्यालाच भरायची आहे..”
अदितीने होकार दिला.. आणि ती चेकबुक घ्यायला निघाली.. पण
तिला हे कळल होतं कि आईच्या या सगळ्या बोलण्याचा अर्थ काय आहे.. अदितीने या
सार्याचा धसका घेतला..
अदितीने आकाशपासून दूर होणं गरजेचं होतं पण शक्य नव्हतं..
आपण इतक्या पुढे निघून आलो याचा आता तिला पश्चाताप होत होता.. आकाशपासून तिला दूर
करू शकेल असं काहीतरी तिला हवं होतं.. आणि ते तिला अचानक मिळालं.. तिला सोहमने
पुन्हा एकदा प्रपोज केलं.. सोहम श्रीमंत घरातला होता.. त्याचे आणि अदितीचे आई वडील
एकमेकांचे मित्र होते.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो तिला आकाशपासून डायवर्ट
व्हायला मदत करू शकत होता.. तिने त्याला होकार दिला.. पण मनात कुठेतरी काहीतरी सलत
होतं.. आणि आभाला समोर बसलेलं बघून ती सल अधिकच वाढली होती..
अदितीला हेच कळत नव्हतं कि तिचं काय चुकलं होतं.. ती आकाशला
ओळखायलाच चुकली होती.. का त्याचं कधीच तिच्यावर प्रेम नव्हतं.. का तो दोन्ही
दगडांवर पाय ठेवायला बघत होता.. कुठल्याही दुसऱ्या टिपिकल मुलासारखा.. अदितीला
कशाचीच टोटल लागत नव्हती..
“अदिती.. अदिती..” सोहमने विचारात हरवलेल्या अदितीला भानावर
आणलं.. “काय मॅडम.. लक्ष कुठेय? कॉफी थंड झाली.. आदि.. ठीक आहे ना सगळ..”
“अ.. हो..”
अदिती कसंनुस हसली.. तिथे आभा आणि आकाश एकाच कपातून कॉफी
पीत होते..
“thanks alot आभा..” आकाश आणि आभा सोसायटी जवळच आले होते..
आकाशने रस्त्यातच बाईक थांबवली आणि आभाचा हात पकडला.. “तू आज जे केलयस ते खरच खूप
मोठं आहे..”
आभाने अलगत आपला हात सोडवून घेतला..
“तूच म्हणाला होतास ना.. आपण चांगले मित्र होवून राहूया..
चांगले मित्र एकमेकांसाठी एवढं तर करूच शकतात ना?” आकाशला पुन्हा गिल्टी वाटू
लागलं.. आभाने ते ओळखलं.. “हा टोमणा नाहीये आकाश खरच सांगतेय मी..”
“नाही.. तू.. तू काहीही बोललीस तरी मान्य आहे मला.. मी खूप
चुकलोय.. तू इतकं करत आलीस माझ्यासाठी.. सतत माझी साथ दिलीस.. माझ्या आवडी निवडी
समजून घेतल्यास.. तू टिफिन आणायचीस ना..” आकाश इमोशनल झालं होता.. आभाने त्याचं
वाक्य मध्येच तोडलं..
“आकाश.. ते करायला मला आवडत होतं म्हणून मी ते केलं.. माझा
स्वार्थ होता असं समज.. इतना दिल से लगाने कि जरुरत नाही है..”
“आभा तू खरच ग्रेट आहेस.. मी आत्तापर्यंत तुला असं पहिलच
नव्हतं.. पण आता वाटतय..” त्याने एक छोटासा पॉज घेतला.. “आभा.. म्हणजे.. मला खरच
आवडेल आपल्या नात्याला पुन्हा एक चान्स द्यायला.. अदितीचा chapter आता क्लोज करून
तुझ्या सोबत नवीन..”
“एक मिनिट आकाश.. आपण ठरवलं आहे ना कि आपण मित्र रहायचं..
मग ठरवल्या प्रमाणे वागुया ना..” आकाशला तिचं असं बोलणं खरच अनपेक्षित होतं.. “मी
तुला विसरलेय असं नाही म्हणणार मी.. पण आता असं होईल असं नाही वाटत..”
“आभा.. मला माहितीये तू रागावली..”
“रागावले नाहीये मी.. पण खरं काय आहे ते कळलंय मला.. मला
तुझ्याकडून एक वाचन हवय आकाश..” आकाशला हि काय बोलतेय काहीच कळत नव्हतं.. “आकाश
प्रॉमिस मी.. तू.. तू कधीही माझ्या प्रेमात पडणार नाहीस..”
आकाशने विचार केला होता हे त्यापेक्षा विचित्र होतं..
“काय? आभा तू..”
“हो.. मी बरोबरच बोलतेय.. आणि मीही तुला एक प्रॉमिस करणार
आहे आकाश..” आकाश पहिल्याच शॉक मधून अजून सावरला नव्हता.. हि अजून काय शॉक देणार
होती हे त्यालाच कळत नव्हतं..
“आकाश मी तुला प्रॉमिस करते.. कि मी अदितीला पुन्हा तुझ्या
आयुष्यात आणेन..” आकाशचा त्याच्या कानांवर विश्वासच बसला नाही.. “अदितीच तुझं
प्रेम आहे.. आणि ते मी तुला मिळवून देईन..”
आभाच्या तोंडची वाक्य आकाशच्या विचाराच्या पलीकडची होती..
हि मुलगी अशी कशी असू शकते हाच प्रश्न त्याला पडला होता.. आपल्याला भेटलेली
सगळ्यात ग्रेट व्यक्ती म्हणून तो आभाकडे पाहत होता.. पण तिच्या डोक्यात काय शिजतंय
याची त्याला कल्पना नव्हती..
खेळ सुरु झाला होता..
Comments
Post a Comment