ओलांडून जाताना... भाग-१०



आभाच्या बेडवर कपड्यांचा ढीग पसरला होता.. जवळपास ८-१० वेगवेगळ्या रंगाचे tops..
आभाच्या बिल्डींगखाली एक काळ्या रंगाची क्रुझ उभी होती.. विधिशा डोळ्यांना दुर्बीण लावून आकाशच्या बिल्डिंगकडे बघत होती..
आभाने त्यातला एक ऑरेंज TOP निवडला.. पण तिची एक नजर तिच्या फोनवर होती..
आकाश बिल्डींगमधून खाली उतरला.. तसा विधीशाने आभाला फोन लावला..
“Hello विधिशा.. बोल..” आभाने अतिशय इगरली फोन उचलून विचारलं..
आकाश आपल्या बाईकजवळ जावून थांबला.. त्याचं लक्ष आभाच्या बिल्डींगकडे होतं.. विधीशा गाडीतून हे सगळं पाहत होती..
“ये आता खाली.. तो आलाय..”
“ओके..” आभा फोन कट करणार तोच विधीशाचा आवाज आला..
“एक मिनिट.. मला सांग तू कुठल्या रंगाचे कपडे घातलेयस?”
“ऑरेंज TOP आणि...”
“आधी बदल तो.. त्यानेही ओरेंज शर्ट घातलाय..”
“खरच??” आभाला या गोष्टीची खरंच गंमत वाटली.. तिला हे आवडलं होतं.. त्यांची वेव्हलेन्थ नेह्मी जुळायची..

तिथून जाणाऱ्या वॉचमन काकांकडे आकाशने आभाची चौकशी केली..
“ती दिसली नाही सकाळपासून.. “
आकाशला कळत नव्हतं.. आभा वॉचमनच्या नजरेला न येता कॉलेजला गेली असेल.. का ती अजूनही घरी असेल आणि आता निघत असेल.. का ती आज कॉलेजलाच येणार नाही.. काही क्षणांच्या अस्वस्थते नंतर त्याने तिच्या घरी जायचं ठरवलं.. त्याने असं ठरवायला आणि आभा तिच्या बिल्डींगमधून बाहेर यायला एकच गाठ पडली..  तिने जांभळ्या रंगाचा TOP घातला होता.. त्यात ती छान दिसत होती.. आकाशने तिच्याकडे पाहून हाताने खुणावलं.. पण तिचं लक्षच नव्हतं.. ती गेट मधून बाहेर पडताना आपण तिला लिफ्टसाठी विचारू अशी त्याने स्वत:ची समजूत घातली.. तसंही दोघांनी एकत्र जाणं हा त्यांचा दिनक्रमच होता.. या महिन्याच्या सुरुवातीला जो गोंधळ झाला त्यात काही दिवस हा दिनक्रम चुकला होता.. पण आता त्याला तो चुकवायचा नव्हता..
आभा त्याच्या दिशेनेच येत होती.. तिने त्याला पाहिलं.. छानसं हसली.. आकाशला हायसं वाटलं.. तोही हसून बाईकवर बसला.. आणि त्याने बाईक स्टार्ट केली... आता कोणत्याही क्षणी आभा बाईकवर बसेल असं त्याला वाटत असतानाच त्याच्या शेजारून काळ्या रंगाची क्रुझ भरदाव वेगात निघून गेली.. आकाशच लक्ष गेलं.. आभा त्यातच बसली होती..
आकाशला आश्चर्य वाटलं.. आभा त्याला डावलून निघून गेली होती.. असं पहिल्यांदा झालं होतं.. मागे एकदा तिचे काका याच वेळी आले होते.. त्यांनी तिला कॉलेजला सोडायची ऑफर दिली होती.. पण तेव्हा तिने त्यांना टाळलं होतं आणि आकाश सोबत बाईक वरून गेली होती.. मग आज असं कोण होतं ज्याला आभा टाळू शकत नव्हती.. का तिने आकाशलाच टाळलं होतं? आकाश याच विचारात असताना वॉचमनने त्याला हाक मारली..
“आकाश.. आभा... आभा आत्ता गेली त्या गाडीतून.. मघाशी विचारत होतास ना..”
“पाहिलं मी काका..” आकाश काहीसा वैतागुनच त्याला म्हणाला..

विधिशा आणि आभा गाडीत बसून हसत होत्या.. विधीशाने डोळ्यांना लावलेला काळा गॉगल आणि डोक्यावरून गुंडाळलेला स्कार्फ काढून ठेवला..
“विधी.. हे कशाला घातलं होतंस..”
“त्याने मला ओळखू नये म्हणून..”
“तसंही तो तुला ओळखत नाहीच..याने काय होणार वेगळं..”
“मॅड.. म्हणजे त्याने हा चेहरा ओळखायला नको.. उद्या आपल्या प्लानमध्ये तो पुढे न्यायला कधीही कुठल्या कॅरेक्टेरची गरज पडली तर मीच एन्ट्री मारणार ना..”
“हे जरा अती होतय असं नाही वाटत विधी.. मला आपण कुठल्यातरी इंग्लिश डिटेक्टिव्ह फिल्म मधे असल्यासारखं वाटतय..”
“तसचं समज.. पण मला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये..” विधीशाने हसून डोळा मारला.. “आणि तसंही मी ज्या माणसाकडे जॉबसाठी अप्लाय केलाय हि इज काइंड ऑफ डिटेक्टिव्ह.. हा असला अनुभव तिकडे उपयोगाला येईल ना माझ्या..”
“तू डिटेक्टिव्हकडे जॉब करणार.. god!! विधी तू विचित्र आहेस एकदम..”
“Thanks!!” विधिशा हसून म्हणाली.. “पण कॉलेजला गेल्यावर तू काहीही विचित्र वागू नकोस हं! आपलं काय ठरलय माहितीये ना.. पहिली स्टेप.. तुझी इंडिपेंडं पर्सनॅलिटी तयार करायची... कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून आकाश भोवती फिरणारं तुझं आयुष्य आधी वेगळं करायचं.. त्याला कळायला तर हवं कि खरी तू कशी आहेस..”
“येस विधी.. मलाही तेच बघायचंय.. खरी मी आहे कशी..”

कॉलेजमध्ये आकाश पोहोचला तेव्हा त्याला पहिली दिसली ती अदिती.. ती सोहमच्या इम्पोर्टेड बाईकवरून कॉलेजला आली होती.. तिने त्याला मिठी मारून बाय केलं आणि ती वळली तेव्हा तिची आणि आकाशची नजरनजर झाली.. तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.. तिने नजर फिरवली.. पण फार काळ नाही.. तिने आकाशकडे पुन्हा पाहिलं आणि त्याच नजरेने तिला घेरलं.. आकाशही जणू सगळं विसरून गेला.. आजूबाजूचं सारं धुरकट व्हायला लागलं.. कॉलेजची इमारत.. शेजारचा कट्टा.. कट्ट्यावरची मुलं.. सगळं धुरकट झालं.. उरले फक्त अदिती आणि आकाश..
अदितीला जाणवत होतं आपण पुन्हा चुकीच्या दिशेने जातोय.. तिने प्रयत्नपूर्वक आकाशच्या नजरेतून स्वत:ला सोडवलं.. आणि मान फिरवली.. तसा आकाश भानावर आला.. अदिती कुणाकडेही न बघता आपल्या क्लासरूमकडे निघाली.. निघताना तिच्या डोक्यात हाच विचार सुरु होता.. आता काहीही झालं तरी आपण आकाशच्या समोर येणार नाही याची काळजी घ्यायची.. कारण जेव्हा जेव्हा आपण त्याच्या समोर येवू तेव्हा तेव्हा आपण आपल्या केलेल्या निर्धारापासून लांब जावू.. त्यामुळे आकाशपासून लांब रहायचं.. अदिती कॉलेजच्या बिल्डींगच्या पायऱ्या चढू लागली.. आकाश तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभा होता..
हे सारं पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीतून आभा पाहत होती.. तिला विधीशाच वाक्य आठवलं.. ‘हे जितकं वाटतय तितकं सोप्प नाहीये.. आकाश असा अस्वस्थ होतोय याचा अर्थ तो अदितीला विसरलाय असा होत नाही..’ आभाला आज सकाळपासून जो आनंद जाणवत होता तो कुठेतरी मावळलाय असं तिला वाटलं.. हा सारा खेळ इथेच थांबवावा असं तिला वाटू लागलं.. इतक्यात तिचं खाली लक्ष गेलं..आकाश तिच्याकडे पाहत होता.. तो छानसं हसला आणि त्याने आभाला हाय केलं.. आभानेही हसून हात हलवला.. इतक्यात कॉलेजची बेल वाजली.. आभाने आकाशला बाय केलं आणि ती घाईघाईत आपल्या क्लासरूमकडे निघाली..

आकाशला आभा नंतर लंच पर्यंत दिसली नाही.. मित्रांशी बोलताना त्याला कळलं कि सकाळी आभाची बहिण तिला सोडायला आली होती.. आकाशला हे ऐकून जरा बरं वाटलं.. पण आभा त्यांच्या क्लासरूममध्ये फिरकलीच नाही याचं त्याला खरंच आश्चर्य वाटत होतं.. कारण आभा नेह्मी पहिली १-२ लेक्चर्स बसायची आणि मग ती आकाशच्या क्लासमध्ये निघून यायची.. आकाशच्या शेजारची जागा तिच्यासाठी रिकामी ठेवली होती.. इथेच ती उरलेला वेळ टाईमपास करायची.. ती आकाशच्या ग्रुप मधे इतकी मिक्स झाली होती.. कि तिच्या क्लासमध्ये तिचा असा कोणताच ग्रुप नव्हता.. हाच तिचा एकमेव ग्रुप होता आणि तरीही आज ती एकदाही त्यांना भेटायला आली नव्हती त्यामुळे आकाशच मूड खराब झाला होता.. ती त्यांना भेटली ती थेट लंचच्या वेळी..
“हाय आभा कुठे होतीस तू?”
ती कॅन्टीनमधे आली तसं ग्रुपमधल्या एका मुलीने विचारलं..
“लेक्चर्सना.. अजून कुठे असणार..”
“नाही तू.. एखाद लेक्चर आमच्या क्लासमधेही बसतेस म्हणून... आम्ही मिस केलं तुला.. मी मिस केलं तुला..” आकाश तिला म्हणाला..
“ओ... मी पण मिस केलं.. सगळ्यांना.. पण ऑल्मोस्ट Jan उजाडलाय रे.. तुमचा सिलॅबस पाठ आहे मला पण माझा नाही..” यावर सगळेच हसले.. “अभी थोडा ध्यान तो देना पडेगा ना..” डबा उघडत ती म्हणाली..
आकाशने तिच्या डब्याकडे पाहिलं.. डब्यात मेथीची भाजी होती.. आकाशला ती कधीच आवडायची नाही.. आज पहिल्यांदा असं झालं होतं.. आभाने आकाशला न आवडणारं काहीतरी डब्यात आणलं होतं.. आभाने आकाशकडे पाहिलं.. आणि हसली..
“मला खूप आवडते मेथीची भाजी..”
“मलाही..” आकाश उसनं अवसान आणत म्हणाला..
“अरे मला माहित नव्हतं..” खरं तर ती त्याला आवडत नाही हे आभाला माहिती होतं.. “घे ना..”
आकाशने एक घास घेतला.. आणि कसाबसा खाल्ला..
“कशी झालीये?”
“मस्त.. छानच..”
आभाला हसू आलं.. आपल्याला खरं काय आहे हे माहित असताना समोरच्याने बोललेलं खोटं शांतपणे ऐकणं किती मजेदार असतं याचा अनुभव आज आभाला आला.. आकाश खूप कन्विन्सिंगली खोटं बोलत होता.. पण आभाला खरं काय आहे ते माहिती होतं..
“अजून घे ना..”
“भूक नाहीये गं.. मघाशीच वडापाव खाल्ला..”
आभाला अजूनच गम्मत वाटली.. आकाशसाठी तिने न आवडणारी कॉफी प्यायला सुरुवात केली होती.. तिला ती आवडूही लागली होती.. पण आकाशला काही तसं जमलं नाही.. पण कमीतकमी त्याने प्रयत्न केला याचं आभाला समाधान होतं.. इतकाही प्रयत्न त्याने आजपर्यंत केला नव्हता..
आभा तिच्या आवडीची मेथीची भाजी खावू लागली.. पहिल्यांदा आपल्या आवडीचं काहीतरी खाताना तिला खूप बरं वाटत होतं.. त्याचवेळी आकाशच्या डान्स आणि ड्रामा ग्रुपचा एक जण त्याला शोधत तिथे आला.. हा त्या दिवशी रेस्टॉरंटमधे आभाला भेटला होता.. त्यामुळे त्यानेही आभाला ओळखलं..
“हाय आभा..” आभाने त्याला हाय केलं तसा तो आकाशकडे वळला.. “आकाश.. चल जरा.. ऑडीमधे..”
“काय रे काय झालं?”
“सानप सरांनी बोलावलंय..” सानप सर कल्चरल डिपार्टमेंटचे हेड होते..
“काय रे.. काय मॅटर?”
“माहित नाही रे.. तू चल..” ते निघता निघता तो मुलगा थांबला आणि वळून त्याने आभाला विचारलं.. “आभा येतेस तू?”
“मी??”
डान्स आणि ड्रामाची मुलं सहसा कुणालाच आपल्यातफार मिक्स करायची नाहीत.. पण एकतर त्यांच्यालेखी आभा आकाशची Girlfriend होती आणि त्या दिवशी हॉटेलमध्ये ती ज्याप्रकारे सगळ्यांसोबत मिक्स झाली होती त्याला आभाला बोलवण्यात काही वावगं वाटलं नाही..
आकाश मात्र ठाम होता कि आभा येणार नाही.. आज सकाळपासून ती ज्याप्रकारे वागत होती.. आकाशला टाळत होती ते पाहता आता ती येण्याची काहीच चिन्ह नव्हती..
“ओके.. मला आवडेल यायला जर तुम्हाला प्रोब्लेम नसेल तर..”
आकाशला आभाच्या या वाक्याचं आश्चर्यच वाटलं.. ती उठली.. Bag आवरली आणि त्यांच्याबरोबर चालू लागली..
विधीशाने सांगितलेला प्लान पुढे नेण्यासाठी तिला या मुलांमध्ये मिक्स होण्याची गरजचं होती.. खासकर आदितीशी मैत्री वाढवण्याची.. हा त्याचा करेक्ट चान्स होता..

ऑडीमधे सगळे गोळा झाले होते.. अदितीही त्यांच्यात होती.. आभाशी जुजबी हाय हॅलो करण्यापलीकडे ती फार बोलली नव्हती.. अदिती आकाशच्या तिथे असण्याने अस्वस्थ होती.. आज सकाळीच तिने आकाशपासून दूर राहण्याचा निश्चय केला होता आणि आज संध्याकाळ व्हायच्या आत आकाश पुन्हा एकदा तिच्यासमोर आला होता.. देव आपल्यासोबत असं का करतोय हेच तिला कळत नव्हतं..
ग्रुप सेटल होईहोईतो सानप सर आले..
“Boys and Girls.. आपल्यासाठी एक खूप चांगली बातमी आहे..” त्यांनी आत येताच मुद्याला हात घातला.. “आपली एकांकिका स्पेशल इंट्री म्हणून सवाईला डायरेक्ट Final Round ला सिलेक्ट झालीये..
ऑडीमधे सगळ्यांचा एकच आवाज घुमला.. सगळ्यांनी जल्लोष केला.. त्यांच्या कॉलेजची एकांकिका यावेळी सगळ्या स्पर्धांमध्ये गाजली होती.. ब्रॉडवे शो सारखी डान्स आणि अॅक्टिंग याचं सुंदर मिलाफ करणारी एकांकिका खरच एक वेगळा अनुभव होती.. ५० मुलं एकावेळी रंगमंचावर ज्या प्रकारे वावरायची ते खरच बघण्यासारख होतं.. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली होती.. त्यामुळे सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.. सगळे एकमेकांना मिठ्या मारत होते.. अभिनंदन करत होते.. त्याच नादात अदिती आणि आकाश समोरासमोर आले.. उत्साहाच्या भरात त्यांनी एकमेकांना मिठी मारलीही असती.. पण अदिती अचानक सावरली.. आकाशही थांबला.. एक ऑकवर्ड मोमेंट तयार झाली.. दोघांना काय करावं ते कळे ना.. सानप सरांनी जवळपास त्यांच्या मदतीला धावून आल्याप्रमाणे बोलायला सुरुवात केली..
“मुलांनो.. शांत व्हा.. शांत व्हा..” सगळे गप्प झाले.. “आनंद आपण साजरा करायचाच आहे.. पण तो हि स्पर्धा जिंकल्यावर..” सगळ्या मुलांनी ओरडून यालाही दुजोरा दिला.. “पण आता मेहनत करायची वेळ आहे.. २५ तारीख आपली लास्ट डेट आहे आणि त्यासाठी आपल्याला तयार रहायचय.. शेवटच्या क्षणाला आपण परफेक्टच असलं पाहिजे.. त्यामुळे उद्यापासून आपण पुन्हा प्रॅक्टीस सुरु करणार आहोत..” मुलांनी पुन्हा आनंदाने जल्लोष केला.. “दिवसाला २-३ तसाच आपण प्रॅक्टीस करणार आहोत.. पण जिंकण्यासाठी त्याची गरज आहे.. i am sure तुम्ही सगळे आपल्या कॉलेजला जिंकावायला तयार आहात..”
सगळ्या मुलांनी खूप आरडाओरडा करून सरांना होकार दिला.. सगळेच या बातमीने खूष होते.. मात्र अदितीच्या चेहऱ्यावरच हसू मावळल होतं.. आकाशपासून लांब रहायचं होतं तिला.. आणि उद्यापासून तिला त्या एकांकीची प्रॅक्टीस करायची होती ज्यात तिचे आणि आकाशचे २ इंटेन्स क्लोज डान्स होते.. आता काय करावं तिला काहीच कळत नव्हतं.. तिने आकाशपासून कितीही लांब रहायचा प्रयत्न केला तरी परिस्थिती तिला आकाशकडे ढकलत होती..
सगळा ग्रुप एकीकडे आणि चिंतेत हरवलेली अदिती एकीकडे असं दृष्य ऑडीत दिसत होतं.. आभा ते लांबून ऑबसर्व्ह करत होती..

क्रमशः 


Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४

ओलांडून जाताना... भाग - 3