ओलांडून जाताना.... भाग-५..



सूर्य मावळला होता.. वर्सोव्याचा समुद्र किनारा तसा शांत वाटत होता.. अंधारासोबत गारठाही हळू हळू वाढत चाललाय हे आभाला जाणवत होतं.. ती आणि विधिशा बंगल्याच्या मागच्या बाजूला बसले होते.. समुद्राकडे बघत.. अंधारात पुसटसा दिसणारा समुद्रही मनात घर करून राहणारा होता..
आभाची कहाणी अजूनही अर्धवटच होती.. ती विधीशाला पुढे काय झालं ते सांगणार तोच तिचे आई वडील आणि भाऊ विधीशाच्या Mom Dad ना भेटायला आले.. त्या दोघींना इच्छा नसताना थोडा वेळ family Time म्हणून घालवावा लागलाच.. तासाभरात सगळे आपापल्या व्यापात लागले.. दोघींचे वडील बिझनेस आणि राजकारणाच्या चर्चेत.. आया मलेशियाचे अनुभव आणि इतर गोसिप्सच्या मागे.. तर भाऊ विधीशाच्या घरातल्या Gadgets सोबत खेळण्यात बिझी झाला.. आणि त्या दोघींनी बंगल्याच्या मागे असलेल्या लॉनची वाट धरली..
“बरं.. आता लवकर सांग पुढे काय झालं.. थांब थांब.. मी चीजबॉल्स, बेक्ड फ्राईज आणि आईस्क्रीम सोडा आणते.. “
विधिशा एवढं बोलून जायला निघालीच तोच आभाने तिला हात धरून बसवलं..
“विधी काहीही नकोय खायला.. बस तू..”
विधिशा इच्छा नसतानाही बसली.. खरं तर तिला मलेशियाहून आणलेले हे सगळे पदार्थ ट्राय करायचे होते.. पण तिने मन मारलं आणि ती आभाची कथा ऐकू लागली..

३१ डिसेंबरच्या रात्री आभाने आकाशला दिलेल्या लव्हलेटरला एक कोरडस उत्तर लिहून आकाशने ते त्यांच्या कॉमन फ्रेंड सुधाबरोबर आभाकडे पाठवून दिलं.. खरं तर आभाकडे जावं.. तिच्याशी बोलावं.. तिच्याबद्दल त्याला तसं काहीच वाटत नाहीये हे तिला समजावून सांगावं असं आकाशला वाटत होतं पण आज त्याच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची संध्याकाळ आभाला समजावण्यासाठी त्याला मिस करायची नव्हती.. आभाला नंतरही समजावता येईल याची त्याला खात्री होती.. आज संध्याकाळी त्याला अदितीच्या पार्टीला जाणं महत्वाचं होतं.. कारण गेली २ वर्ष अतिशय स्ट्रगल करून त्याने त्याच्या first Loveच्या, म्हणजेच अदितीच्या मनात स्वत:बद्दल प्रेम जागवल होतं. आणि आता फार वेळ वाया न घालवता त्याला तिला प्रपोज करायचं होतं..
त्यासाठी तो खास तयार झाला होता.. लाईट लेवेंडर कलरचा शर्ट त्याने आज संध्याकाळसाठी खास घेतला होता.. अदितीचा आवडता रंग.. त्यावर असलेल्या जांभळ्या लाईन्स त्याची मुळातच असलेली उंची अधिकच खुलवत होत्या.. शर्ट मुद्दामच जरासा घट्ट घेतला होता.. घरातल्या घरात व्यायाम करून कमावलेलं शरीर त्यातून दिसावं असं आकाशला वाटत होतं.. डार्क ब्लू स्कीनफिट डेनिम.. पायात त्याचे लाडके Converse.. आणि फायनल टच म्हणजे त्याचा ब्लॅक वेल्वेटचा वेस्ट कोट..आकाशने केस ठीक केले आणि स्वत:ला आरशात पाहिलं.. “परफेक्ट!” इतकंच त्याच्या तोंडून निघालं..
एक महागड परफ्युम आणि लाल गुलाबांचा एक मोठा गुच्छ घेऊन आकाश पार्टीला पोहोचला.. या दोन गोष्टींसाठी तो तीन महिने पैसे साठवत होता.. तरीही शेवटच्या क्षणाला त्याला काही मित्रांकडून उधार घ्यावीच लागली होती.. यात आभाचेही पैसे होते या विचारानेच त्याला शरमल्यासारख झालं.. पण आता तो विचार करायला वेळ नव्हता.. त्याला पाहताच पार्टीला आलेल्या सगळ्याच मित्रांनी त्याचं स्वागत केलं.. बरेचसे आले होते.. बरेचसे यायचे होते.. पण आकाशला ते कुणीही महत्वाचे नव्हते.. त्याची नजर फक्त अदितीला शोधात होती.. अदितीच्या बिल्डींगच्या टेरेसवर पार्टी होती.. त्यामुळे माणसं कमी आणि जागा जास्त असं झालं होतं.. अदितीला शोधायला त्याला दोन सेकंद लागली.. आणि ती त्याला दिसली.. पाठमोरी.. व्हाईट स्लीवलेस वनपीस.. केसांची छानशी केलेली हेअर स्टाईल.. तो अदितीला पाठमोरीही ओळखू शकत होता.. आणि ती अचानक वळली.. आकाशकडे पाहून छानसं हसली.. बस!! आकाशच्या भोवतीचं सारच गायब झालं जणू.. त्याच्या ग्रुप मधली मुलं मुली.. डेकोरेटरने बांधलेला मंडप.. ठिकठिकाणी सोडलेले ड्रेप्स.. जागोजागी छोट्या पिलर्सवर ठेवलेले फुलांचे गुच्छ.. सगळ गायब झालं.. फक्त आकाश आणि अदिती..
ती चालत त्याच्याकडे येईल.. तो हसून गुढघ्यांवर बसेल.. फुलं तिच्या हातात देईल आणि तिचा हात हातात घेईल.. ती लाजरं हसेल.. तो अलगद म्हणेल.. “अदिती.. I Love You!!”.. आता ती छानसं लाजेल.. त्याच्यापासून नजर चोरेल आणि अलगद म्हणेल.. “I Love You Too आकाश..”
त्याने  जो मनात विचार केलेल्या त्यापैकी काहीच घडलं नाही.. अदिती त्याच्याकडे आली.. त्याला मात्र गुढघ्यांवर बसायची हिम्मत झाली नाही.. त्याने फुलं तिच्या हातात दिली..
“Wow.. Its Wonderful” अदिती म्हणाली.. आकाशने परफ्युमचा गिफ्ट रॅप केलेला बॉक्स तिच्या हातात दिला.. “अरे.. हे काय?”
“बघ न उघडून..” अदिती बॉक्स उघडण्याचा प्रयत्न करू लागली.. आकाशने धीर एकवटला..
“अदिती”
“ह!!” तिचं लक्ष बॉक्स उघडण्याकडेच..
“अ.. मला तुला काहीतरी सांगायचय..” आकाशने जीभ चावली.. हे वाक्य फारच टिपिकल होतं..
“काय.. सांग न..” अदितीने आकाशकडे पाहत विचारलं.. आकाशने वक खोल श्वास घेतला.. मनाचा हिय्या केला आणि तो बोलू लागला..
“अदिती.. आय.. आय..”
“हे अदिती.. wish u a very happy Birthday..”
आकाश दचकला.. त्याच्या बोलण्याच्या मधेच अदितीच्या वर्गातल्या काही मुलींचा ग्रुप टेरेसच्या दारातून आत आला होता.. आणि त्याच जोरजोरात ओरडत अदितीला wish करत होत्या.. त्या जवळपास अदितीला ओढतच आकाशपासून दूर घेवून गेल्या.. आकाश चडफडला.. इतकी वर्ष ज्याची वाट पाहत होता तो चान्स थोडक्यात गेला.. तो निराशेने मित्रांच्या ग्रुपमधे जावून बसला.. पण त्याची नजर अदितीवरच खिळली होती.. तीही मधून मधून त्याच्याकडे पाहत होती.. बॉक्स मधून निघालेली परफ्युमची बॉटल आकाशला दाखवून लांबूनच तिने त्याला Thank You म्हंटल आणि तो लावूनही पहिला.. आकाशला बर वाटलं.. आता त्याला दुसरा योग्य चान्स शोधायचा होता त्याच्या मनातली गोष्ट अदितीपर्यंत पोहोचवण्याचा.. आणि त्याला लवकरच तो मिळाला..
अदिती पाणी प्यायला काउंटरवर एकटीच गेली तसा आकाश पाठोपाठ तिथे पोहोचला..
“अदिती..”
“ओ.. आकाश.. Thanks for the Gift..”
“अरे.. Its my Plesure..!!”
मग दोन क्षण कुणीच काही बोललं नाही.. आकाशला काय बोलावं काही सुचेना.. तो blank झाला होतं.. मग आदितीलाच काहीतरी आठवलं..
“आकाश तू मघाशी काहीतरी सांगत होतास न मला..”
“ ओ.. हा.. ते.. मला.. मला सांगायचं होत.. I mean.. I just wanted to say that..”
आकाश आपले शब्द जुळवण्यात इतका बिझी होता कि अदितीच्या मागून येणाऱ्या व्यक्तीला त्याने पहिलच नाही.. आकाश मुद्याचं बोलणार त्याचवेळी कुणीतरी आपल्या हातांनी अदितीचे दोन्ही डोळे झाकले.. आकाश गडबडला.. त्याने पाहिलं.. मागे एक रुबाबदार तरुण उभा होता.. सहा फुट उंच.. व्हाईट शर्ट आणि व्हाईट ब्लेझरमधूनही त्याच कमावलेलं शरीर उठून दिसत होतं.. रंग गव्हाळ होता पण दिसायला handsome म्हणता येईल असा.. खासकर डोळे.. त्याचे डोळे खूप बोलके होते.. अदिती दोन क्षण चाचपडली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं..
“सोहम..”
त्याने हसून आपले हात दूर केले.. अदिती त्याला पाहण्यासाठी वळली.. तसं त्याने तिला मिठीत घेतलं..
“काय हे किती वाट बघायची.. मी केक कापायची थांबलेय..”
“sorry Sweetheart.. क्लास संपायला उशीर झाला..”
आकाश त्याचं बोलण शॉक्ड होवून ऐकत होता.. हा नक्कीच तिचा भाऊ असणार.. आकाशच मन त्याला समजावत होतं.. अदितीच लक्ष आकाशकडे गेलं..
“आकाश हा सोहम.. मी ज्या डान्स क्लासला जाते तिथे शिकवतो.. आणि..” अदिती काहीशी कॉन्शस झाली..
“आणि अनफोर्च्युनेटली मी अदितीचा Boyfriend हि आहे..”
आकाशच्या पायाखालची वाळूच सरकली..
आदितेने सोहमची बाकीच्या ग्रुप बरोबर ओळख करून दिली.. त्या दोघांनी मिळून केक कापला.. आकाश त्या सगळ्यात होता.. पण त्याच्यापर्यंत काहीच पोहोचत नव्हतं.. केक कापल्यावर गाण्याचा आवाज वाढला आणि सगळेच नाचू लागले.. आकाश मात्र गच्चीच्या कठड्यावरून रात्रीची मुंबई पाहत होता.. रस्त्यावरून गाड्या जात होत्या.. फुटपाथवर बसलेल्या फेरीवाल्यांकडून लोक खरेदी करत होते.. माणसांचे लोटच्यालोट नेह्मी प्रमाणे वाहत होते.. सारं काही नेह्मी सारखच दिसत होतं.. तरी आकाशला काहीच नेह्मीसारखं वाटत नव्हतं.. त्याच्यासाठी सारं काही बदलून गेलं होतं..
“आकाश” त्याने वळून पाहिलं.. ती अदिती होती.. “काय झालं? चल ना.. Let’s Dance!!”
“नको.. मूड नाहीये..”
“काय झालय.. अ.. तू मघाशी काहीतरी सांगत होतास न मला..”
“राहूदे.. महत्वाचं नव्हतं..”
एक डेड पॉज.. अदिती त्याच्या शेजारी येवून उभी राहिली.. खालचा रस्ता पाहू लागली..
“आकाश.. मला माहितीए तू मला काय सांगणार होतास ते.. “ आकाशने तिच्याकडे पाहिलं.. “मुलींना कळतात अशा गोष्टी.. तू मला प्रपोज करणार होतास ना..” आकाशला आश्चर्य वाटलं.. आपल्या भावना चेहऱ्यावर दिसू नयेत म्हणून त्याने नजर फिरवली.. “आकाश.. तू खरच एक चांगला मुलगा आहेस.. पण.. सोहमने मला आधीच तीन वेळा विचारलं होतं.. गेल्या आठवड्यात त्याने पुन्हा एकदा विचारलं आणि मी त्याला नाही म्हणू शकले नाही.. Sorry आकाश.. but i know तुला तुझ्यासाठी योग्य अशी मुलगी नक्कीच मिळेल.. त्यामुळे हे सगळं मनातून काढून टाक.. We are Good Friends.. पण प्रेमाच्या बाबतीत म्हणशील तर.. प्लीज मला विसरून जा..”
आभाला सहज नकार देणाऱ्या आकाशला मात्र नकार पचवणं जड जात होतं.. त्यात काही न बोलता अदितीने त्याच्या मनातलं ओळखलं होतं.. आणि ती त्याला जे उपदेशाचे डोस पाजत होती ते त्याला अजिबातच सहन होत नव्हतं.. तो जिद्दी होता.. लहानपणापासूनच.. आणि अदितीने त्याला नकार दिला या गोष्टीवर शिक्कामोर्तब होवून अदितीने वरचढ रहावं हे त्याला मान्य नव्हतं.. अदिती त्याच्याशी बोलून जायला निघाली तेव्हा आपण आपली हार मान्य करतोय असं आकाशला वाटलं.. त्याला तसं होवू द्यायचं नव्हतं.. त्याच्या हातात अजून एक डाव होता..
“एक मिनीट अदिती..” अदिती निघता निघता थांबली.. “तुला असं का वाटलं? नाही म्हणजे तू सुंदर आहेस.. मला आवडतेस.. पण तुझ्यावर प्रेम.. मी नव्हता असा विचार केलेला.. पण तुझ्या मनात माझ्याबद्दल हे सारं आहे हे ऐकून बरं वाटलं.. पण काय करणार.. You are late.. आता तू हे सारं बोलून काहीच फायदा नाही.. माझी already एक Girlfriend आहे गं..”
अदितीला त्याच्या तोंडून हे ऐकून खूप आश्चर्य वाटलं.. पण ती हुशार होती.. त्याचा हा बचावात्मक पवित्रा तिने लगेच ओळखला.. आपला मेल इगो वाचवण्यासाठी आकाशचा चाललेला प्रयत्न पाहून तिला काय बोलावं ते कळेना..
“मी.. मी तुझ्याबद्दल हा विचार करतेय.. वा.. Nice Theory.. पण आपल्या ग्रुप मधल्या कुणालाही विचार आकाश.. ते तुला हेच सांगतील कि तू माझ्या मागे होतास.. मी नाही..”
“Its your Imagination अदिती.. बाकी काही नाही..”
“जशी तुझी Girlfriend Imagination आहे.. तसंच ना.. सांग ना आकाश कोण आहे ती?” आकाश यावर काहीच बोलला नाही.. आकाशच्या डोक्यात यावेळी फक्त एकाच नाव येत होतं.. आभाचं.. पण ते घ्यावं कि नाही याबद्दल तो ठाम नव्हता.. आजच जिला नकार कळवलय तिचं नाव असं वापरायचं.. उद्या त्या दोघी समोरासमोर येणार.. आभाच नाव जर त्याने घेतलं असत तर पुढचे हे सारे गोंधळ तो कसे निस्तरणार होता..  “कॉलेजमधे मी तुझ्या ग्रुपला ओळखते.. तू तुझ्याबद्दल मला सगळं सांगितलं आहेस.. तू कुठे जातोस.. काय करतोस.. तुझे मित्र.. तुझा परिवार.. आठवीतल तुझं अफेअर.. मग या girlfriendचा साधा उल्लेखही नाही कुठे?? कोण आहे ती? काय नाव तिचं.. का ती फक्त तुझ्या मेल इगोला जपण्याचा प्रयत्न आहे एक..”
आकाशने आश्चर्याने आदितीकडे पाहिलं..आकाशचा डाव अदितीने ओळखला होता.. ती पुढे काहीतरी बोलायला जाणार तोच अदितीला शोधात सोहम तिथे आला..
“अरे अदिती.. इथे काय करतेयस? चल..” त्याचं आकाशकडे लक्ष गेलं.. “आकाश.. तू पण चल.. अदिती तुमचा ग्रुप खरच मस्त आहे.. आम्ही पिकनिक प्लान करतोय.. कपल्स साठीची.. आत्तापर्यंत तू सिंगल असल्यामुळे त्यांना जमत नव्हतं तसं प्लान करायला.. पण आता सगळे इतके जोश मधे आहेत.. परवा प्लान करायला भेटायचं ठरतंय.. सगळे आता आपल्या Girlfriend Boyfriends ना तेच कळवतायत..” तो हे सार बोलत असताना अदितीच लक्ष मात्र आकाशकडेच होतं.. सोहमने ते हेरलं.. “आकाश तुही येणार आहेस ना.. नाही कपल्स साठीच आहे पिकनिक असं नाही हा.. जर तू single असशील तरी Its Fine हा..”
“सिंगल कशाला.. girlfriend आहे ना त्याची.. हो ना आकाश..” अदिती हे मुद्दामच करत होती हे आकाशला जाणवत होतं..
“हो.. आहे न..”
“अरे वा.. मग तिलाही बोलव परवा.. नाव काय आहे तिचं..” सोह्मने नॉर्मली विचारलं..
पण आकाशसाठी हा यक्ष प्रश्न होता.. नाव आता सांगायचं.. परवा त्याच मुलीला घेवून यांना भेटायचं.. कोण तयार होणार.. त्याच्या डोळ्यासमोर एकच मुलगी येत होती.. जी त्याच्यासाठी काहीही करायला तयार झाली असती..
“आभा..” अखेर मनाचा हिय्या करून त्याने ते नाव घेतलं..

“ओके.. तो ये है स्टोरी.. म्हणजे आज आकाशने तुझ्या घरी येवून तुला हेच विचारलं असणार कि, उद्या तू त्याची girlfriend बनून येशील का? बरोबर?”
आभाने आश्चर्याने विधीशाकडे पाहिलं..
“तू कसं ओळखलस..”
“आभा सायकलॉजीची स्टूडंट आहे गं मी.. इतकं तरी..”
“आणि पुढे तो हेही म्हणाला कि तू बिझी आहेस असं सांगून पिकनिकला जाणं टाळूया.. आणि काही दिवसात ब्रेकअप..”
“वा.. काय प्लान आहे.. किती टिपिकल.. आणि बाळबोध.. पण मग तू काय ठरवलंयस आभा?”
“नो वे.. मी त्याच्या या प्लानचा भाग होणार नाहीये..” आभाचा राग तिच्या आवाजातून व्यक्त होत होता.. हि गोष्ट तिला खरच खूप लागली होती.. “आधी तर त्याने मला रिजेक्ट केलं.. आणि वर आता त्या आदितीसमोर स्वत:ची इज्जत वाचवायला He want to use me as a puppet.. त्याला माझ्या इमोशन्सची काही पडलेलीच नाहीये.. मी तर त्याला आज रात्रीच फोन करून सांगणार आहे.. मिस्टर आकाश..”
“मी तुझी Girlfriend बनून तिथे यायला तयार आहे..”
विधीशाने आभाचं वाक्य पूर्ण केलं.. ती काय म्हणाली हे समजून घ्यायला आभालाही दोन
क्षण गेले.. विधीशाच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू होतं.. आणि आभा मात्र शॉक्ड होती..

क्रमशः

Comments

Popular posts from this blog

ओलांडुन जाताना.. भाग-1

ओलांडून जाताना... भाग - ४

ओलांडून जाताना... भाग - 3