ओलांडून जाताना... भाग-२९



थेटरच्या बाहेर बरीच वर्दळ दिसत होती.. चौथी एकांकिका आत्ताच संपली होती आणि लोक तिच्यावर चर्चा करण्यात रंगले होते.. कुणी सिगरेट ओढत होतं.. पहिल्या दोन एकांकिकेमधली काही पोरं तिथेच पु.लं.च्या पुतळ्या जवळ झोपली होती..
“आभा.. तू खरंच रागावली नाहीएस ना माझ्यावर.. तो वर्षभरापूर्वीचा पासवर्ड आहे गं..”
आभा आकाशच्या इमेल आयडी वरून एकांकिकेच म्युझिक घेवून आल्यापासून आकाश सातव्यांदा हे बोलत होता.. त्याच्या इमेल आयडी ओपन करण्यासाठी आभाला आकाशच्या पासवर्डची गरज होती.. तो त्याने दिलाही.. पण त्यामुळेच सगळा गोंधळ सुरु झाला होता.. कारण आकाशचा पासवर्ड होता ‘ADITI0101’..
“आकाश.. मी सांगितलं न तुला मी चिडले नाहीये अजिबात..”
आभा खरोखरंच चिडली नव्हती.. तीही समजू शकत होती कि असं घडण्यात आकाशची काहीच चूक नाहीये.. असं कुणासोबतही होवू शकतं..
“म्हणजे तू एकांकिका संपल्यावर मला पु.लं.च्या पुतळ्याजवळ भेटशील ना?”
आकाश तिच्या पहिल्या वहिल्या स्टेज परफॉर्मन्स नंतर तिला तिथे प्रपोज करणार होता आणि हे तिलाही माहित होतं.. आभाने त्याच्या या प्रश्नावर होकारार्थी मान हलवली.. आकाशचा चेहरा खुश झाला..
“आभा.. नाही म्हणणार नाहीस ना?” आभा लाजरं हसली..
“याचं उत्तर आता दिलं तर मग तिथे काय बोलणार..” ती हसून निघाली.. आकाश खुश झाला.. त्याचा जीव अखेर भांड्यात पडला होता.. तो हि आता उत्साहाने सगळ्यांना मदत करायला स्टेजकडे निघाला.. त्या दोघांनाही कळलं नव्हतं.. तिथे मागेच अदिती उभी होती.. हे सारं होणार हे तिला माहित होतं.. पण का कोण जाणे त्याचं हे संभाषण ऐकून तिचे डोळे भरून आले होते..

तिसरी बेल झाली आणि कर्टन उघडला.. स्टेजवरच्या अंधारात प्रतीकच्या आवाजात एकांकिकेची अनाउन्समेंट झाली.. आभा प्रचंड घाबरलेली होती.. जिथे प्रतिक उभा राहून अनाउन्समेंट करत होता तिथेच आभा उभी होती.. तिने भीतीने प्रतीकचा हात घट्ट धरून ठेवला होता.. प्रतीकची अनाउन्समेंट संपली आणि स्टेज अचानकच उजळला.. अगदी थोडक्या गोष्टींचा वापर करून उभारलेल्या सेटलाच कडकडून टाळ्या पडल्या.. या आवाजाने आभा अधिकच घाबरली..
तिथे मजनूने एन्ट्री घेतली आणि एकांकिकेला सुरुवात झाली.. आता दोन डायलॉग्ज नंतर लैलाची म्हणजे आभाची एन्ट्री होती..
“आभा.. जम के करना..” प्रतिक म्हणाला.. पण आभाच्या चेहऱ्यावर कम्प्लीट बारा वाजले होते..
“प्रतिक मला भीती वाटतेय?”
“काय?” प्रतिकला आश्चर्य वाटलं.. कारण पाच मिनिटांपूर्वी आभा नॉर्मल होती.. आणि अचानक जणू तिला भीतीचा अटॅक आला होता..
“आपण रीदिमाला पाठवूया..” आभा घाबरून म्हणाली..
“वेडी झालिएस का तू.. एन्ट्री आली आहे तुझी..” तेवढ्यात तिथे मजनुचा सिक्वेन्स संपला आता लैलाची एन्ट्री होणं अपेक्षित होतं..
“अरे पण..” आभाचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत प्रतीकने तिला स्टेजवर ढकलून दिलं.. आता काय व्हायचय ते होवू दे असा त्याने विचार केला..
आभा अचानक स्टेजवर आली.. समोर ऑडीयन्स खच्चून भरलेलं होतं.. तिने दोन क्षण डोळे मिटले.. देवाची प्रार्थना केली आणि आता आपण देवाच्या भरवश्यावर असं स्वत:लाच समजवून तीने तिचा डायलॉग सुरु केला..
“आज आलात पुन्हा स्वप्नांच्या नगरीत भटकून.. मनाच्या कुंचल्याने स्वप्नाच्या भिंती रंगवता येतील पण पोटाची खळगी भरण्यासाठी त्याचा काही उपयोग नाही.. वास्तवाचं भान सुटलेलं प्रेम अवास्तव असतं.. आणि त्याची खऱ्या आयुष्यात काहीही किंमत नसते..”
आभाचं पहिलं वाक्य संपलं आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.. खरं तर तो फक्त आभाच्या वाक्यासाठी नव्हता तर एकूणच त्या सिक्वेन्स साठी होता.. पण यामुळे आभाला चांगलाच जोश आला.. या टाळ्यांनी तिच्यावर काहीतरी जादूच केली जाणू.. तिने आता सगळं टेन्शन सोडून काम करायला सुरुवात केली.. थोड्यावेळातच ती सगळं काही विसरली..  आता ती आभा राहिली नाही.. ती लैलाच्या भूमिकेत शिरली होती..
पण एकांकिकेत अशीही एक व्यक्ती होती जिला आता भूमिका, एकांकिका, परफॉर्मन्स कशाशीच काही देणं घेणं नव्हतं.. ती होती अदिती.. आता पर्यंत ती सारं सहन करत होती पण आता आकाश आणि आभाचं बोलणं ऐकल्यावर तिला हे सारं सहन करण्यापलीकडे जात होतं..
आकाश तिचं पाहिलं प्रेम होता.. तिच्या मॉमने तिच्या मनात भरवलेल्या लव्हमॅरेजच्या भीतीमुळे ती आजपर्यंत त्याच्यापासून दूर पळत होती.. तिच्या मावशीचं आयुष्य सर्वसामान्य माणसाशी लग्न केल्यामुळे गरिबीत आणि दु:खात गेलं होतं.. आणि आता तर ती ज्याच्यावर प्रेम केलं त्याचाच दु:स्वास करू लागली होती हे तिच्या मॉमने तिच्या मनावर बिंबवल होतं.. अदितीला आकाशच्या आणि तिच्या बाबतीत असं होईल का याची भीती होती.. ती आईच्या विरोधातही जावू शकत नव्हती.. त्यामुळेच तिने आकाशला स्वत:पासून तोडलं.. पण त्यानंतर तिला भेटलेली तिची मावशी किती सुखात आहे, आपल्या नवर्यावर किती प्रेम करते आणि तिची मॉम तिला कंट्रोल करण्यासाठी तिच्याशी कसं खोटं बोलत आली हे तिला कळलं आणि तिचे डोळेच उघडले.. पण आता खूप उशीर झालं होता.. तिचा आकाश आभाचा झाला होता..
त्यामुळेच आज अदिती सारं काही विसरून त्याच्या सोबत या रंगमंचावर अखेरचं नाचून घेणार होती.. उद्यापासून ती स्वत:ला त्याच्या आयुष्यापासून पूर्णपणे तोडून टाकणार होती.. पण आज तिला नाचून घ्यायचं होतं.. ती बेभान होवून नाचत होती..
आकाशलाही ते जाणवलं.. तिचा स्पर्श आज वेगळा होता.. त्यात तो अलिप्तपणा नव्हता.. पण आकाश मात्र जमेल तितकं अंतर ठेवू पाहत होता.. पण एकांकिकेतले बरेच डान्स क्लोज डान्स होते त्यामुळे त्याचही काही चालत नव्हतं..
प्रतिकलाहि अदितीचा आजचा परफॉर्मन्स काहीतरी वेगळा आहे हे जाणवत होतं.. त्याला त्या मागचं कारण कळत होतं.. पण वळत नव्हतं.. तो कन्फ्युज होता.. पण आता त्याला या कशाबद्दलच विचार करायचा नव्हता.. त्यांची एकांकिका फारच चांगली होत होती.. आभाने तिची भूमिका फारच चांगली वठवली होती.. आता एकांकिकेचा शेवट आलाच होता..
अखेरच्या दोन रिहर्सल्समध्ये प्रतीकने शेवटच्या पोर्शन मध्ये काही बदल केले होते.. स्टेजच्या मधोमध उभे असलेले लैला मजनू आपली अखेरची वाक्य बोलतात आणि जायला वळतात.. त्याच्या टर्नबरोबर शर्पली त्यांचे डान्सिंग रिफ्लेक्शन म्हणून वापरलेले आकाश आणि अदिती त्यांच्या समोर येतात.. मजनू समोर आकाश आणि लैला समोर अदिती.. मग लैला मजनू एक्झिट करतात आणि लास्ट परफॉर्मन्स होतो.. आता एकांकिका त्याचं पॉईंटला आली होती..
आभा आणि मजनू झालेला सिद्धार्थ समोरासमोर उभे होते.. आभाने आपला अखेरचा डायलॉग घेतला..
“आता तुझ्यासारखा मला दिसत नाहीस तू..
एक अनोळखीपण भरून राहिलंय तुझ्यात आणि माझ्यात..
सात जन्मांच्या गाठी जशा सुटून जाव्यात क्षणात..
निसटून गेलं सारं कसं आणि मागे राहिली हुरहूर थोडी..
तुझ्या माझ्या प्रारब्धामध्ये कधी कुणी लिहिली हि कोडी..”
      आणि आभाने शार्प टर्न केला तशी ठरल्या प्रमाणे अदिती तिच्या समोर आली.. त्या दोघी एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत होत्या.. अपेक्षेप्रमाणे या मुव्हमेंटला जोरदार टाळ्या आल्या.. पण आभा अचानक एकांकिकेतून बाहेर पडली.. तिने अदितीचे डोळे पाहिले.. ते पाण्याने भरलेले होते.. आभाला काहीच कळलं नाही.. आखेरचं म्युझिक सुरु झालं तशी अदितीने ठरलेली मुव्हमेंट घेतली.. आणि आभा भानावर आली.. ठरल्याप्रमाणे तिनेही आपली एक्झिट घेतली.. पण तिच्या डोक्यात अजूनही अदितीचा तो चेहरा रेंगाळत होता..
     
अखेरचा कर्टन पडला तसा सगळ्यानीच जल्लोष केला.. आणि सगळे पटापट आवरायला लागले.. अजून दोन एकांकिका बाकी होत्या आणि त्यांना लगेच स्टेज क्लीअर करून पुढच्या स्पर्धकांना द्यायचं होतं..
      तिथे मुलींच्या मेकअप रूममध्येही सगळ्या जनी घाईघाईत चेंज करत होत्या.. आभाचा चेंज अजून बाकी होता.. ती मेकअप काढत असतानाच अदिती पूर्ण चेंज करून बाहेर पडू लागली.. आभाने हाक मारून तिला थांबवलं..
“अदिती.. आर यु ऑल राईट..”
“हो... मला काय झालय?” अदिती अतिशय ब्लँकली तिला म्हणाली..
“मी.. मी तुझ्या डोळ्यात पाणी पाहिलं.. एक्झिटच्या वेळी.. काय झालय?” आभाने काळजीने विचारलं..
“खरं सांगू.. ते आकाशमुळे..” अदिती आभाच्या डोळ्यात थंडपणे बघत होती.. आभाही तिच्या या वाक्याने जरा गडबडलीच.. तशी अदिती अचानक हसू लागली..
“आकाशचा पाय पडला नाचताना पायावर.. बाकी काही नाही.. किती घाबरलीस गं तू..” अदितीने आभाच्या डोक्यावर एक टपली मारली आणि वळून ती जायला निघाली..
“अदिती.. तू थांबणार आहेस ना रिझल्ट पर्यंत?” आभाने तिला विचारलं.. ती न वळताच म्हणाली..
“माझा रिझल्ट तर लागलाय..” मग शांतपणे वळली आणि आभाकडे पाहून म्हणाली.. “तू जिंकली आहेस..” आभा तिच्या या वागण्याने खरच कन्फ्युज झाली होती.. अदिती पुन्हा तसंच हसू हसून म्हणाली.. “या वर्षीची बेस्ट अॅक्ट्रेस गं.. आय अॅम शुअर.. तूच जिंकशील..”
इतकं बोलून अदिती वळली आणि चालायला लागली.. आभाला ती काय सांगून गेली ते काहीच कळलं नाही.. इतक्यात तिच्या मोबाईलवर मेसेज ब्लिंक झाला.. तो आकाशचा होता.. तो ठरल्याप्रमाणे पु.लं.च्या पुतळ्या जवळ वाट बघत होता..

अदिती लगबगीतच बाहेर पडली.. तिला आता इथे थांबायचं नव्हतं.. आकाश आभाला प्रपोज करणार होता.. ती होकार देणार होती आणि हि कहाणी इथेच संपणार होती.. तीने ड्रायव्हरला फोन लावला पण तो फोन उचलत नव्हता.. ती वैतागली.. तो झोपला असणार हे पक्क होतं.. रात्रीचा एक वाजून गेला होता.. ती स्वत:च पार्किंग मध्ये जाण्यासाठी निघाली..
पार्किंगमध्ये कुणीही नव्हतं.. अनेक गाड्या रांगेत लागलेल्या दिसत होत्या.. तिने तिच्या ड्रायव्हर काकांना हाक मारली.. पण काहीही उपयोग झाला नाही.. अखेर वैतागून ती स्वत:च गाडी शोधायला निघाली.. दोन पावलं गेली आणि थांबली.. तिने एकवार सभोवताली नजर फिरवली.. तिथे कुणीही दिसत नव्हतं.. पण तिला काहीतरी विचित्र जाणवत होतं.. म्हणूनच तिला पुढे जावंसं वाटत नव्हतं पण तिच्यासोबत जे एकंदरच घडतय त्याचा हा परिणाम असावा असं तिने विचार केला आणि ती तिची गाडी शोधायला पुढे निघाली..
सगळ्या पार्किंगवर नजर फिरवायला तिला पाच एक मिनिटं लागली.. आणि तिला जाणवलं कि तिची गाडी इथे नाहीये.. ती अजूनच अस्वस्थ झाली.. ती पुन्हा शोधू लागली.. कदाचित नजर चुकीमुळे राहून गेली असेल.. पण तसं नव्हतं.. खरंच तिची गाडी इथे नव्हती.. गाडी अशी गेली कुठे.. तिने ड्रायव्हर काकांना विचारायला मोबाईल काढला आणि तिच्या पाठीमागून तिला आवाज ऐकू आला..
“नेटवर्क नाहीये इथे.. फोन नाही लागणार..”
अदितीने घाबरून वळून पाहिलं.. तिथे सोहम उभा होता.. तो एकटक अदिती कडेच पाहत होता.. पण त्याची नजर नेह्मी सारखी नव्हती.. अदिती काहीशी घाबरली होती.. पण  मग धीर करून ती म्हणाली..
“तू इथे काय करतोयस?”
“आलो सहज.. बरेच दिवस भेटलो नाही.. भेटून घेवू..” त्याच्या आवाजावरून काहीच अंदाज येत नव्हता त्याच्या मनात काय सुरु आहे याचा.. अदितीला हीच गोष्ट जास्त भीतीदायक वाटत होती.. तिने पुन्हा मोबाईल फोन लावायचा प्रयत्न केला..
“सांगितलं ना.. नाही लागणार फोन इथे.. आणि हो.. गाडीचं म्हणशील तर मीच ती घरी पाठवली आहे.. म्हंटल मीच सोडेन तुला घरी..”
आता अदिती जास्तच अस्वस्थ झाली.. तिने इथून बाहेर पडण्याचा मार्ग कुठे आहे ते पाहिलं.. तो नेमका सोहमच्या मागे होता.. अदितीला काय करावं सुचत नव्हतं.. सोहमचा चेहरा आता चांगलाच कठोर झाला होता..
“खूप खेळ खेळलीस तू माझ्या बरोबर.. आता..”
तो शांतपणे तिच्या दिशेने चालत येवू लागला.. अदिती समोर आता कुठलाच मार्ग नव्हता..  

क्रमशः






Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४

ओलांडून जाताना... भाग - 3