ओलांडून जाताना.. भाग-२१



सूर्य आता मावळतीला लागला होता.. काहीसं ढगाळ आणि उदासवाणं वातावरण भोवती पसरलं होतं.. आपल्याला जसं वाटत असतं तसचं वातावरण बदलत जातं का वातावरणामुळे आपल्याला उदास उदास वाटू लागतं.. ट्रेन पटरीवरून धावत होती.. खिडकीतून एक पक्षी एकटाच उडत जाताना दिसत होता.. आभा एकटक त्याच्याकडे पाहत होती.. आभा ट्रेनमधे बसली होती.. प्रतिक तिच्या शेजारी बसला होता.. कर्जतवरून ते मुंबईच्या दिशेने जायला निघाले होते..

कर्जतला सोहमच्या फार्महाऊसवर त्याने दिलेल्या पार्टीमध्ये सगळाच गोंधळ झाला होता.. अदिती आणि आकाश एकमेकांना जेलस फील करवून देण्यासाठी आपापल्या पार्टनर्स सोबत जास्तच क्लोज होवू पाहत होते.. पण त्याचा दोघांनाही त्रास होत होता.. बिअरची नशा, पार्टीची धुंदी आणि मनात उठलेलं वादळ यामुळे या साऱ्याचा शेवट झाला तो अदिती आणि आकाशच्या भांडणाने.. अदितीने भांडणात सगळ्यांसमोर आभाने तिला सांगितलेलं गुपित उघड केलं.. आभा आणि आकाश कपल असल्याचं नाटक करतायत..
हा सारा तमाशा झाल्यावर आभाला तिथे थांबणं किंवा त्या बसमधून परत मुंबई पर्यंतचा प्रवास करणं शक्य नव्हतं.. प्रतीकने तिची अस्वस्थता बरोबर ओळखली.. आकाश काहीच विचार करायच्या मनस्थितीत नव्हता.. तो तिथेच लॉनवर शून्यात हरवल्यासारखा बसला होता.. सोहम अदितीला आत घेवून गेला.. इतर मुलांना काय करावं काहीच कळत नव्हतं.. एक प्रकारची अस्वस्थता वातावरणात भरून राहिली होती.. काही क्षणांपूर्वी इथे जी धमाल मस्ती सुरु होती.. ती कुठल्या कुठे विरून गेली होती.. प्रतिक सोहमशी बोलला.. फार्महाउसवर गरजेसाठी एक गाडी ठेवलेली होती.. त्याला आणि आभाला कुणीतरी त्या गाडीतून स्टेशनपर्यंत सोडू शकेल का हे प्रतीकने त्याला विचारलं.. सोहमनेही लगेच तशी व्यवस्था करून दिली.. सोहम प्रतीकशी बोलून पुन्हा रुममध्ये गेला तेव्हा दारापलीकडे सोफ्यावर बसलेली अदिती त्याला दिसली.. ती रडत होती.. सोहम तिच्याशी काय बोलला हे प्रतिकला पाहता आलं नाही.. तोवर दर बंद झालं होतं..

अदिती या घटनेनंतर कंप्लीट शॉक मधे होती.. आपण काय करून बसलो हे जाणवायला तिला काही वेळ जावा लागला.. राग, फ्रस्ट्रेशन, प्रेमात हरलोय हि भावना, जेलसी आणि बिअर या सगळ्याचा मिळून हा परिणाम झाला होता.. दारू आपल्याला चढते पण तो पर्यंतच जोपर्यंत ती आपल्याला चढलेली हवी असते.. या घटनेनंतर अदिती झटक्यात जमिनीवर आली होती.. सोहमने तिला रुममध्ये आणलं आणि बसवलं.. तो बाहेर जायला वळणार तोच ती अचानक रडू लागली.. तिच्या मनात गिल्ट भरून राहिला होता..
तिने आकाश समोर अचानक सोहमला आपला बॉयफ्रेंड म्हणून आणलं, तेही त्या क्षणी ज्या क्षणी तो तिला प्रपोज करणार होता.. वर या सार्याने उदास झालेल्या आकाश सोबत  ती त्या विषयावर बोलायला गेली.. (भाग-५) स्वत:चा इगो वाचवायला तो म्हणाला कि आभा त्याची गर्लफ्रेंड आहे तरी तिने विषय तिथेच सोडला नाही.. आकाशच्या आयुष्यात दुसरं कुणी असू शकतं हेच तिला पचत नव्हतं.. तिने या गोष्टीचा इश्यू केला.. आकाशला, आभाला ग्रुपच्या मिटिंगमध्ये घेवून यायला सांगितलं.. तिने आकाशसमोर काहीच ऑप्शन ठेवला नव्हता.. जर उद्या आकाश म्हणाला असता कि आभा त्याची गर्लफ्रेंड नाहीये.. तो अदितीवर प्रेम करतो तर काय करू शकणार होती अदिती.. आईच्या विरोधात जावून आकाशला स्वीकारून स्वत:चं भविष्य पणाला लावण्याची हिम्मत ती दाखवू शकत नव्हती.. मग तिच्या या हट्टाला काय अर्थ होता..
आभा आणि आकाश जर एकमेकांच्या जवळ येवू लागले होते तर त्यालाही तिचं कारण होती.. तिच्या एका निर्णयामुळे हे सगळं होत होतं.. तिने आकाशला नाकारलं होतं.. तिने त्याला हे नाटक करायला भाग पडलं होतं.. ती स्वत:ला सांभाळण्यासाठी सोहमचा वापर करत होती.. तिच्यामुळे ते चौघेही एका भासमान विश्वात जगत होते.. जिथे नाती खोटी होती.. प्रेम खोटं होतं.. आणि आज तिच्यामुळेच ते भासमान जगही आता उरलं नव्हतं.. पण आता तिलाच हे सारं निस्तराव लागणार होतं..
प्रतीकशी बोलून सोहम आत आला तेव्हा अदितीने काही निर्णय घेवून टाकले होते.. त्यामुळे तिला आता जरा बरं वाटत होतं..
“अदिती.. आर यु ओके?”
“अ? हं!!”
“प्रतिक इथली कार घेवून गेलाय स्टेशनपर्यंत.. ती आली कि आपण त्यानेच घरी जावू..”
“हं..” अदिती इतकंच म्हणाली.. खरं तर तिला बरंच काही बोलायचं होतं.. पण ती योग्य वेळेची वाट पाहणार होती..

आकाश बस सुरु व्हायच्या बराच आधी बस मध्ये जावून बसला.. सगळे आता जेवून निघणारच होते.. कितीही तमाशा झालेला असला तरी भूक सगळ्यांनाच लागली होती.. आभा प्रतिकबरोबर निघून गेली होती.. आकाशच्या काही मित्रांनी त्याला चीअरअप करायचा प्रयत्न केला होता.. पण आकाशला माहित होतं कि त्यावर त्याचा काही परिणाम होणार नाहीये.. म्हणून तो बसमध्ये जावून बसला.. आपलं जॅकेट त्याने डोक्यावरून ओढून घेतलं.. जेणेकरून सगळ्यांना वाटावं तो झोपलाय पण जॅकेटच्या आतल्या अंधारात त्याला अजूनच सुन्न सुन्न झाल्यासारखं वाटलं..
आभाने असं का केलं असेल याचं उत्तर त्याला सापडत नव्हतं.. जिला दाखवून देण्यासाठी आपण हे नाटक करत होतो तिलाच आभाने हे सांगावं याचं त्याला आश्चर्य वाटत होतं.. आभा त्याला फसवत होती कि स्वत:ला वाचवत होती याचा त्याला अंदाज येत नव्हता.. तिने त्याला वाचन दिलं होतं कि ती अदितीला पुन्हा त्याच्या आयुष्यात आणेल.. तिचं हे वागणं त्याचाच भाग होता का? अदिती आज जे वागली त्याचा काय अर्थ होता? ज्या प्रकारे तो अदितीला दाखवायला आभाशी जवळीक साधत होता त्याच प्रकारे अदितीही सोहमचा वापर करत होती का?
आकाशच डोकं जड झाल्यासारखं त्याला वाटत होतं.. एक सरळ साधा खेळ त्याने सुरु केला होता.. आभाने त्याची गर्लफ्रेंड बनायचं.. थोडे दिवस हे नाटक करायचं आणि मग त्याच्यासोबत ब्रेकअप करून निघून जायचं.. पण आता ते सारं इतकं साधं सरळ राहिलं नव्हतं.. कॉम्प्लिकेटेड झालं होतं.. पण आकाशमुळे निर्माण झालेल्या या कोड्याची उकल आता त्याला स्वत:लाच करायची होती.. जॅकेटच्या आतल्या अंधारात तो त्याचाच विचार करता करता त्याचं झोपेचं सोंग कधी खरं झालं हे त्याचं त्यालाच कळलं नाही..

अदिती आणि प्रतिक दादरला पोहोचले तेव्हा आठ वाजले होते.. आता आभा बरीच सावरल्यासारखी वाटत होती.. ती आणि प्रतिक या साऱ्या प्रवासादरम्यान काहीच बोलले नव्हते.. प्रतिकला कळत होतं कि आभाला एका ब्रेकची गरज आहे.. स्टेशनला उतरले तेव्हा आभा एकटीच गोरेगावला जायला निघाली होती.. पण प्रतीकने तिला थांबवलं.. त्याला तिथेच म्हाडा मध्ये त्याच्या म्युझिक डायरेक्टर मित्राकडे जायचय असं कारण त्याने पुठे केलं.. ते प्रतीकची गाडी घ्यायला कॉलेज पर्यंत आले आणि प्रतिक गाडीच्या दिशेने जाण्याऐवजी दुर्गापरमेश्वरीकडे निघाला..
“गाडी तर तिथे आहे ना?” आभाने गाडीच्या दिशेने बोट दाखवत त्याला विचारलं..
“पण गाडीत खायला नाही मिळणार.. भूक लागलीये..”
आढेवेढे घेत का होईना पण आभानेही खायला मागवलंच.. तिनेही सकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं.. मागवलेली इडली संपेपर्यत ती काहीही बोलली नाही इतकी तिला भूक लागली होती.. तिच्या पुढ्यातली इडली संपता संपता प्रतीकने ऑर्डर दिली..
“एक मैसूर मसाला..” आभाला तो खूप आवडायचा.. तिने पटकन वर पाहिलं..
“अ.. माझं झालय हा..”
“खाऊ नकोस.. शेअर तर करशील..” आभा नकार देवू शकली नाही.. ती काहीच बोलली नाही..
तिच्या मनात सतत हेच येत होतं कि प्रतिक तिच्याबद्दल काय विचार करत असेल.. त्याने आजपर्यंत प्रत्येक बाबतीत तिच्यावर विश्वास दाखवला होता.. ती आपल्याला जमणार नाही असं सांगत असताना त्याने ती काहीही करू शकते हा विश्वास तिला दिला होता.. आणि आज आपल्याबद्दल असं कळल्यावर त्याला कसं वाटत असेल..
“तुला खूप विचित्र वाटत असेल ना.. मी जे केलं.. आय मीन.. ऑड आहे ना हे खूप..” प्रतीकने आभाकडे पाहिलं..
“विचित्र काय त्यात..” तो हसला..
“विचित्र नाही तर काय.. हे असं नाटक.. म्हणजे.. प्रतिक.. म्हणजे मी ते करायला तयार झाले पण त्यावेळी..” आभाला आज पहिल्यांदा शब्द शोधावे लागत होते..
“आभा.. रिलॅक्स..” त्याने तिच्या हातावर हात ठेवला.. “तुला कुठलही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये..”
“पण मला वाटतय कि तुला सगळं काही कळायला हवं.. तुला उगाच असं नको वाटायला कि मी..”
“मला सगळं आधीच माहिती होतं..” आभाने त्याच्या या वाक्यावर चमकून त्याच्याकडे पाहिलं..
“पण तुला??”
“नाही म्हणजे मला नक्की हे काय प्रकरण आहे ते माहित नव्हतं.. पण मला अंदाज होता हे असंच काहीतरी असणार.. आभा प्रेम नजरेत ओळखता येतं.. आकाश आणि अदितीच्या नजरेत एकमेकांसाठी मी फार पूर्वीच ते पाहिलंय..”
“म्हणजे अदितीही आकाशवर प्रेम करते? पण मग..”
“करत असावी..”
“असावी म्हणजे?”
“म्हणजे गोष्टी बदलतात ना आभा.. आज आपल्याला एक जण आवडतो.. पण उद्या आपल्याला तोच आवडेल याची काय खात्री?” आभा यावर अंतर्मुख झाली.. “तुझं आकाशवर खूप जास्त प्रेम आहे ना?” आभाला प्रतिक समोर या प्रश्नाला होकार द्यावासा वाटला नाही.. “आभा तू बोलली नाहीस तरी तुझे डोळे बोलतात सगळं.. आणि आपण ज्या माणसावर खूप प्रेम करतो त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतो.. त्यासाठी कुणाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही.. चिल..”
आभा याच्यावर काहीच बोलली नाही.. तो फक्त प्रतीककडे बघत राहिली.. त्याने हे सारं किती सहजपणे घेतलं होतं.. किती सहज करून समजवून सांगितलं होतं.. मघापासून तिला वाटणारं सारं टेन्शन कुठल्याकुठे निघून गेलं होतं..

अंधारी रात्र होती.. ती धावत जिने उतरत होती.. कोण होती ती.. आभा.. का अदिती.. काहीच कळत नव्हतं.. तो तिच्या मागे धावत होता.. आकाश.. तिला थांबायला सांगत होता.. पण ती थांबत नव्हती.. ती जिने उतरून एका दारापर्यंत पोहोचली.. तिने मागे वळून पाहिलं.. आभा.. हो आभाच.. का अदिती.. आकाश अस्वस्थ झाला.. तो तिला काही विचारणार तोच तिने दार उघडलं.. दारासमोर एक रस्ता होता.. ती धावत त्या रस्त्याच्या मधोमध जावून उभी राहिली.. तिने वळून आकाशकडे पाहिल.. आकाश तिच्या दिशेने दावला.. तो दारापर्यंत पोहोचला.. तो दाराबाहेर पाउल टाकणार तोच भरदाव वेगात एक गाडी आली.. आणि त्या गाडीने रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या तिला उडवलं..

आकाश दचकून जागा झाला.. किती विचित्र स्वप्न होतं ते.. काय अर्थ होता त्याचा.. ती नक्की कोण होती.. आभा कि अदिती.. कुणीतरी आपल्यापासून खूप दूर जातंय अशी भावना त्याच्या मनात दाटून आली.. त्याला खूप एकटं एकटं वाटू लागलं.. स्वप्नातून जागं झाल्यावरही ते त्याच्या डोक्यातून जात नव्हतं.. कुणाला तरी तो कायमचा गमावून बसेल याची भीती त्याच्या मनात घर करून होती.. त्याचाच हा परिणाम होता का? त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं.. बस मुंबईत शिरली होती.. बसमधली बरीचशी मुलं कुठेतरी वाटेतच उतरली होती.. तो पुन्हा त्या स्वप्नाबद्दल विचार करू लागला.. मनी वसे ते स्वप्नी दिसे हे त्याला माहित होतं.. आपल्या मनातील कोणती भीती या रूपाने वर येऊ पाहतेय हे त्याने स्वत:लाच विचारलं.. त्याला जे उत्तर मिळालं आता त्या नुसार तो पुढची पावलं उचलणार होता.. खूप उशीर होण्याआधी काहीतरी करणं गरजेच होतं..

सोहमने गाडी अदितीच्या बिल्डींगखाली थांबवली.. कर्जतहून निघाल्यापासून अदिती गप्पच होती.. कसला तरी खूप गहन विचार करत होती.. सोहमने एक दोन वेळा बोलायचा प्रयत्नही केला.. पण ती त्याच्याकडे फक्त बघत रहायची.. सोहमला तिचं काय बिनसलय तेच कळत नव्हतं.. पण हि ती अदिती नव्हती जिच्यावर त्याने प्रेम केलं होतं.. त्याने अदितीकडे पाहिलं.. ती अजूनही विचारातच हरवली होती..
“अदिती...”
“हं....” अदिती भानावर आली..
“आपण पोहोचलो..” अदितीने खिडकीतून बाहेर पाहिलं.. ओळखीच्या खुणा तिच्या नजरेला जाणवल्या.. सोहमने तोवर गाडी बंद केली होती.. उतरायला म्हणून त्याने दर उघडलं..
“सोहम..” तो थांबला.. “ मला बोलायचं होतं जरा..”
“बोल ना..” तिने काहीतरी बोलावं असं तिथून निघाल्यापासून त्याला वाटत होतं..
“सोहम.. फार फिरवून नाही बोलणार मी.. बट आय कान्ट बी इन धिस रिलेशनशिप एनिमोर.. बेटर वी सेपरेट..”
अदितीचे डोळे भरून आले होते.. सोहम शॉकड तिच्याकडे बघत राहिला..

क्रमशः







Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४

ओलांडून जाताना... भाग - 3