ओलांडून जाताना.. भाग-११
आभा कॉलेजच्या गच्चीवर उभी होती.. जानेवारीचा थंड वारा
तिच्या केसांना उडवत होता.. हिवाळ्याची दुपार तिला नेहमीच आवडायची.. ऊन आणि थंडी
याचं मस्त कॉम्बिनेशन.. त्यामुळे आजकाल ती गच्चीवर आली कि इथे रेंगाळायची.. मग एक
तारखेची संध्याकाळ तिला हमखास आठवायची.. हीच गच्ची.. अशीच उत्तराच्या अपेक्षेत उभी
असलेली आभा आणि इथेच एका पत्राद्वारे तिला मिळालेला नकार..
तेव्हा सारं जग संपलं असं वाटलं होतं तिला.. तिच्या
आयुष्यात आता काहीच उरलं नाही याची खात्री झाली होती तिला.. पण आपण किती चुकीचे
असतो.. अवघ्या काही दिवसात सगळं चित्र पालटलं होतं.. आकाशला मिळालेल्या अदितीच्या
नकाराने तिला आकाशच्या जास्त जवळ आणलं होतं.. पण त्यात विधीशाच्या प्लानमुळे ती स्वतःच्याच
जास्त जवळ येत चालली होती.. काल परवा पर्यंत आकाशचा जो कल्चरलचा ग्रुप आभाला
ओळखतही नव्हता आज त्यांनीच आभाला त्यांच्या रिहर्सल्सना येण्याचं खास निमंत्रण
दिलं होतं..
आभाचा क्लास नविन बिल्डींगमधे होता.. तिथून कॉलेजच्या ऑडीकडे
जायला दोन रस्ते होते.. एक बाहेर पडून जुन्या बिल्डींगमध्ये एन्टर करून पुन्हा
वरपर्यंत जायचं.. किंवा मग नवीन बिल्डींगच्या गच्चीवर जावून तिथून पलीकडच्या
बिल्डींगमध्ये शिरायचं.. म्हणूनच आभा गच्चीवर आली होती.. पण ऑडीकडे जायच्या आधी ती
थोडा वेळ गच्चीवरच थांबली होती.. तेवढ्यात कुणीतरी तिला हाक मारली.. तिने वळून
पाहिलं.. तो आकाशच्या डान्स ग्रुप मधला एक मुलगा होता..
“येतेयस न रिहर्सलला?”
“हो हे काय.. तिथेच चाललेय..”
आभा त्याच्यासोबत निघाली..
खरं तर या रिहर्सलच्याईथे तिचं काहीच काम नव्हतं.. पण
विधीशाच ठाम मत होतं कि तिने जायला पाहिजे.. एक तर त्याने आकाशशी जवळीक साधता
येणार होती आणि दुसरा फायदा होता कि तिथे जावून अदितीशी तिची मैत्री होवू शकली
असती.. विधीशाचा Brain Game तिला कळत नव्हता.. पण खेळताना तिला मज्जा येत होती हे
मात्र खरं..
ती ऑडीमधे पोहोचली तेव्हा रिहर्सल सुरु झाली होती.. तिच्या
नजरेने आकाशला पटकन हेरलं.. आठ जोड्या स्टेजवर एका इंटेन्स गाण्यावर डान्स करत
होत्या.. त्यातच कॉलेजची बेस्ट डान्सिंग जोडीही होती.. आकाश आणि अदिती.. मधोमध
नाटकाची मेन लीड उभी होती.. एक जण स्टेज
समोर पाठमोरा उभा होता.. कंबरेवर हात ठेवून तो मोठमोठ्याने ओरडून सूचना देत होता..
हा नाटकाचा डिरेक्टर होता.. फायनल इयरला त्यांच्याच कॉलेजला शिकणारा.. पण त्याचं डोकं
आफाट आहे असं सगळे म्हणायचे.. आभाने त्याला कधी पाहिलं नव्हतं.. आताही तिचं
त्याच्याकडे लक्ष नव्हतं.. ती आकाश आणि अदितीला डान्स करताना पाहत होती..
अदिती डान्स स्टेप करत आकाशपासून दूर गेली.. आता ती तिथून
धावत येत आकाशकडे झेपावणार होती.. आकाशने तिला अलगद झेलायचं होतं.. आभाने या
एकांकिकेचा प्रत्येक प्रयोग पहिला होता.. खरं तर तिने प्रत्येक प्रयोगात आकाशला पाहिलं
होतं.. त्यामुळे तो डान्स आणि जवळ जवळ हि अख्खी एकांकिका आभाला पाठ होती..
अदितीने ठरल्याप्रमाणे मागे जावून आकाशच्या दिशेने धाव
घेतली.. ती त्याच्याकडे झेपावणार त्याच्या जस्ट आधी आकाशच लक्ष आभाकडे गेलं.. तो
दोन क्षण तिथे रेंगाळला आणि त्याचवेळी अदितीने जंप घेतली.. आकाशने तिला झेललं पण
त्याचं लक्ष नसल्याने त्याचं टायमिंग चुकलं आणि अदिती धडपडली.. डायरेक्टर जोरात
ओरडला.. म्युझिक बंद केलं गेलं.. आकाश एकदम गोंधळला.. तो कधी डिरेक्टरकडे तर कधी आभाकडे
पाहत तसाच उभा राहिला.. तो कुठे बघतोय हे पाहण्यासाठी डिरेक्टर वळला आणि त्याची
आणि आभाची नजरानजर झाली..
तो दिसायला तसा सर्व सामान्य होता.. सावळा रंग.. चेहऱ्यावर
वाढलेली खुरटी दाढी.. वाढलेले केस.. चार लोकात उठून दिसावी अशी एकच गोष्ट त्याच्या
चेहऱ्यात होती.. ते म्हणजे त्याचे डोळे.. त्याचे डोळे प्रचंड बोलके होते..
पाणीदार.. आकाशचे डोळेही सुंदर होते.. पण याचे डोळे वेगळेच होते..
“हि कोण?” मघाशी गच्चीवर भेटलेला तो मुलगा आभाच्या शेजारीच
उभा होता.. त्याला उद्देशून तो म्हणाला.. “तुझी नवीन डान्स पार्टनर?”
“नाही नाही.. ती येतेय अर्ध्या तासात..”
“मग हि कोण आहे?” त्याने आभाकडे अतिशय तुच्छपणे पाहिलं..
“हि माझी.. आमची मैत्रीण आहे..” आकाशने स्टेजवरून उत्तर
दिलं..
“मग?” त्याने आकाशला विचारलं..
“रिहर्सल बघायला बोलावलंय आम्ही तिला..”
“का?” त्याच्या प्रत्येक वाक्यातून त्याचा अॅटिट्यूड डोकावत
होता.. “तुम्ही नीट करता कि नाही हे बघायला मी कमी पडतोय का? का आता
प्रेक्षकांसमोरच परफॉर्मट करणार तुम्ही?”
“नाही ते..” आकाशला आता पुठे काय बोलावं ते कळत नव्हतं..
सगळेच अस्वस्थ झाले.. त्या डिरेक्टरसमोर काहीही बोलायची कुणाचीही हिम्मत नव्हती..
“तुमच्याशी जरा चांगलं वागलं कि शिस्त टांगायला निघालात
ग्रुपची.. का स्टार झालात मोठे.. इम्प्रेशन मारायला लोकांना इथे आणून बसवणार काय..”
तो बरच काही बोलू लागला.. आभाला ते अजिबात आवडत नव्हतं.. हे
तिच्यामुळे त्या सार्यांना ऐकायला लागत होतं.. आणि त्यांच्यात आकाशही होतं.. तो
डिरेक्टर त्याच्यावरच सगळ्यात जास्त बरसत होतं यामुळे तर ती जास्तच अस्वस्थ झाली
होती.. पण तो तोंडाला येईल ते बोलत होता.. अखेर त्याची तोफ जरा शांत होतेय असं
वाटू लागलं..
“ हे बघा.. तुम्हाला लक्षात नसेल तर परत सांगतो..”त्याचा
आवाजात एक वेगळीच धार आली होती.. तरी तो कमालीचा शांत होता.. “आपल्या रिहर्सलला
बाहेरचं कुणीही आलेलं मला चालणार नाही.. कळल..”
कुणीच काहीच बोललं नाही.. सगळ्यांनी माना खाली घातल्या..
आणि ऑडीमधे शांतता पसरली.. आणि अचानकच एक अनपेक्षित आवाज ऑडीमधे घुमला..
“माफ करा.. पण मला खरच माहित नव्हतं तुमच्या रिहर्सल्स या
चार लोकांसमोर करण्यासारख्या नाहीएत..” सगळे सुन्न झाले.. डिरेक्टरने शांतपणे वळून
आवाजाच्या दिशेने पाहिलं.. ती आभा होती.. “खरंच sorry.. येते मी..” आभा जायला
वळली.. डिरेक्टरला आश्चार्यातून सावरायला थोडा वेळ गेला.. आज पर्यंत त्याला असं
कुणीच बोललं नव्हतं..
“एक मिनिट..” आभा थांबली.. तो तिच्या दिशेने निघाला..
आकाशला काय करावं कळत नव्हतं.. डिरेक्टर स्वभावाने तसा चांगला होता.. पण तो एकदा
चिडला कि त्याचा काही नेम नसायचा..
“तुला काय कळत नाटकातल.. आपण असं काय मोठ केलय आयुष्यात
आम्हालाही कळू दे..”
“काही नाही..” आभा शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली.. “पण
जर काही केल्यावर माणूस असा मग्रूर होत असेल.. कुणाशीही कसंही बोलत असेल.. वागत
असेल.. अॅटिट्यूड झाडत असेल.. तर मग बरंच आहे कि मी अजून काही केलेलं नाही..”
आता ऑडीमधे असलेल्या सगळ्यांच्याच पायाखालची वाळू सरकली..
आभा जरा जास्तच बोलून गेली होती.. या डिरेक्टरला मागून सगळे जमदग्नी म्हणायचे..
आता हा जमदग्नीचा अवतार काय करणार याच्याकडेच सगळ्याचं लक्ष होतं.. आपल्याला प्रकरण
सावरायला गेलं पाहिजे म्हणून आकाश खाली निघाला.. डिरेक्टर शांतपणे आभाकडे बघत
होता.. आणि मग अचानक त्याला हसू फुटलं.. सगळ्यांना दोन क्षण विश्वासच बसला नाही..
पण तो खरच हसत होता.. तो हसताहसताच आभाकडे पाहून म्हणाला..
“तुझं वय किती.. तू बोलतेस किती..” आभाला त्याच्या अशा
रिअॅक्शनचं जाम आश्चर्य वाटलं.. तसं ते सगळ्यांनाच वाटलं होतं.. आकाशतर स्टेजचे
जिने उतरता उतरता मधल्याच पायरीवर थांबला होता..
“तू लिहितेस का.. का कविता बिविता करतेस..”
“नाही... का?” आभाला त्याच्या या बोलण्याचा अर्थ कळला
नाही..
“इतकं जड आयदर कथा कादंबर्या नाटक सिनेमातले लोक बोलतात..
किंवा मग कवी.. थॉट छान होता गं.. पण असा खऱ्या आयुष्यात..” तो वाक्य बोलता बोलताच
हसू लागला.. आभाला त्याच्या या वागण्याचा प्रचंड राग आला.. बोलायला काहीच नाही
म्हणून हसण्यावारी गोष्टी घालवणाऱ्या लोकांपैकी तिला तो वाटला.. ती वळून जायला
निघाली तर मागून त्याची हाक आलीच..
“थांब.. बघ तू रिहर्सल..”
“नको.. मला क्लास आहेत..” आभा वळून न बघताच म्हणाली..
“ए.. आता तू नाटकं करून दाखवू नकोस मला कळल ना..” तो
तिच्यादिशेने येत बोलू लागला.. “माझ्या रिहर्सलला कुणीही आलेलं मला चालत नाही.. मी
असाच काम करतोय आणि असाच काम करत राहणार.. तुझ्या एका डायलॉगने त्यात फरक पडणार
नाहीए.. मी तुला यासाठी थांबवतोय कारण तू जे बोललीस ना त्यासाठी खूप दम लागतो..
आणि ज्या शब्दात बोललीस त्याल खूप अक्कल लागते.. तुझा उपयोग होईल मला.. मला असिस्ट
करशील?”
आभासाठी हा प्रश्न फारच अनपेक्षित होता..
“पण मला येत नाही काहीच..” आभा गडबडून म्हणाली..
“ काही येण्याची गरजहि नाहीये.. एकांकिका बसलीये.. १-२ पोरं
बदलली आहेत.. त्यांच्याकडून वाचन वगैरे करून घ्यायचं.. कुणी चुकलं तर आता जसं मला
सुनावलास तसा एखादा डायलॉग द्यायचा चिकटवून.. तुझ्यात स्पार्क आहे.. शिकलीस तर
वाया जाणार नाही..”
आभासाठी हे नवीनच होतं.. तिच्यात काहीतरी आहे असं
पहिल्यांदा कुणीतरी म्हणालं होतं.. नाहीतर शाळेपासून आतापर्यंत ती एक नॉर्मल
विद्यार्थिनीच होती.. वर्गात यायचं.. मान खाली घालून शिकायचं.. कॉलेजमध्ये आली
तेव्हाही हे फार बदललं नव्हतं.. इथे फक्त आकाश त्यात अॅड झाला होता.. आकाशच्या
पलीकडे जावूनही तिच्यासाठी या कॉलेजमध्ये काही असेल असं तिला खरच वाटलं नव्हतं..
तिने आकाशकडे पाहिलं.. त्याचा चेहरा खुलला होता.. नजरेनेच तो
तिला होकार द्यायला सांगत होता.. तिने पुन्हा त्या डिरेक्टरकडे पाहिलं..
“एवढा वेळ मला एकांकिका बसवायलाहि लागला नव्हता.. किती
विचार करणार आहेस..”
आभाला हसू आलं.. तिने होकारार्थी मान हलवली..
“मला आवडेल हे करायला..”
सगळ्या ग्रुपने एकच जल्लोष केला.. आभाने सगळ्यांकडे पाहिलं..
आकाश सगळ्यात जास्त खूष दिसत होता.. त्याने Two Thumbs Up करत तिचं अभिनंदन केलं..
आभाने पुन्हा डिरेक्टर कडे पाहिलं.. त्याने त्याचा हात पुढे केला..
“माझ्या आयुष्यातली माझी पहिली असिस्टंट म्हणून मी तुझं
स्वागत करतो.. नाव काय आहे तुझं?”
“आभा..”
“वा.. प्रतिक..” तो स्वत:च नाव सांगून छानस हसला.. आभाला
आश्चर्य वाटलं.. याला हसतही येतं.. सगळ्या ग्रुपने टाळ्या वाजवायला सुरुवात केली..
संपूर्ण ऑडीटोरीयममधे त्या टाळ्यांचा आवाज घुमू लागला..
आभाच्या आयुष्यातल्या या पहिल्या टाळ्या होत्या.. कळत नकळत
आकाशमुळेच या ती ऐकत होती.. प्रतिक आकाशला बोलला म्हणून तिचा राग अनावर होवून ती
ते सगळं बोलू शकली होती.. तिने आकाशकडे पाहिलं.. तो तिच्याकडे पाहून कौतुकाने हसत
होता.. आकाशच्या डोळ्यात स्वत:साठी इतकं कौतुक पाहून तिला सार्याच सार्थक
झाल्यासारखं वाटत होतं..
ते दोघे एकटक एकमेकांकडे पाहत होते हे ऑडीटोरीयममधली जल्लोष
न करणारी एकमेव व्यक्तीही पाहत होती.. अदिती.. ती लांबून हे सारं पाहत होती.. काहीतरी
हातातून निसटत चाललय असं तिला वाटत होतं.. हि सगळी परिस्थिती पाहता एक फार मोठा
निर्णय घ्यायचं तिने मनाशी पक्क केलं.. उद्याच तो ती सगळ्यांना सांगणार होती..
क्रमशः
Comments
Post a Comment